Top Post Ad

Filmnews सामना’ चित्रपटात आजही प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत खेचून आणण्याची ताकद

सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या ‘दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळा’तर्फे मराठी चित्रपटसृष्टीतील अजरामर कलाकृती ‘सामना’ या चित्रपटाचे प्रदर्शन प्रभादेवी येथील पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघुनाट्यगृहात करण्यात आले. १९७५ साली प्रदर्शित झालेल्या ‘सामना’ या चित्रपटाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आणि ज्येष्ठ अभिनेते स्व. निळू फुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री मा. अॅड. आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत या विशेष शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ साहित्यिक व निर्माते रामदास फुटाणे, सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्यासह महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी चित्रलेखा खातू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मराठी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या ‘सामना’ चित्रपटातील आशय तब्बल पाच दशकांनंतरही प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो आणि तो पाहण्यासाठी चित्रपटगृहापर्यंत खेचून आणतो, हीच या चित्रपटाची खरी ताकद आहे, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी या अभिजात कलाकृतीचे महत्त्व विशद केले. ‘सामना’ चित्रपटाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष प्रदर्शनाला प्रेक्षकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद पाहिल्यावर ‘दादासाहेब फाळके रसास्वाद मंडळा’च्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार, आशयघन आणि कालातीत चित्रपट नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न सार्थ ठरत असल्याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला.‘
सामना’च्या या विशेष प्रदर्शनाला एकच गर्दी करत आजही हा चित्रपट त्यांच्या मनात किती घर करून आहे याची प्रचिती चित्रपटप्रेमी आणि रसिकांनी दिली. लघु नाट्यगृह पूर्ण भरल्याने उपस्थित रसिकांसाठी सभागृहाबाहेर स्क्रीनची व्यवस्था करून तिथेही हा चित्रपट दाखवण्यात आला. याप्रसंगी उपस्थित रसिकांशी संवाद साधताना, “निळू फुले, डॉ. श्रीराम लागू यांच्या दमदार अभिनयाने, डॉ. जब्बार पटेल यांच्या प्रभावी दिग्दर्शनाने आणि विजय तेंडुलकर यांच्या सशक्त लेखणीतून साकारलेल्या ‘सामना’ चित्रपटात सत्ता आणि नैतिकता यांच्यातील संघर्ष, समाजातील विषमता, सत्तेचा माज आणि गुन्हेगारीकरण यांसारखे विषय प्रभावीपणे मांडले आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होऊन पन्नास वर्षं लोटली तरी त्यातली प्रासंगिकता आजही कायम आहे”, असे सांस्कृतिक कार्यमंत्री अँड. आशिष शेलार यांनी सांगितले. “दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचा हा उपक्रम सुरू करण्यामागे केवळ चित्रपट प्रदर्शित करणे हा उद्देश नसून नव्या पिढीची सांस्कृतिक आणि वैचारिक जडणघडण करणे हा आहे. दृकश्राव्य माध्यमातून समाजमन घडते, विचार समृद्ध होतात आणि संस्कारांची परंपरा पुढे जाते”, असेही त्यांनी सांगितले.

चित्रपट प्रदर्शनानंतर आयोजित संवाद सत्रात ‘सामना’चे दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, निर्माते रामदास फुटाणे आणि गायक रवींद्र साठे यांनी चित्रपटाच्या निर्मितीशी संबंधित आठवणी, अनुभव आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या प्रवासाविषयी उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी बोलताना, चित्रकला शिक्षक म्हणून कारकिर्दीची सुरुवात केल्यानंतर वसंत सबनीस, दादा कोंडके या दिग्गजांच्या सहवासामुळे चित्रपटसृष्टीशी जवळीक कशी निर्माण झाली, याची आठवण रामदास फुटाणे यांनी सांगितली. दादा कोंडके यांच्यामुळे ‘सोंगाड्या’ चित्रपटाच्या निर्मितीची संधी मिळाली, हे सांगतानाच काही चित्रपटांनंतर निर्माता म्हणून या क्षेत्रात काय करू नये, याची जाणीव झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. गावाकडे राजकारण जवळून पाहिले होते, आवडही होती. त्यामुळे या विषयावर विजय तेंडुलकरांसारखा लेखक उत्तम लिहू शकेल म्हणून त्यांच्याकडे पाठपुरावा केला. अथक प्रयत्नांनंतर त्यांनी होकार दिला आणि ‘सामना’ची कथा जन्माला आली. या चित्रपटाला मिळालेल्या यशामुळेच महाराष्ट्रात निर्माता म्हणून माझी ओळख झाली, अशी आठवणही रामदास फुटाणे यांनी सांगितली. 

तर दिग्दर्शक म्हणून पहिल्याच चित्रपटात निळू फुले आणि डॉ. श्रीराम लागू यांच्यासारख्या दोन प्रतिभावान कलाकारांबरोबर काम करताना आलेला अनुभव डॉ. जब्बार पटेल यांनी सांगितला. 'दोन मोठे कलाकार एकत्र काम करत असतात, तेव्हा त्यांच्यात होणारी अभिनयाची देवाणघेवाण कशा पध्दतीची असेल याचा ते विचार करतात. 'सामना'च्या मुहूर्ताच्या प्रसंगाला निळू फुले यांच्यावर दृश्य चित्रित होणार होतं आणि त्यावेळी डॉ. लागू खूप अस्वस्थ होते. त्यांच्या अस्वस्थतेचं कारण विचारल्यावर त्यांनी सांगितलं निळू फुले नेमक्या किती उच्च स्वरात संवाद म्हणणार आहेत याचा विचार करतो आहे. दोघेही खर्जात बोलणारे कलाकार... त्यामुळे जेव्हा निळू फुले यांनी खर्जात जगदंब... असा शब्द उच्चारत सुरुवात केली, तेव्हा डॉ. लागूंनी आपल्या आवाजाचा स्तर पूर्णपणे बदलला. त्यांचा आवाज कसा असेल, कुठल्या स्वरात ते संवाद म्हणतील हे नव्याने नियोजन केल्यानंतर चित्रिकरणाला सुरुवात झाली, अशी आठवण डॉ. जब्बार पटेल यांनी सांगितली. या संवाद सत्रालाही प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com