लहानपणी वडिलांना सकाळ वाचून दाखवावा लागायचा त्यात बाबा आढाव हे नाव वाचण्यात येई. पुण्यात अग्रिकल्चर कॉलेजमधील विषय आवडायचे नाहीत पण बाबांच्या व इतरांच्या सभा आवडायच्या.
झेंडा घेऊन अनेक वेळा कलेक्टर, पोलीस,..., कचेरीवर मोर्चात सहभागी झालो . शेवटी तेच प्रश्न सोडवणार असतील तर आपणच कलेक्टर, डीएसपी का होऊ नये? मग पोलीस दलात डीएसपी झालो. महाराष्ट्राच्या गुप्तहेर यंत्रणेत असताना माझ्याकडे जातीय दंगली,कामगार चळवळी हा विभाग होता. अनेक फायली पैकी बाबांची फाईल काढून वाचली. त्यांचे नाव, गाव, शिक्षण, पार्श्वभूमी याबरोबरच काही शेरे वाचण्यात आले. "हा माणूस खूप दुराग्रही व आक्रमक आहे . हमाल व असंघटित लोकांचे काम तळमळीने करताना दिसतो पण फार हेकेखोर आहे....!"
बाबांचा हेका हे स्वतःचे घर भरण्यासाठी किंवा मोठे पद सत्ता मिळविण्यासाठी होता का? तो तर वंचित बहुजनांच्या उद्धारासाठी होता. मग लोकशाही मार्गाने निर्माण झालेली ही नोकरशाही अशा परिवर्तनवादी नेता व कार्यकर्ता यांच्याकडे या नजरेने का पाहते याचा शोध घेणे गरजे. ब्रिटिश येण्याअगोदर आपल्याकडे पोलीस पाटलाचा मुलगा पाटील,कुलकर्ण्यांचा कुलकर्णी, कोतवालचा कोतवाल बनत असे. त्याला पारंपारिक मॉडेल (traditional model)असे म्हणत. काही वेळा गावातील बलदंड माणूस पाटील, कोतवाल, कुलकर्णी बनत असे त्याला करिष्मायुक्त( charismatic) मॉडेल असे म्हणत. आजची प्रशासकीय व्यवस्था ब्रिटिशांनी सुरू केली. ती मॅक्स वेबर या विचारवंताच्या मांडणीवर आधारित आहे.
विद्यापीठीय शिक्षण, निवड प्रक्रिया, प्रशिक्षण, नोकरीची हमी. चौकशी झाल्याशिवाय नोकरीतून काढता येणार नाही. हक्काच्या सुट्ट्या, निवृत्ती वेतन,....., यासारख्या सुविधा दिल्या कि ती नोकरशाही वंगण केलेल्या यंत्रासारखी सुरळीत चालेल असे मॅक्स वेबर ने सांगितले. थोड्याफार फरकाने जगभर अशाच पद्धतीने नोकरशाही निर्माण केलेली आहे व चालते. आणि तिला पर्यायही नाही. पुढे फ्रेडरिक रिग्ज यांनी भारतासह अनेक प्रगतीशील देशातील नोकर शाहीचा अभ्यास केला व आपले निष्कर्ष प्रसिद्ध केले. भारतातील नोकरशाही ही तिथल्या सामाजिक व्यवस्थेची उपव्यवस्था असते. भारतात ती वर्णव्यवस्थे वर आधारित ब्राह्मणी व्यवस्था आहे. भारतीय प्रशासकीय व्यवस्थेत कोणत्याही जातीचा तरुण वरिष्ठ अधिकारी झाला की तो कनिष्ठ राहत नाही शूद्र राहत नाही तो उच्चवर्णीय बनतो व इतरांना दाबण्याचा शोषण करण्याचा प्रयत्न करतो. त्याचा स्वतःचा असा अजेंडा बनतो. स्वतःचे प्रमोशन, कौटुंबिक सुख, जैसे थे वादी बनतो. आत्ता असलेली व्यवस्था बदलली तर आत्ता आपणास जे फायदे मिळतात ते मिळणार नाहीत असे नोकर दाराला वाटते म्हणून तो स्वतःसाठी सेक्युरिटी झोन तयार करतो. ती व्यवस्था बदलू नये याची काळजी घेतो. ज्यादा काम नको असते.नाविन्यपूर्ण प्रयोग न करता पूर्वीची फाईल तशीच पुढे चालू ठेवतो. कार्ल मार्क्स म्हणतो की नोकरशाही ही भांडवलदारांचे हित अबाधित राखण्यासाठी निर्माण झालेली आहे. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर काही मोजके अपवाद वगळता कोणतीही नावीन्यपूर्ण योजना प्रशासनात राबविलेली नाही. जो असा प्रयत्न करतो त्याचा बळी घेतला जातो. वंचित उपेक्षित असंघटित कामगार वर्ग यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या व आग्रह धरणाऱ्या डॉक्टर बाबा आढाव यांचा हीच नोकरशाही हेकेखोर म्हणून नोंद करते. बरं नोंद करणारे बहुतांश अधिकारी हे याच वर्गातून आलेले आहेत. आपला वर्ग वर्ण सुधारला यातच समाधान मानणारा. बाबांच्या अंत्यदर्शनाला या गटातील फारसे लोक दिसले नाहीत.
