Top Post Ad

मुंबईचा पाणीपुरवठा एक दृष्टीक्षेप

मुंबईत असलेल्या विहार ९ कोटी लीटर (९० द.ल.ली. प्रतिदिन) आणि तुळशी १.८ लीटर (१८ द.ल.ली. प्रतिदिन) तसेच, मुंबईपासून सुमारे १०० ते १७५ किलोमीटर अंतरावर स्थित असलेल्या तानसा ५० कोटी लीटर (५०० द.ल.ली. प्रतिदिन),  मोडक सागर (वैतरणा) ४५.५ कोटी लीटर (४५५ द.ल.ली. प्रतिदिन), उर्ध्व वैतरणा ६४ कोटी लीटर (६४० द.ल.ली. प्रतिदिन), मध्य वैतरणा ४५.५ कोटी लीटर (४५५ द.ल.ली. प्रतिदिन) आणि भातसा २०२ कोटी लीटर (२०२० द.ल.ली. प्रतिदिन) या सात जलस्रोतांद्वारे ४०० कोटी लीटर (४००० द.ल.ली. प्रतिदिन) इतका पाणीपुरवठा करण्यात येतो
शहराबाह्य मुख्य जलस्रोतांमधील पाणी जलशुद्धीकरण केंद्रांपर्यंत वाहून आणण्याचे काम २२३५ मि.मी. ते ३००० मि.मी. व्यासाच्या जलवाहिन्यांद्वारे व ५५०० मि.मी. व्यासाच्या काँक्रिटच्या भूमिगत जलबोगद्याच्या सहाय्याने गुरुत्वाकर्षणाद्वारे होते. सुमारे ५०% पाणी हे उदंचन व्यवस्थेद्वारे जलशुद्धीकरण केंद्रांपर्यंत आणले जाते.
जलस्रोतांमधील पाणी शुद्धीकरणाकरीता पांजरापूर (१३६५ द.ल.ली. प्रतिदिन), भांडुप संकुल (२८१० द.ल.ली. प्रतिदिन) आणि विहार (९० द.ल.ली. प्रतिदिन) आणि तुळशी (१८ द.ल.ली. प्रतिदिन) येथे आणले जाते.

 या अशुद्ध पाणी वाहुन आणणा-या जलवाहिन्यांना ‘प्राथमिक स्तर व्यवस्था’ (Primary System) म्हणतात, जी सुमारे ४०० कि.मी. एवढ्या लांबीची आहे. ‘प्राथमिक स्तर व्यवस्था’ (Primary System) मध्ये सुमारे ४३ कि.मी. लांबीच्या जलबोगद्यांचा समावेश आहे.  जल शुद्धीकरण केंद्रामध्ये पाणी पोहचविल्यानंतर या ठिकाणी कोऍग्युलेशन, फ्लोक्युलेशन, सेटलिंग, रॅपिड सॅण्डफिल्टर, आणि पोस्ट क्लोरीनेशन या प्रक्रिया करून पाणी शुद्ध केले जाते.  या अंतर्गत प्रथम (पीएसी) पॉली एल्युमिनियम क्लोराइड मिसळले जाते. हे पीएसी मिश्रीत पाणी मोठ-मोठ्या टाक्यांमधुन नेऊन त्यास संथ होण्यासाठी अवधी दिला जातो. यामुळे पीएसीची प्रक्रिया पूर्ण होऊन जड झालेला गाळ / धुलीकण या मोठ्या टाक्यांच्या तळाशी बसतात. हा गाळ सतत टाक्यांमधुन बाहेर काढला जात असतो. नंतर हे पाणी पूर्णतः गाळण्यासाठी रेतीचा / वाळूचा थर असलेल्या टाक्यांमधुन (रॅपिड सँड फिल्टर्स) नेण्यात येते. पूर्णतः गाळलेले / शुद्ध झालेले पाणी फिल्टर बेडच्या तळातून काढून घेवून निर्जंतुकीकरणासाठी पुढे नेण्यात येते.

शुद्ध पाणी ब-याच लांबवर वाहून न्यावयाचे असल्याने निर्जंतुकीकरणासाठी क्लोरीनचा वापर केला जातो. निर्जंतुकीकरण केलेले पाणी हे ‘भांडुप संकुल’ (मुंबईतील) आणि येवई (मुंबई बाहेरील) येथील महासंतुलन जलाशयामध्ये (Master Balancing Reservoir) साठवले जाते. हे पाणी संपूर्ण शहरातील २७ सेवा जलाशयांना (Service Reservoir) पुरविले जाते. हे संवाहन जाळे सुमारे ४५० किलोमीटर लांबीचे असून २४ तास कार्यान्वित असते. त्यामुळे भूजल / सांडपाण्याने पेयजल दूषितीकरण होण्याची शक्यता टळते.  मुंबईला सध्या दररोज ४००० दशलक्ष लीटर्स इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. योग्य शुद्धीकरण सुविधांमुळे WHO व IS - १०५००: २०१२ ने प्रमाणित केलेल्या मानकांनुसार जलशुद्धीकरण करणे साध्य झाले आहे. शुद्ध पाण्याचा गढुळपणा पूर्ण वर्षभर ००.३ NTU वा त्यापेक्षा कमी असतो व रेसिड्युअल क्लोरीनचे ग्राहकाच्या ठिकाणचे प्रमाण ०.२ PPM एवढे असते.

