नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे याकरिता खा.सुरेश म्हात्रे करत असलेले आंदोलन म्हणजे श्रेय घेण्याचा प्रकार- माजी खासदार रामशेठ ठाकूर
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची घोषणा झाल्यापासून स्थानिक भूमिपूत्रांसह सर्वच समाज घटकांनी या विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे म्हणून आग्रह धरलेला आहे. याकरिता प्रत्येक समाजघटक आपआपल्या परीने आंदोलन करून सरकारला जागे करीत आहे. आता या विमानतळाचे उद्घाटन येत्या 6 ऑक्टोबर रोजी होत आहे. मात्र अद्यापही शासनाकडून याबाबत कोणताही निर्णय जाहीर झाला नसल्याने विमानतळाचे उद्घाटन होऊ देणार नाही असा पवित्रा घेण्यात येत आहे. याकरिता 6 ऑक्टोबरला धडक मोर्चा काढण्याची भूमिका खासदार सुरेश म्हात्रे यांनी रविवारी कोपरखैराणे येथे बैठकीत जाहीर केली. यावेळी माजी खा.रामशेठ ठाकूर हे उपस्थित असल्याच्या बातम्या प्रसिद्धी माध्यमातून आल्या. यावर ठाकूर यानी आज मुंबई मराठी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद घेऊन या गोष्टीचे खंडन केले. हा जाणिवपूर्वक खोडसाळ पणा करण्यात आला असून या बैठकीला केवळ सुरेश म्हात्रे यांचे सहकारी आणि त्यांचे लोक उपस्थित होते. नामांतराकरिता स्थापन करण्यात आलेल्या सर्वपक्षीय संघर्ष समितीचे कोणीही पदाधिकारी या बैठकीस उपस्थित नव्हते. अशी माहिती ठाकूर यांनी दिली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचे देण्यात यावे अशी समस्त भूमिपुत्रांची मागणी असून तसा ठराव देखील राज्य सरकारने मंजुर करून केंद्र सरकारकडे पाठवला आहे. विमानतळावरून पहिले विमान ज्या दिवशी टेकऑफ होईल त्या दिवशी अनाऊन्स दि बा पाटील यांचेच नाव अनाऊन्स होईल असे भर सभेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीर केले आहे. तसेच या विमानतळाकरिता दुसऱ्या कोणत्याही नावाची शिफारस अद्यापही नोंद झालेली नाही. असे असताना सुरेश म्हात्रे जाणिवपूर्वक मोर्चाचे आयोजन करून तेढ निर्माण करण्याचे काम करीत असल्याचा आरोपही ठाकूर यांनी केला. कारण या मोर्चा दरम्यान काही अघटीत झाले. आहिल्यानगर प्रमाणे परिस्थिती निर्माण झाली तर याला जबाबदार कोण असा सवालही ठाकुर यांनी उपस्थित केला.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्यात उशीर केला जात असून केंद्राकडून अजून अंतीम अधिसूचना काढली जात नाही. त्यामुळे सध्या तरी पनवेल, उरण परिसरात विमानतळ नामकरणावरुन वातावरण चांगलेच पेटलेले
आहे. सरकारने नामकरणाचे आधी जाहीर करुन मगच लोकार्पण करावे, अशी मागणी होत आहे. प्रस्ताव केंद्राकडे असून त्यास तीन वर्ष होत आली तरी अद्याप त्यावर निर्णय घेतला जात नाही आणि असे असताना उद्घाटनाचा घाट घातला जात आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचे देण्याची अंमलबजावणी करावी म्हणून येत्या 6 ऑक्टोबरला विमानतळावर धडक मोर्चा काढण्याचे म्हात्रे यांनी जाहिर केले.. मात्र या मोर्चाला आमचा विरोध असून सरकार 99.99 टक्के ही मागणी मान्य करणार असल्याची आम्हाला खात्री आहे. तेव्हा अशा प्रकारे सरकारला वेठीस धरण्याचे काम संघर्ष समितीच्या माध्यमातून होणार नाही. याबाबत विचारविनिमय करण्यासाठी संघर्ष समितीची लवकरच बैठक होत असून यामध्ये पुढील दिशा ठरवण्यात येईल असेही ठाकूर यांनी स्पष्ट केले.
नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे अशी मागणी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना सर्वप्रथम तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे आणली. या मागणीचे पत्र शिंदे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले होते. या पत्रानंतर ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील आगरी-कोळी समाजांत तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. कोविड काळादरम्यानच विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे यासाठी सर्वपक्षीय संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. या समितीत सर्वपक्षीय नेत्यांना स्थान दिले गेले.
विमानतळ प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यातच प्रकल्पाचे नामकरण व्हावे असा आग्रह धरला गेला होता. अटल सेतूच्या शुभारंभप्रसंगी नवी मुंबईत आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यानंतर एका पाहणीसाठी आलेले केंद्रीय नागरी उड्डयन मंत्र्यांची भेट घेऊन संघर्ष समितीच्या नेत्यांनी दि.बा. यांच्या नावासाठी वेळोवेळी आग्रह धरला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव मिळावे यासाठी आग्रही असणाऱ्या आंदोलकांमध्ये मात्र आता वेगवेगळे मतप्रवाह दिसू लागले आहेत. राष्ट्रवादीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी नुकतीच भिवंडी ते जासई अशी काररॅली काढत मध्यंतरी या मुद्द्यावर आंदोलनाची हाक दिली होती. या वेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेस भाजपचे बहुसंख्य नेते अनुपस्थित राहिल्याचे पाहायला मिळाले. या सभेत सुरेश म्हात्रे यांच्यासह शेकाप, शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र आक्रमक भाषणे केली.
या सभेनंतर शनिवारी वाशी संघर्ष समितीमार्फत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत हा प्रश्न आंदोलनाशिवाय सुटणार नाही. त्यामुळे उद्घाटन सोहळ्यापूर्वी आंदोलन हाती घ्या, अशी मागणी सुरेश म्हात्रे यांनी केली. त्यावर आंदोलन करून जर विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव लागत असेल तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा टोला कपिल पाटील यांनी लगावला. 'आंदोलन करायचे नसेल तर तुम्ही आम्हाला शब्द द्या, विमानतळाचे नामकरण कधी होईल', असा प्रश्न यावेळी सुरेश म्हात्रे यांनी उपस्थित केला. त्यावर प्रधानमंत्री कार्यालयापर्यंत मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव पाठविण्याचे काम केले आहे. नामकरणाला काही प्रक्रिया असते, असे प्रतिउत्तर पाटील यांनी दिले होते. त्यानंतर आज पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा खा.रामशेठ ठाकूर यांनी सुरेश म्हात्रे यांच्या आंदोलनावर प्रश्नचिन्ह निर्माण करून उपऱ्या लोकांनी हा लढा लढू नये त्यासाठी भूमिपूत्र सक्षम असल्याचा टोला म्हात्रे यांना लगावला.
0 टिप्पण्या