मुंबईची वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता अतिवृष्टीच्या काळात महानगरात कोसळणा-या पावसाच्या पाण्याचा निचरा प्रभावीपणे होण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रात एकूण ६ उदंचन केंद्र (पंपींग स्टेशन) कार्यरत आहेत. या उदंचन केंद्रामध्ये एकूण ४३ पंप असून यापैकी प्रत्येक पंपाची क्षमता प्रति सेकंदाला ६,००० लिटर पाण्याचा उपसा करण्याची आहे. याचाच अर्थ सर्व पंपांची एकत्रित क्षमता ही प्रत्येक सेंकदाला २ लाख ५८ हजार लिटर एवढ्या पाण्याचा उपासा करण्याची आहे. दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळपासून मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पावसाला सुरुवात झाली. तेव्हापासून ते दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या साधारणपणे ४ दिवसांच्या कालावधीत सर्व उदंचन केंद्रामधून तब्बल १६,४५१.५५ दशलक्ष लिटर (१,६४५.१५५ कोटी लिटर) एवढया पाण्याचा उपसा करण्यात आला. तुलनात्मक विचार केल्यास ८,०४.६ कोटी लिटर एवढी जलधारण क्षमता असणा-या तुळशी तलावातील पाण्याच्या दुपटीपेक्षा अधिक पाण्याचा उपसा गेल्या ४ दिवसांत करण्यात आला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
दिनांक १६ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट २०२५ या साधारपणे ४ दिवसांच्या कालावधी दरम्यान पावसाच्या पाण्याचा सर्वाधिक उपसा हा इर्ला उदंचन केंद्राद्वारे करण्यात आला. या केंद्राद्वारे ३,७६८.४८ दशलक्ष लिटर एवढया पाण्याचा उपसा करण्यात आला. या खालोखाल क्लिव्हलॅंड बंदर उदंचन केंद्रातून २,९०६.०२ दशलक्ष लिटर, गजधरबंध उदंचन केंद्रातून २,८७०.११ दशलक्ष लिटर, लवग्रोव्ह उदंचन केंद्रातून २,८२६.५० दशलक्ष लिटर,हाजी अली उदंचन केंद्रातून २,३७९.७८ दशलक्ष लिटर आणि ब्रिटानिया उदंचन केंद्रातून १७००.६७ दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा करण्यात आला. यानुसार सर्व ६ उदंचन केंद्राद्वारे १६,४५१.५५ दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा करण्यात आला. यानुसार पाण्याचा उपसा करण्यासाठी सर्व ६ उदंचन केंद्रामध्ये कार्यरत असलेल्या पंप हे दिनांक १६ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट २०२५ या ४ दिवसांच्या कालावधी दरम्यान सर्व पंपांचा एकत्रितरित्या विचार केल्यास एकूण ७६१ तास व ३८ मिनिटे कार्यरत होते.मुंबई महापालिका क्षेत्रात पडणा-या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी हाजीअली, लव्हग्रोव्ह (वरळी), क्लीव्हलँड बंदर (वरळी गाव), ब्रिटानिया (रे रोड), ईर्ला (जुहू) आणि गजदरबंध (सांताक्रूज) या प्रत्येक ठिकाणी एक याप्रमाणे ६ उदंचन केंद्रे कार्यरत असून यात एकूण ४३ पंप कार्यरत आहेत. पावसाचे व उदंचन केंद्रांमध्ये वाहून येणा-या पाण्याचे प्रमाण लक्षात घेऊन हे पंप संगणकीय प्रणालीद्वारे कार्यरत होतात. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ६ उदंचन केंद्राची क्षमता व त्यांच्याद्वारे उपसा करण्यात आलेले पावसाचे पाणी याची दिवसनिहाय आकडेवारी व संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे आहेः
दिनांक १६ ते १९ ऑगस्ट २०२५ दरम्यान उदंचन केंद्रांद्वारे उपसा करण्यात आलेले पावसाचे पाणी (दशलक्ष लिटर)
अ. क्र. उदंचन केंद्राचे नाव/ पंपांची संख्या/ प्रति सेकंद पाणी उपसा करण्याची कमाल क्षमता (लिटर)/ या क्रमाने माहिती
१. ईर्ला- ८/ ४८००० / ३,७६८.४८
२. क्लीव्हलँड बंदर- ७/ ४२००० / २,९०६.०२
३. गजदरबंध- ६/ ३६००० / २,८७०.११
४. लव्हग्रोव्ह- १०/ ६०००० / २,८२६.५०
५. हाजी अली- ६/ ३६००० / २,३७९.७८
६. ब्रिटानिया- ६/ ३६००० / १,७००.६qe7
सखल भागातील पावसाळी पाणी उपसण्यासाठी महानगरपालिकेने ५४० उदंचन पंप तैनात केले आहेत. मुंबई महानगरात आज, दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी अतमिुसळधार पाऊस कोसळत असून गेल्या ६ तासात या ५४० उदंचन पंपांद्वारे १८२.५ कोटी लिटर पाण्याचा उपसा करण्यात आला आहे. सर्व उदंचन पंपांचे चालन प्रशिक्षित मनुष्यबळाद्वारे तीन सत्रांमध्ये (शीफ्ट) करण्यात येत आहे.
मुंबईत १८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८ ते १९ ऑगस्ट २०२५ सकाळी ८ वाजेपर्यंत (२४ तास) सर्वाधिक पाऊस झाला. पश्चिम उपनगरांमध्ये चिंचोली अग्निशमन केंद्र - ३६१ मिलीमीटर, कांदिवली अग्निशमन केंद्र - ३३७ मिलीमीटर, दिंडोशी वसाहत महानगरपालिका शाळा - ३०५ मिलीमीटर, मागाठाणे बस आगार - ३०४ मिलीमीटर, शहर विभागात पर्जन्य जलवाहिन्या कार्यशाळा, दादर - ३०० मिलीमीटर, बी. नाडकर्णी महानगरपालिका शाळा, वडाळा - २८२ मिलीमीटर, फ्रॉसबेरी जलाशय, एफ दक्षिण विभाग - २६५ मिलीमीटर, पूर्व उपनगरांमध्ये चेंबूर अग्निशमन केंद्र - २९७ मिलीमीटर, इमारत प्रस्ताव कार्यालय, विक्रोळी - २९३ मिलीमीटर, पासपोली महानगरपालिका शाळा, पवई - २९० मिलीमीटर व विणानगर महानगरपालिका शाळा - २८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
१९ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे ४ ते सकाळी ८ वाजेपर्यंत (४ तास) १०० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम उपनगरांमध्ये चिंचोली अग्निशमन केंद्र - १०७ मिलिमीटर, वर्सोवा उदंचन केंद्र - १०६ मिलिमीटर, दिंडोशी वसाहत महानगरपालिका शाळा - ९७ मिलिमीटर, शहर विभागात फॉर्सबेरी जलाशय, एफ दक्षिण कार्यालय - १०९ मिलिमीटर, पर्जन्य जलवाहिन्या कार्यशाळा, दादर - १०३ मिलिमीटर, बी. नाडकर्णी महानगरपालिका शाळा, वडाळा - ९९ मिलिमीटर, नायर रूग्णालय - ९४ मिलिमीटर आणि पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड अग्निशमन केंद्र - १०० मिलिमीटर, गव्हाणपाडा अग्निशमन केंद्र - ९५ मिलिमीटर आणि विणानगर महानगरपालिका शाळा - ९३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

0 टिप्पण्या