Top Post Ad

अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो..... कंत्राटदारांच्या फायद्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी ?

 वाढत्या ठाणे शहरासाठी एक मजबूत आणि सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था  असणे अत्यंत आवश्यक आहे, या मताशी आम्ही पूर्णपणे सहमत आहोत. मात्र, सरकारने केवळ कंत्राटदारांच्या फायद्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी न करता, संपूर्ण तथ्यांच्या आधारे आणि थेट लोकसहभागातून  योग्य नगरनियोजन करावे. प्रशासनाने नागरिकांच्या या मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा `सिटिझन्स फॉर सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट ठाणे' या संघटनेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आला.  नामवंत नगररचनाकार, लेखिका आणि वास्तुविशारद सुलक्षणा महाजन यांच्यासह निवृत्त प्रा. वनस्पतीशास्त्र तज्ञ डॉ. नागेश टेकाळे आणि प्रख्यात वकील हेमा रमणी यांच्यासह ठाण्यातील रहिवाशांनी एकत्रित येत सिटीझन्स फॉर सस्टेनेबल  ट्रान्सपोर्ट (सीएसटी-ठाणे) ही नगर नियोजन तज्ञ आणि नागरी हक्क कार्यकर्त्यांची  संयुक्त समिती स्थापन केली आहे. या समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत   ठाण्यातील अनेक सजग रहिवासी मोठ्या संख्येने  उपस्थित होते.  

`सिटिझन्स फॉर सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट ठाणे' या संघटनेच्या प्रतिनिधींनी मागील दोन महिन्यांपासून या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोच्या विविध तांत्रिक आणि भौगोलिक बाजूंचा सखोल अभ्यास केला होता. या अभ्यासातून समोर आलेली धक्कादायक माहिती आणि सादरीकरण यावेळी ठाणेकरांसमोर मांडण्यात आले.
प्रस्तावित मेट्रो मार्गामध्ये तब्बल 82 तीव्र वळणे आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या वळणांमुळे मेट्रोचा दैनंदिन देखभाल आणि संचालन खर्च कमालीचा वाढणार आहे. ठाणे रेल्वे स्थानकाजवळ केल्या जाणाऱया भुयारी कामांमुळे येथील अनेक जुन्या इमारती, व्यावसायिक दुकाने आणि काही महत्त्वाच्या सार्वजनिक सुविधा कायमच्या हटवाव्या लागू शकतात, ज्यामुळे मोठा विस्थापन प्रश्न निर्माण होईल.  

प्रस्तावित मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी बस, पादचारी आणि सायकलस्वारांसाठी कोणतेही पुरेसे आणि एकात्मिक नियोजन करण्यात आलेले नाही. तसेच प्रकल्प अहवालात दाखवण्यात आलेली संभाव्य प्रवासी संख्या अत्यंत अवास्तव आणि फुगवून सांगितलेली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.    या प्रकल्पाच्या उभारणीत ठाण्यातील तब्बल 3,200 पेक्षा अधिक जुन्या आणि मोठ्या झाडांवर क्रुहाड चालणार आहे. यामध्ये अनेक हेरिटेज (वारसा) वृक्षांचा समावेश असून, त्यांची अधिकृत प्रशासकीय नोंदच अपुरी असल्याचे सांगण्यात आले. ठाणे मेट्रोच्या सविस्तर प्रकल्प अहवालात  थेट नागपूर मेट्रोचा संदर्भ आणि आकडेवारी वापरण्यात आली आहे. ठाणे आणि नागपूरच्या भौगोलिक तसेच सामाजिक परिस्थितीत प्रचंड फरक असताना, ठाण्याची वेगळी भौगोलिक परिस्थिती प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्षित केल्याचा आरोपही तज्ञांनी केला.  

