आज आम्ही प्रदुषणाच्या मुद्द्यावर मास्क घालून आलो होतो. मात्र आम्हाला बसायलाही जागा दिली नाही. भाजपच्या पहिल्या महापौर बसल्यानंतर आम्ही मात्र जमिनीवर होतो. देवाभाऊंची बहिण महापौराच्या खुर्चीवर आणि आमच्या बहिणी जमिनीवर होत्या, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नगरसेवक अश्रफ आजमी यांनी दिली. यावेळी काँग्रेसच्या महिला नगरसेवकांनी आक्रमक होत घोषणाबाजी केली. आम्ही पाठच्या मागी होतो, कलकलाट ऐकायला येत होता. घोषणा प्रति घोषणा सुरु होत्या. निवडणूक बिनविरोध होती, त्यामुळे बाकी काही घोषणांचा प्रश्नच नाही. महापौर आणि उपमहापौर निवडणूक होती, आज केवळ औपचारिकता बाकी होती. नेमकं काय झालं हे कळलं नाही, पेडणेकर यांनी आरोप केले हे आत्ताच कळलं. नियोजन दिसलं नाही, 227 नगरसेवक होते मग लोकांना बसायला का नाही मिळालं? असा सवाल मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी केला आहे.
महायुतीच्या सगळ्या नेत्यांचे मी आभार मानतो, अशी प्रतिक्रिया उपमहापौर संजय घाडी यांनी दिली. काँग्रेसला महाराष्ट्रात जागा नाही, त्यांच्यासाठी जागा नव्हती, ठाकरेंचे नगरसेवक तिकडे बसले. मुख्यमंत्री यांच्या लाडक्या बहिणी शहर आणि ग्रामीण भागात खुश आहेत. नगरसेवक आणि नगरसेविका त्यांचे आसन मिळण्याचा अधिकार होता, असं मनापासून वाटत. ठाकरेंच्या नगरसेवकांकडून सभात्याग करणे हे वारंवार होईल. मात्र, आजच्या दिवशी होईल अस वाटलं नाही, अशी प्रतिक्रिया घाडी यांनी ठाकरेंच्या नगरसेवकांनी केलेल्या वॉक आऊटवर दिली. लोकशाहीला साजेल अस त्यांनी वागायला पाहिजे होते, जनतेने दाखवलं ना, खोके कोणाकडे आणि ओके कोण झाले ते. जिल्हा परिषदेत आमचे दुसऱ्या क्रमांकावर लोकप्रतिनिधी निवडून आले आहेत. मग त्यांनी विचारावं ओके कोण? असा सवालही घाडी यांनी केला.दरम्यान, मुंबईत रस्ते आणि पायवाटांवर अनधिकृतरित्या अतिक्रमण केलेल्या बांगलादेशीचे जात प्रमाणपत्र व बोगस आधारकार्ड शोधून त्यावर त्वरित कारवाई करून त्यांना पोलिसांच्या हवाली करण्यात येईल, असे महापौर रितू तावडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मुंबईची महापौर म्हणून माझी निवड झाल्यानंतर प्रथमच मी बृहन्मुंबई महानगरपालिका वार्ताहर कक्षात आले असून याठिकाणी उपस्थितीत मुद्रीत व इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधीचे मनापासून स्वागत करते. तसेच आपल्या सर्वाच्या सहकार्याने महापौरपदाची पुढील वाटचाल करावयाची असल्याने सर्वांच्या सूचनांचा मी आदरपूर्वक स्विकार करते. माझ्या कारकिर्दीत बृहन्मुंबई महानगरपालिकेची वैद्यकीय सेवासुविधा अधिक दर्जेदार होण्यासाठी गतकाळातील अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेले परंतु पुर्तता न झालेले पूर्व उपनगरामध्ये राजावाडी व इतर रुग्णालयांना एकत्रित करुन वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरु करण्यासाठी माझ्या कारकिर्दीत संपूर्ण प्रयत्न करणार आहे असल्याचे त्यांनी यावेळी प्रसार माध्यमांना सांगितले.
त्यासोबतच पूर्व उपनगरातील नागरिकांची मागणी लक्षात घेता, याठिकाणी अद्ययावत कॅन्सर रुग्णालय सुरु करण्याचा माझा मानस आहे. महापौर म्हणून मला मिळणारे मानधन महापौर निधीत जमा करणार. विविध संस्था व संघटना यांच्यावतीने होणाऱ्या सत्कार समारंभावर सदरहू संस्थानी खर्च करण्यापेक्षा सदर निधी सढळ हस्ते महापौर निधीत जमा करण्याचे महापौर म्हणून मी सदर संस्था व संघटना यांना आवाहन करते. जेणेकरुन दुर्धर आजारातील गरजू व गरीब रुग्णांना अधिकाअधिक आर्थिक मदत देता येणे शक्य होईल. त्याचप्रमाणे मुंबई शहर व उपनगरात निर्माण होणाऱ्या ओला व सुका कचऱ्याचे नियमीतपणे वर्गीकरण करुन त्या त्या विभागामध्ये विघटन करणारी यंत्रणा उभी करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. जेणेरुन कचऱ्याच्या वाहतूकीवर होणाऱ्या खर्चात बचत होऊन कांजूर क्षेपणभूमीवरील दुर्गधी कमी करता येईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे सुरक्षित विकसीत गतीशिल मुंबई करण्याचा माझा प्रयत्न राहणार असल्याचे तावडे यांनी सांगितले.
निवडीनंतर महापौर रितू तावडे व उपमहापौर संजय घाडी यांनी केलेल्या भाषणातून मुंबईच्या विकासाची रूपरेषा मांडली. त्यानंतर त्यांनी सभागृहातील महापुरुषांच्या पुतळ्यांना आणि महानगरपालिका मुख्यालयासमोर सर फिरोजशहा मेहता यांचा पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा, हुतात्मा स्मारक, चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक येथे पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. तसेच, प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले.


0 टिप्पण्या