या देशातील कोणताही प्रश्न जात हे वास्तव विचारात घेतल्याशिवाय सोडविता येणार नाही ही त्यांची मांडणी महत्वाची होती. त्याबद्दल मी अनेकदा त्यांच्या सभांना हजर राहिलो व व्यक्तिगत चर्चा केली. जातही समरसता या गोंडस नावाखाली ती कायम तशीच राहावी यासाठी बहुतांश ब्राह्मणांचा एक मोठा गट कार्यरत आहे हे माझे म्हणणे त्यांना मान्य नसावे कारण चर्चा सुरू केली की ते दुसराच विषय काढत.किंवा दुसऱ्याशीच बोलायला सुरुवात करत. असो एके ठिकाणी ब्राह्मणांना दोष देणे योग्य नाही असे ते म्हटल्याचे ऐकले. अनेक लेखांमध्ये इथं पेशवाई मुळीच येणार नाही असे त्यांनी म्हटल्याचे वाचनात आले. पण याच फुल्यांच्या भूमीत ब्राह्मणी श्रेष्ठत्व व इतरांचे शोषण कायम ठेवणाऱ्या भाजपाचा खासदार ,अनेक आमदार, अनेक नगरसेवक निवडले गेले. केंद्रात राज्यात त्यांचे सरकार आले. पुरोगामी चळवळ चालवणारी डॉक्टर बाबा आढाव यांची पहिलीच बहुजनांची पिढी असावी. त्यांची वैचारिक वाढ ना ग गोरे, एस एम जोशी, ग प्र प्रधान,....,अशा ब्राह्मणी संस्कारात वाढलेल्या परिवर्तनवादी कार्यकर्त्यांच्या मध्ये गेले. ते व इतर मोजके डिकास्ट झाले ही असतील. प्राइड या मनोविश्लेषण तज्ञाने केलेल्या मांडणीनुसार या सहकाऱ्यांच्या अबोध मनाचा(sub concious mind)शोध घेतल्याचे वाचनात नाही.
जाती अंत, ब्राह्मणवाद याबद्दल बोलणारे आमचे दुसरे गुरु डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी मला नुकतेच गांधी भवन मध्ये बोलावून घेतले आणि ब्राह्मणाविरुद्ध बोलणे योग्य नाही अशी समज दिली. त्याबद्दल मी यापूर्वीच सविस्तर पोस्ट टाकलेली आहे. "आपण जसे निर्मळ आहोत तसं जग ही निर्मळ असतं हे आपल्याला वाटतं. पण हे खरं नाही सुरेश"असं माझी मोठी बहीण मला म्हणाली होती. मला ते पटतं.
बाबा माझे आदर्श. वंचित दुबळ्या माणसाकडे आपुलकीने पाहण्याचे माझ्या आई प्रमाणेच मी बाबांच्या कडून शिकलो. बाबांनी खूप मोठे काम केले. त्यापेक्षाही मोठे काम करण्याचे नैतिक, वैचारिक बळ त्यांचे कडे होते पण या ब्राह्मणी व्यवस्थेने त्यांच्या कार्याला कुंपण घालून दिले. बहुजनांच्या उद्धारासाठी यापुढे तर मोठ्या चळवळींची गरज आहे. बाबांना खरोखर श्रद्धांजली द्यायची असेल तर त्यांनी दाखवलेल्या तसेच आणखी नाविन्यपूर्ण पद्धती शोधून बहुजनांच्या प्रगती भोवती उभे केलेले हे ब्राह्मणी कुंपण उध्वस्त करण्यासाठी पुन्हा नव्याने लोकशाही मार्गाने पुरोगामी चळवळींची आखणी रचना(design), अंमलबजावणीची (implementation)व्यूह रचना, शिकणे (learning,training) या बाबींवर काम करणे गरजेचे वाटते.
बाबा आढाव या माझ्या वैचारिक पित्यास पुन्हा श्रद्धांजली वाहतो व त्यांनी सुरू केलेले काम पुढे नेण्याचा निर्धार करतो.
सत्य की जय हो!
सुरेश खोपडे
0 टिप्पण्या