Top Post Ad

बाबासाहेबांची समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही त्रिसुत्री आमची मार्गदर्शक ..उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

बौद्ध हा केवळ धर्म नसून ती एक व्यापक सामाजिक विचारसरणी आहे. तो फक्त श्रद्धेचा विषय नाही, तर परिवर्तनाची चळवळ आहे. ही केवळ धार्मिक क्रांती नसून सामाजिक आणि राजकीय क्रांती होती. बुद्धांचे विचार हे प्रवचनापुरते मर्यादित नसून आचरणासाठी आहेत. बुद्ध पेरले की बाबासाहेब उगवतात,  बाबासाहेबांचे उपकार कधीही विसरता येणारे नाहीत. आज आम्ही जेव्हा सरकार म्हणून काम करतो तेव्हा बाबासाहेबांची समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही त्रिसुत्री आमची मार्गदर्शक असते. या त्रिसुत्रीवर आम्ही आमचा कारभार करतो.  असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


बुद्धरत्न सागर वेलफेअर फाउंडेशनतर्फे   ठाण्यातील गडकरीरंगायतन येथे सम्राट अशोक जयंतीनिमित्ताने  आठवी आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली होती.  या वेळी खासदार ज्योती वाघमारे, महापौर शर्मिला पिंपळोलकर, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, प्रवक्ते किरण सोनावणे, नगरसेविका उषा वाघ, मुख्य आयोजक बुद्धरत्नसागर सोशल वेलफेअर फाऊंडेशनचे संस्थापक-संचालक भंते रत्नप्रिय थेरो, सहआयोजक प्रमोद इंगळे तसेच अनेक मान्यवर आणि भदन्त विशुद्धानंद महाथेरो,  भदन्त विनयबोधी महाथेरो, भन्ते अत्थदर्शी, भन्ते शांतीप्रिय, भंते डॉ. राजरत्न, भन्ते रत्नप्रिय, भन्ते केआर लामा, भंते आरा आनंद थेरो, भंते संबोधी थेरो आणि भंते शिलबोधी थेरो तसेच विविध देशांतून आलेला भिक्खूसंघ आणि बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय या त्रिसरणांचा उच्चार करून भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून शिंदे यांनी उपस्थित भिक्खू संघ, विद्वान, विचारवंत आणि धम्मप्रेमी बांधव-भगिनींचं स्वागत केलं. ठाण्याच्या ऐतिहासिक वारशाचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की, सम्राट अशोक आणि सातवाहन काळात या भूमीत बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला होता. कान्हेरी लेणी आणि प्राचीन सोपारा (नालासोपारा) येथील स्तूप व शिलालेख हे त्याचे पुरावे आहेत. त्यामुळे ठाण्यात ही परिषद होणं अभिमानास्पद आहे. धम्म परिषद ही धम्मचळवळीतील महत्त्वाची घटना असल्याचं सांगत त्यांनी आयोजक भंते रत्नप्रिय थेरो आणि त्यांच्या भिक्खूसंघाचं कौतुक केलं. भिक्खू संघाला संघदान करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत, संघदान ही केवळ परंपरा नसून भिक्खू संघाच्या माध्यमातून बुद्धांच्या शिकवणीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना आहे, असं ते म्हणाले.

जगातील वाढत्या युद्धपरिस्थितीचा संदर्भ देत त्यांनी इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावाचा उल्लेख केला. द्वेषाने द्वेष संपत नाही, प्रेमानेच तो शांत होतो, हा बुद्धांचा संदेश आजच्या काळात अधिक महत्त्वाचा असल्याचं त्यांनी नमूद केलं. जगाला युद्ध नको, बुद्ध हवा, असा संदेश देत ते पुढे म्हणाले, १४ ऑक्टोबर १९५६ रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदिक्षा घेतली. लाखो लोकांना समानतेचा आणि स्वाभिमानाचा मार्ग मिळवून दिला. बाबासाहेबांनी आपल्याला केवळ संविधान दिले नाही, तर या मातीला बुद्धांचा धम्म पुन्हा मिळवून दिला. बाबासाहेबांमुळे माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री होऊ शकलो, आज जगभरातील शांतता आणि स्थैर्य धोक्यात आहे, सीमांवर तणाव आहे, निरपराध नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे, लहान मुलांचे बळी जात आहेत याचे वाईट वाटत आहे. आपण मानवता विसरुन चाललो आहोत. युद्धाच्या झळा संपूर्ण जगाला सोसाव्या लागत आहेत. अशा काळात भगवान गौतम बुद्धांची शिकवण जगाला वाचवू शकते, असे स्पष्ट मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.  

या परिषदेच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांना ‘बौद्धरत्न’ पुरस्कार २०२६ देण्यात आला. या सन्मानाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त करतांना ते म्हणाले, या गौरवाबद्दल मी स्वत:ला अत्यंत भाग्यवान समजतो. या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी आणखीन वाढली आहे. तुम्ही दाखवलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही असा शब्द देतो.

या धम्मपरिषदेत भिक्खूसंघानेही धम्मदेसना दिली. ज्यामध्ये प्रामुख्याने जपानहून आलेले भन्ते युशी शिमादा आणि लाओसहून आलेले व्हेन.झेंझॉन बॉनधाविंग यांच्यासह भदन्त विशुद्धानंद आणि भदन्त विनयबोधि यांनी उपस्थितांना धम्मदेसना दिली. या वेळी अनेक मान्यवरांचा विविध पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कविसंमेलनाने परिषदेची सांगता झाली. संपूर्ण परिषदेचे सुत्रसंचालन राम बिडकर आणि प्रभाकर जाधव यांनी केले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com