Top Post Ad

मुसळधार पाऊस; महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असून अनेक भागांत ३००  मिलीमीटरहून अधिक पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत असून ७ हजारांहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.सतत पडणाऱ्या पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्याची परिस्थिती निर्माण झाली असली तरी महानगरपालिकेने स्थापित केलेले उदंचन (Dewatering) पंप, पर्जन्यजल उपसा केंद्रे तसेच पूरनियंत्रण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे साचलेल्या पाण्याचा वेगाने निचरा होत असून वाहतूक सुरळीत सुरू आहे.


महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सखल भाग, रेल्वे स्थानके, महत्त्वाचे रस्ते, पूल तसेच किनारी भागांवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. संबंधित विभागांचे अभियंते, कर्मचारी आणि नियंत्रण कक्ष  अहोरात्र २४ तास कार्यरत असून नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यात येत आहे.नालेस्वच्छता, पर्जन्यजल वाहिन्या आणि जलनिचरा व्यवस्थेची नियमित पाहणी सुरू असून आवश्यकतेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री घटनास्थळी पाठविण्यात येत आहे. तसेच झाडे पडणे, शॉर्टसर्किट, जलभराव किंवा इतर आपत्कालीन परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथके आणि इतर संबंधित यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी केले आहे.

दरम्यान, पावसाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. महानगरपालिका नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवत असल्याचे महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी नमूद केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com