‘भाजप ज्या पद्धतीने वागत आहे. पेपर फुटत आहेत, पक्ष फोडले जात आहेत, आता मंदिरातील तिजोऱ्या फोडल्या जात आहेत. हेच हिंदू राष्ट्र तुम्हाला अपेक्षित होतं काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना केला. अयोध्येतील राम मंदिर करोडो हिंदूंच्या भावनेतून उभे राहिले आहे. त्यावर पडलेला दरोडा हा केवळ दानपेटीवरचा दरोडा नाही, हिंदूंच्या भावनेवरचा आणि श्रद्धेवरचा दरोडा आहे. म्हणूनच आम्ही रामरक्षा आंदोलन करण्याचा लढा आजपासून सुरू करतोय. चोरांनो मधे येऊ नका. मला रामरक्षा स्तोत्र येत नसेल, पण मला रामाची रक्षा करायला येते. तुम्हाला रामरक्षा म्हणता येते म्हणून चोरी माफ होणार नाही, आता रामभक्त विरुद्ध राम मंदिर चोर असा लढा आहे. फडणवीस आणि भागवत हे रामभक्तांच्या बाजूने आहेत की चोरांच्या, याचं उत्तर त्यांनी द्यावं, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी नागपूरातून केले.
अयोध्येतील राम मंदिराच्या लुटीविरोधात नागपूरमध्ये रामरक्षा आणि महाआरतीचा गजर घुमला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाला रामभक्त आणि शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती. या जनसमुदायाच्या साक्षीने उद्धव ठाकरे यांनी देणगी चोरांवर व त्यांना पाठीशी घालणाऱयांवर जोरदार हल्ला चढवला. तसेच मंदिर चोरीचा विषय धसास लागत नाही तोपर्यंत सोडणार नाही. अयोध्या आणि काशी विश्वनाथासमोरही आंदोलन करणार, अशी घोषणाच उद्धव ठाकरे यांनी केली. यावेळी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते खासदार संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, सुनील प्रभू, अंबादास दानवे, नितीन देशमुख, सूरज चव्हाण यांच्यासह काँग्रेस नेते सुनील केदार, काँग्रेस खासदार शाम बर्वे, राष्ट्रवादीचे प्रकाश गजभिये, सलील देशमुख आदी उपस्थित होते.
भाजपचा विधानसभा अध्यक्ष लोकांच्या भावना दुखावणारं बोलत असतानाही भागवत यांना काही वाटत नसेल तर त्यांचे हिंदुत्व ढोंगी आहे, आमच्या हिंदू राष्ट्रात रामराज्य अपेक्षित आहे, शिवशाही अपेक्षित आहे. गोरगरीबांना विद्यार्थ्यांना न्याय देणारं आमचं हिंदू राष्ट्र आहे. कंत्राटदारांना अभय देणारं हे आमचं हिंदू राष्ट्र असू शकत नाही. हिंदूंनी दोन ते तीन अपत्य जन्माला घातली पाहिजे, असे मोहन भागवत म्हणाले होते. आता आहेत त्या अपत्यांच्या परीक्षेचे पेपर फुटले, अनेकांनी आत्महत्या केल्या, त्याचं काय करणार? आणखी अपत्य जन्माला घालून तुम्ही त्यांनाही असेच चिरडणार का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. राम मंदिरातील चोरी ही एकमेव नाही. केदारनाथ, बद्रीनाथमध्येही चोरी झाली आहे. उज्जैनमध्ये जमीन घोटाळा झाला, अयोध्येत जमीन घोटाळा झाला, अयोध्येत मंदिराच्या नावाने स्वस्तात जमिनी खरेदी करून शतपटीने किमती वाढवून ट्रस्टला विकल्या गेल्या. भाजपच्या या कारभारामुळे रामभक्तांना प्रभू रामाचे रक्षण करण्याची वेळ आली आहे, हे हिंदूंचे दुर्दैव आहे. ज्या पद्धतीने भाजप वागत आहे ते पाहता यांच्यात श्रीरामाऐवजी सैतानाचा आत्मा घुसला की काय असा प्रश्न पडतो,’
मंदिर चोरीप्रकरणी स्थापन केलेली एसआयटी हे थोतांड आहे. नाटक आहे. या प्रकरणाचा निकाल लावायचा असेल तर निवृत्त न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करा. हे न्यायमूर्तीसुद्धा गोगलगायीसारखे नकोत. आरत्या ओवाळणारे नकोत. निःस्पृह आणि निष्पक्षपातीपणे काम करणारे अभय ओकांसारखे न्यायाधीश नेमा. मग ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊन जाईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ‘हा फक्त मंदिरावरचा किंवा दानपेटीवरचा दरोडा नाही, तमाम हिंदूंच्या भावनेवर, श्रद्धेवर घातलेला हा दरोडा आहे. आता जनतेनेच न्यायाधीश होण्याची वेळ आली आहे. जगातल्या प्रत्येक हिंदूने न्यायाधीश बनून मंदिर चोरीचा न्यायनिवाडा करायला हवा, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

0 टिप्पण्या