वर्षा गायकवाड ताईंचा आक्रस्ताळेपणा समजू शकतो.'सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही', अशा पद्धतीचं हे दुःख आहे. अनेक दशकं धारावीवर एकहाती राज्य करूनही गायकवाड परिवाराला जे जमलं नाही, ते महायुती सरकारच्या काळात प्रत्यक्षात येतंय. प्रत्येक धारावीकरचं स्वप्न असलेला #धारावी_पुनर्विकास_प्रकल्प अखेर वास्तवात येतोय. यामुळेच वर्षाताईंची चिडचिड होतेय. ताईंच्या माहितीसाठी सांगतो की, इतिहासात पहिल्यांदाच शासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या एखाद्या सर्वेक्षणात सुमारे १लाख झोपड्यांना शास्त्रीय पद्धतीने क्रमांक देण्यात आले आहेत. म्हणजे इतक्या मोठ्या संख्येने स्थानिकांनी पुनर्विकासाला समर्थन दिलंय, हे स्पष्ट आहे. ही बाब केवळ धारावीसाठीच नाही तर संपूर्ण भारतासाठी एक 'रोलमॉडेल' ठरू शकेल.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या यशाने गोंधळून गेलेल्या विरोधकांनी मोठ्या प्रमाणात तथ्यहीन आरोप करत अपप्रचाराला सुरुवात केली आहे. यामागे धारावीकरांचे हित साधण्याचा विचार नसून केवळ राजकीय स्वार्थ आहे. याची किंमत विरोधकांना भविष्यात नक्कीच चुकवावी लागेल.ताई, तुम्हाला माहीत असेलच की धारावी पुनर्विकास प्रकल्प हा देशातील एकमेव असा प्रकल्प आहे, जिथे अपात्र (उदा. वरच्या मजल्यावरील झोपडीधारक) सदनिकाधारकांना देखील पुनर्विकासात सामावून घेतले जाणार आहे. राज्य सरकारचा विशेष हेतू प्रकल्प दर्जा प्राप्त झालेल्या या प्रकल्पात 'सर्वांसाठी घर ' हे धोरण ही स्वीकारले असून यातून कोणालाही वगळले जाणार नाही. धारावीकरांच्या पुनर्विकासासह त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे.
शासनाने जारी केलेल्या नियमानुसार 'पात्रता' निश्चित करण्यासाठी अतिशय पारदर्शक पद्धतीने सध्याचे सर्वेक्षण सुरू आहे. यासाठी सर्वेक्षण टीम घराघरात जाऊन माहिती घेत आहे. सर्वेक्षणात सहभागी होण्याची अंतिम मुदत ही परस्पर ठरवण्यात आली नसून हा शासकीय कारवाईचा एक भाग आहे. जास्तीत जास्त लोकांना सर्वेक्षणात सामावून घेण्यासाठी वेळोवेळी शासनाने अंतिम मुदत पुढे देखील ढकलली होती.
एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. राजकीय हेतूने प्रेरित होऊन किंवा वैयक्तिक कारणांसाठी सर्वेक्षणात सहभागी न झालेल्या स्थानिकांच्या बाबतीत कायदेशीर मार्गाने पुढील कारवाई केली जाईल. सर्वेक्षणातील सहभाग हा स्वतःच्या हक्काच्या घरासाठी असून यात कोणताही राजकीय हेतू आणण्याची आवश्यकता नाही. धारावीकरांनी विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडून विनाकारण चिंता करू नये. धारावीकरांना सर्व सोई-सुविधांनी युक्त असे हक्काचे अद्ययावत घर देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे.
"धारावी पुनर्विकास प्रकल्प हा केवळ इमारती उभारणारा प्रकल्प नसून धारावीकरांच्या जीवनाला ' उभारी ' देणारा प्रकल्प आहे. भविष्यात शहरी पुनर्विकासाचा नवा अध्याय म्हणून जागतिक पातळीवर पुनर्विकसित धारावीकडे पाहिले जाईल आणि आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत"अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील 'धारावी पुनर्विकास प्रकल्पात प्रत्येक धारावीकराला घर मिळणार असल्याचे' वारंवार अधोरेखित केले आहे.
0 टिप्पण्या