*ओशिवरा उद्यान मार्गावरील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प (SRA) विकासकाने पावसाळी पाण्याचा निचरा / वहन करण्यासाठी कोणतीही उपाययोजना न करता पुनर्वसन प्रकल्पस्थळी साचणारे पावसाचे पाणी उपसा संच (मोटर पंप) ने उपसून थेट रस्त्यावर सोडले. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याची गंभीर दखल घेत महानगरपालिका प्रशासनाने संबंधित विकासकाविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मेसर्स चांदिवाला डेव्हलपर्स असे गुन्हा दाखल झालेल्या विकासकाचे नाव आहे. भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ अंतर्गत कलम १२५, महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ चे कलम ११५ (क) आणि ११७ अन्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक. संजय चव्हाण अधिक तपास करत आहेत.
जोगेश्वरी पश्चिम येथील स्वामी विवेकानंद मार्गावर ओशिवरा उद्यान आहे. या रस्त्याचे काँक्रिटीकरण प्रस्तावित असून ऑक्टोबर २०२५ मध्ये ते सुरू होईल. दरम्यान, या रस्त्यावर खड्डे आढळल्यावर दिनांक २ ऑगस्ट २०२५, दिनांक २३ ऑगस्ट २०२५ आणि दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी तातडीने बुजविण्यात आले. तथापि, मागील तीन दिवसात मुसळधार पावसामुळे व त्यासोबतच प्रकल्पस्थळी येणाऱया अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यावर पुन्हा खड्डे झाले. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर २२ सप्टेंबर रोजी खड्डे बुजविण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली.
रस्ते दुरूस्ती सुरू असताना, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प (SRA) विकासकाने पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याचे आढळले. एवढेच नव्हे तर, पुनर्वसन प्रकल्पस्थळावरून पावसाचे पाणी मोटर पंपाने उपसून थेट सार्वजनिक रस्त्यावर सोडले जात असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी महानगरपालिका प्रशासनाने रस्ता दुरवस्थेस कारणीभूत असल्याकारणाने संबंधित 'एसआरए' विकासकाविरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

0 टिप्पण्या