ठाणेकरांचा प्रवास सुखकर व्हावा, त्यांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी ठाणे शहरात रिंग रेल्वे मेट्रोच्या (वर्तुळाकार मेट्रो) कामाला केंद्र आणि राज्य शासनाने मंजूरी दिली आहे. हा मेट्रो प्रकल्प 29 कि.मी. लांबीचा असून 26 कि.मी. जमिनीवरून तर 3 कि.मी. जमिनी खालून जाणार आहे.  डोंगरीपाडा, वागळे इस्टेट, बाळकूम, कासारवडवली आणि जंक्शनसह  22 स्थानकांचा अंतर्भाव असलेल्या या मार्गाचा रोज 6:47 लाख प्रवाशांना उपयोग होईल असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. 12 हजार 200 कोटी रुपयांच्या खर्चातून उभा राहणाऱया या या प्रकल्पाच्या कामांना महामेट्रो प्राधिकरणाकडून ठाणे शहरात सुरूवात करण्यात आली आहे.  परंतु या प्रकल्पास नियोजन तज्ञ आणि स्थानिक रहिवाशांनी विरोध दर्शवला आहे. प्रकल्पाच्या सविस्तर अहवालातील मूलभूत त्रुटी, प्रवासी संख्येचे अवास्तव अंदाज, विद्यमान मेट्रो मार्गांशी होणारी पुनरावृत्ती, पर्यावरणीय धोक्यांकडे दुर्लक्ष आणि नागरिकांना विश्वासात न घेता होणाऱया कामांना तात्काळ स्थगिती देण्यासाठी सिटिझन्स फॉर सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट या संस्थेकडून मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यात आली आहे. त्यामुळे ठाणे रिंग मेट्रो प्रकल्प वादात सापडला आहे.  

सुमारे 12 हजार 200 कोटींच्या या अंतर्गत रिंग मेट्रोच्या कामात नियोजनशून्यता आहे. ठाणे स्टेशनची सर्वांत अवघड ठरणारी भूमिगत मेट्रो ही चेंदणी कोळीवाड्यातील नागरिकांसह इतरांसाठीही धोका आहे. अपघाताचे धोके असलेल्या ठाणे स्टेशनचे काम कशाप्रकारे होणार, याचा आधी विचार व्हावा. स्टेशनजवळील या कामासाठीच्या खड्ड्यात मासुंदा तलावाइतके पाणी निर्माण हाईल.  मुळात खर्चिक प्रकल्पातून खर्चही वसूल होणार नाही. हे लक्षात घेता योग्य पारदर्शकता स्पष्ट होत नाही तोपर्यंत या प्रकल्पाला तीव्र विरोध  राहील. या प्रकल्पांसाठी कोट्यावधींचा खर्च करण्याऐवजी टीएमटीचा विस्तार, सायकल ट्रक, पदपथांचा विस्तार, उपनगरीय रेल्वेचे एकत्रिकरण आणि पार्किंग व्यवस्थापन करून वाहतुक सुरळीत करण्याची आवश्यकता आहे. - वकील हेमा रमणी 

एमएमआरडीए आणि महामेट्रो प्राधिकरणातील समन्वयाच्या अभावामुळे या स्थानकांमधील कनेक्टिव्हिटीचा प्रश्न निर्माण होणार आहे. या मेट्रोचा तीन किमीचा भूमिगत भाग शहराच्या सर्वाधिक गर्दीच्या केंद्रातूनच जातो. 200 मीटर लांब, 25 मीटर रुंद आणि 20 मीटर खोल खड्डे होणार आहेत. त्यामुळे सध्याचा सॅटीस, एसटी आगार, ठाणे रेल्वे स्थानक बुकिंग क्षेत्रासह पादचारी प्रवेशद्वारांवर अडथळे येणार आहेत. दीर्घकालीन वाहतूक कोलमडण्याचीही भीती आहे. सोपी स्टेशन आधी बांधायला घेण्यापेक्षा वाहतूक, पर्यावरण, पुराचा धोका असलेल्या ठाणे स्टेशनचा सर्वांत आधी विचार व्हावा. प्रदूषणासह झाडांची कत्तल होणार आहे.  जोपर्यंत प्रशासनाकडून या प्रकल्पाचे योग्य नियोजन आणि बाधित वृक्षांबाबत स्पष्टीकरण होत नाही, तोपर्यंत या मेट्रोला विरोध करणार - सुलक्षणा महाजन, वास्तुरचनाकार, ठाणे.   

सविस्तर प्रकल्प अहवालामध्ये या प्रकल्पामुळे केवळ 662 झाडांवर परिणाम होण्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात या मार्गावरील 3 हजार 224 पेक्षा अधिक झाडे पुनर्रोपणासाठी चिन्हांकिंत करण्यात  आले आहे. येथील झाडे तोडणे, स्थलांतरीत करण्याऐवजी त्याची छाटणी करूनही ही झाडे राखू शकतो. - डॉ. नागेश टेकाळे  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com