 प्रक्रिया केलेले पाणी जलशुद्धीकरण केंद्राजवळील महासंतुलन जलाशयात साठवून पुढील वितरणासाठी शहरात ठिकठिकाणी असलेल्या २७ सेवा जलाशयांपर्यंत विभागले जाते. यासाठी १२०० मि.मी. ते २४०० मि.मी. च्या पोलादी जलवाहिन्या व २२०० मि.मी. ते ३५०० मि.मी. व्यासाच्या भूमीगत जलबोगद्यांचा वापर केला जातो. या जलवाहिन्यांची लांबी सुमारे ४५० मि.मी. असून सुमारे २७ कि.मी. लांबीच्या जलबोगद्यांचा समावेश आहे. या जलवितरण जाळ्यास द्वितीय स्तर (Secondary System) वहन व्यवस्था म्हणतात. सेवा जलाशयातून Feeder वाहिनी व Distribution वाहिनीच्याद्वारे पाणी विविध परिसरातील ग्राहकांपर्यंत सुमारे ३ लाख ६० हजार जलजोडण्यांद्वारे पोहचविले जाते. या संपूर्ण प्रणालीला तृतीय स्तर (Tertiary System) प्रणाली म्हणतात. यामध्ये २४०० मि.मी. ते १५० मि.मी. व्यासाच्या जलवाहिन्यांचा समावेश आहे. तृतीय प्रणालीच्या जाळ्यांची अंदाजित लांबी सुमारे ५००० कि.मी. आहे. त्यामध्ये सुमारे २५ कि.मी. लांबीच्या जलबोगद्यांचा समावेश आहे. मुबंईतील दररोजचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी सुमारे १,००० झडपांची उघडझाप केली जाते.

पाणीपुरवठा सुरळीत व्हावा याकरिता महानगरपालिकेतर्फे दरवर्षी अनेक कामे / उपाययोजना केल्या जातात. यामध्ये विकसनशील भागांमध्ये (developing areas) नवीन जलवाहिन्या टाकणे, जुन्या व जीर्ण झालेल्या जलवाहिन्या टप्प्या-टप्प्याने बदलून त्या ठिकाणी नविन जलवाहिनी टाकणे, सेवा जलजोडण्यांच्या जुडग्यांऐवजी एक सामाईक जलवाहिनी टाकणे, गळतीची ठिकाणे शोधून त्यांची तात्काळ दुरुस्ती करणे, या कामांचा समावेश असतो.  मुंबई शहरातील पाणीपुरवठा सुरळीतपणे चालू राहण्यासाठी दररोज सुमारे १ हजार १५० अभियंते, ८ हजार ९५० कामगार व इतर कर्मचारी वर्ग अव्याहतपणे कार्यरत असतो.

 मुंबईच्या लोकसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. सन २०४१ पर्यंत मुंबईची अंदाजित लोकसंख्या १ कोटी ७२ लाख (१७.२४ दशलक्ष) आणि पाण्याची मागणी दररोज ६५३ कोटी लीटर (अर्थात ६,५३५ दशलक्ष लीटर्स) (मार्गस्थ पुरवठा व वहनातील घट धरुन) इतकी असेल. भविष्यातील पाण्याची गरज भागविण्यासाठी शासनाने मुंबईसाठी दिलेले गारगाई (४४० दशलक्ष लीटर्स प्रतिदिनी), पिंजाळ (८६५ दशलक्ष लीटर्स प्रतिदिनी) व दमणगंगा पिंजाळ नदी जोड प्रकल्प (१,५८६ दशलक्ष लीटर्स प्रतिदिनी) हे स्रोत विकसित करता येण्यासाठी कार्यवाही सुरु आहे. सदर प्रकल्प पूर्ण झाल्यावर पाणीपुरवठ्यात प्रतिदिनी २,८९१ दशलक्ष लीटर्स इतकी वाढ होणे अपेक्षित आहे.

 मुंबईच्या पाणीपुरवठ्यात वाढ करुन मागणी व पुरवठ्यातील तूट कमी करण्यासाठी विश्वासार्ह आणि हवामान बदल संवेदनक्षम स्रोत विकसित करण्याकरिता जागतिक कल लक्षात घेता, बृहन्मुंबई महानगरपालिकेने मनोरी येथे ४०० द.ल.ली. प्रतिदिन पर्यंत विस्तार क्षमता असलेल्या, २०० द.ल.ली. प्रतिदिन निःक्षारीकरण प्रकल्पासाठी स्वारस्याची अभिव्यक्ती (EoI) मागविण्यात आले आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल व मसुदा निविदा तयार करण्यासाठी सल्लागाराची यापूर्वीच नियुक्ती करण्यात आलेली आहे व त्यास लवकरच अंतिम स्वरुप देऊन प्रकल्प विकसित करण्याच्या कामास सुरुवात होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com