भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मुंबई विभागीय केंद्रातर्फे आयोजित पत्रपरिषदेत 'खेलो इंडिया पुनरुज्जीवित योजना (२०२६-३१) ची अधिकृत घोषणा करण्यात आली. केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत देशातील क्रीडा परिसंस्थेला बळकट करण्यासाठी आणि तळागाळातील गुणवंत खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. अशी माहिती मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत साई मुंबईचे प्रादेशिक संचालक पांडुरंग चाटे यांनी दिली. परिषदेस सहाय्यक संचालक अंकित पाटील, पॅरा-बॅडमिंटनपटू प्रमोद भगत, सुकांत कदम व टेनिसपटू ऋतुजा भोसले उपस्थित होत्या.
२०२६ ते २०३१ या ५ वर्षांच्या कालावधीसाठी ३६,४४१ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून, हा निधी आधीच्या तरतुदी पेक्षा तब्बल आठ पटीने जास्त आहे. या योजनेद्वारे पाठबळ मिळणाऱ्या खेळाडूंची संख्या १० पटीने वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्यातील शाळा, क्रीडा केंद्र, उदयोन्मुख खेळाडू आणि उच्च-कार्यक्षमता प्रशिक्षणाला जोडून 'महाराष्ट्र-टू-पॉडियम' ही यंत्रणा अधिक भक्कम केली जाईल. ए आय आणि व्हिडिओ-आधारित टॅलेंट स्काउटिंग, एआय-आधारित कामगिरी विश्लेषण आणि डिजिटल ट्रॅकिंग तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी 'राष्ट्रीय कोच मान्यता मंडळ' स्थापन केले जाईल. तसेच डॉक्टर, फिजियोथेरपिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ व पोषणतज्ज्ञांची मदत पुरवली जाईल. 'खेलो इंडिया युथ गेम्स' व 'युनिव्हर्सिटी गेम्स' व्यतिरिक्त पॅरा गेम्स, हिवाळी खेळ, बीच गेम्स, ट्रायबल गेम्स, वॉटर स्पोर्ट्स आणि 'अस्मिता महिला लीग' आयोजित केल्या जातील.

0 टिप्पण्या