घाटकोपर आणि ठाण्यात दोन ठिकाणी 10 थर रचून मुंबईतील सर्वात जुन्या आणि मानाच्या जय जवान गोविंदा पथकाने शनिवारी दहीहंडी उत्सवात नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जय जवान गोविंदा पथक हे मुंबईतील जुन्या आणि प्रतिष्ठित गोविंदा पथकांपैकी एक आहे. त्यामुळे या गोविंदा पथकाला दहीहंडी उत्सवात मानाचे स्थान असते. मुंबईतील दहीहंडी उत्सवाला खऱ्या अर्थाने ग्लॅमर मिळवून देणाऱ्या आणि या उत्सवाला जागतिक पातळीवर नेण्यात जय जवान गोविंदा पथकाचा महत्त्वाचा वाटा आहे. मात्र प्रो-गोविंदा स्पर्धेतील वादामुळे प्रताप सरनाईक यांनी जय जवान गोविंदा पथकाला डिवचले होते. त्यावर प्रतिउत्तर म्हणून, जय जवान गोविंदा पथकाने त्यांच्याच दहीहंडी उत्सवात 10 थर रचून दाखवले. यानंतर जय जवान गोविंदा पथकाने रात्री धो-धो पाऊस सुरु असताना मनसे नेते अविनाश जाधव यांच्या दहीहंडीतही 10 थर रचले. यानंतर अविनाश जाधव यांनी स्टेजवरुन खाली उतरत जय जवान गोविंदा पथकासोबत गुलाल उधळत आनंद साजरा केला. 'आज आपण कितीवेळा 10 तर लावले, तीन वेळा लावले. आज हॅटट्रिक केली, ही हॅटट्रिक बापाची आहे. बाप हा बाप असतो', अशा घोषणा जय जवानच्या गोविंदांनी दिल्या. त्यावर अविनाश जाधव यांनी माईक हातात घेत , सातबारा पण आपल्याच बापाचा आहे', असे म्हटले.
यावर मनसेचे नेते राजू पाटील यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट टाकली आहे. त्यात ते म्हणतात, मराठी माणसांच्या मेळाव्यात दोन्ही ठाकरे बंधूंना ‘जय जवान दहीहंडी पथक’ या पथकाने मराठी माणसांचे आशास्थान म्हणून सलामी दिली होती. याचाच राग धरून काही भैय्यांची तळी उचळणारे गांडूळ वळवळले होते व आकसापोटी त्यांना एका स्पर्धेत प्रवेश नाकारण्याचा नीच राजकारण केले होते. आज पण ठाण्यात एका गोविंदा पथकाने ‘त्यांच्या’ इथे पहिल्यांदा १० थर लावले, त्या गोविंदा पथकाचे मनापासून अभिनंदन केलेच पाहिजे. परंतु इथेही यांच्या राजकारणाचे गांडूळ वळवळले व या विजयी पथकाचा नामोल्लेख करताना अप्रत्यक्ष जय जवान गोविंदा पथकाला टोला मारला. आज त्याच जय जवान गोविंदा पथकाने एकदा नाही चक्क तीन वेळा १० थर लावून एकाच दिवसात हॅट्रिक मारली व या गांडूळांना माती दाखवली. जय जवान गोविंदा पथकातील सर्व मित्रांचे व त्यांच्या पाठी खंबीरपणे उभा राहणाऱ्या आमच्या अविनाश जाधवांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.संस्कार व ‘संस्कृती’ ही वागण्यात असली पाहिजे……नुसत्या नावात काय आहे ?,
मात्र या सर्व प्रकरणात दहिहंडी उत्सवाचा वापर हा केवळ सध्या राजकारणासाठी होत असल्याची प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होत आहे. प्रत्येक राजकीय नेता आपल्या स्व-अस्तित्वासाठी या सांस्कृतिक अधिष्ठान असलेल्या खेळास आपल्या हितासाठी वापरत असल्याचा आरोप होत आहे. केवळ राज्यकर्त्यांच्या गटबाजीमुळे दहिहंडी मंडळांमध्येही आता उभी फूट पडत असल्याचे चित्र दिसत आहे. त्याचाच परिणाम प्रो-गोविंदा स्पर्धेत जय जवान गोविंदा पथकाला नाकारण्यात आले. त्यानंतर कारण काहीही दिले तरी वास्तव हेच असल्याची चर्चा ठाण्यात रंगली आहे. या सर्व प्रकारामुळेच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपला हा उत्सव कायमचा बंद केला. मात्र काही मंडळी आपल्या हितासाठी या खेळाचा या उत्सवाचा पुरेपूर उपयोग करून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करीत असल्याचा आरोपही उत्सवादरम्यान काही ठाणेकर मंडळींनी केला.

0 टिप्पण्या