बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अभियंता संवर्गातील बदल्या, पदोन्नती आणि पदस्थापना प्रक्रिया प्रशासकीय गरज, रिक्त पदे, विनंती अर्ज तसेच प्राप्त शिफारशींचा विचार करून पारदर्शक व निःपक्षपाती पद्धतीने करण्यात येतात. अभियंता संवर्गाच्या बदल्यांबाबत कोणत्याही प्रकारचा अन्याय झाल्याची किंवा आक्षेपाची तक्रार प्राप्त झालेली नाही. तसेच, अभियंत्यांना महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये काम करण्याचा अनुभव मिळावा आणि सर्वांना समान संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने कनिष्ठ अभियंता, दुय्यम अभियंता आणि सहाय्यक अभियंता यांच्या बदल्या 'ऑनलाइन' पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांच्या मान्यतेनुसार, बदलीस पात्र अभियंत्यांना दिनांक ५ सप्टेंबर ते दिनांक २० सप्टेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करून आपल्या पसंतीचे प्राधान्यक्रम नोंदविता येणार आहेत.
दिनांक २७ जानेवारी २०२१ रोजीच्या धोरणानुसार अभियंता संवर्गातील बदल्या दरवर्षी केवळ १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या धोरणानुसार प्राप्त अर्ज व शिफारशींचा विचार करून नगर अभियंता कार्यालयामार्फत दुय्यम अभियंता (स्थापत्य) तसेच सहाय्यक अभियंता (स्थापत्य, यांत्रिकी व विद्युत) यांच्या बदल्या प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. त्यानुसार, ऑक्टोबर २०२५ मध्ये १२२ दुय्यम अभियंता (स्थापत्य), ३४ सहाय्यक अभियंता (स्थापत्य) आणि सात सहाय्यक अभियंता (यांत्रिकी व विद्युत) यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र, दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ रोजी महानगरपालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार या बदली आदेशांना स्थगिती देण्यात आली. त्यानंतर महानगरपालिका आयुक्त यांच्या मंजुरीने हे बदली आदेश रद्द करण्यात आले.अभियंता संवर्गातील नियतकालिक बदल्या प्रशासकीय गरजेनुसार तसेच अत्यावश्यक विनंतीच्या आधारे करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त यांच्या मंजुरीने स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत उप आयुक्त (अभियांत्रिकी), उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी), प्रमुख अभियंता (विकास नियोजन), प्रमुख अभियंता (यांत्रिकी व विद्युत) यांचा सदस्य म्हणून तर नगर अभियंता यांचा सदस्य सचिव म्हणून समावेश आहे.
या समितीच्या माध्यमातून १४२ दुय्यम अभियंता (स्थापत्य) आणि २७ सहाय्यक अभियंता (स्थापत्य) यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांसाठी संबंधित अभियंत्यांचे विनंती अर्ज, विविध खात्यांकडून आलेल्या विनंत्या, विभागांमधील रिक्त पदांची उपलब्धता तसेच काही मान्यवरांकडून प्राप्त शिफारशींचा विचार करण्यात आला आहे. ऑक्टोबर २०२५ ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत अभियंता संवर्गातील विविध पदांवरील मोठ्या प्रमाणातील रिक्त पदे पदोन्नतीने भरण्यात आली आहेत. यामध्ये उपप्रमुख अभियंता (स्थापत्य) ३२, उपप्रमुख अभियंता (यांत्रिकी व विद्युत) १३, कार्यकारी अभियंता (स्थापत्य) १६२, कार्यकारी अभियंता (यांत्रिकी व विद्युत) ५२, सहाय्यक अभियंता (स्थापत्य) ६५, सहाय्यक अभियंता (यांत्रिकी व विद्युत) ६७, दुय्यम अभियंता (स्थापत्य) ६५, दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) ४४ आणि वरिष्ठ वास्तुशास्त्रज्ञाची आठ पदे भरण्यात आली आहेत.
पदोन्नतीनंतर पदस्थापना देताना प्रामुख्याने रिक्त पदे भरणे, विनंती अर्ज, संबंधितांचा अनुभव तसेच प्राप्त शिफारशींचा विचार करण्यात आला आहे. काही अभियंत्यांनी वैयक्तिक व कौटुंबिक कारणास्तव पदोन्नती स्वीकारली नसली, तरी परिपत्रकानुसार त्यांना पदोन्नती नाकारण्याचा अधिकार आहे. उर्वरित अभियंता संवर्गाने पदोन्नती स्वीकारली असून या प्रक्रियेबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नसल्याचेही महानगरपालिका प्रशासनामार्फत नमूद करण्यात येत आहे.उपप्रमुख अभियंता (इमारत प्रस्ताव), प्रमुख अभियंता (दक्षता) आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण या 'अ' गटातील विभागांसाठी दुय्यम अभियंता (स्थापत्य) व सहाय्यक अभियंता (स्थापत्य) संवर्गाची परीक्षा घेण्यात येते. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाते. या गुणवत्ता यादीतील क्रमांकानुसार पारदर्शक सोडत पद्धतीने संबंधित अभियंत्यांना विभागांचे वाटप करण्यात येते.
अभियंत्यांना महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये काम करण्याचा अनुभव मिळावा आणि सर्वांना समान संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने कनिष्ठ अभियंता, दुय्यम अभियंता आणि सहाय्यक अभियंता यांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महानगरपालिका आयुक्तांच्या मान्यतेनुसार २ सप्टेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या प्रक्रियेनुसार बदलीस पात्र अभियंत्यांना ५ सप्टेंबर ते २० सप्टेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करून आपल्या पसंतीचे प्राधान्यक्रम नोंदविता येणार आहेत. संबंधित खात्यात किंवा विभागात तीन वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक काळ कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी एकूण कर्मचाऱ्यांच्या २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या दरवर्षी १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत करण्याची तरतूद करण्यात आली आहे. बदली व पदस्थापना प्रक्रियेत पारदर्शकता आणि निःपक्षपातीपणा राखण्यासाठी महानगरपालिकेने आवश्यक उपाययोजना केल्या असून, या प्रक्रियेबाबत अभियंता संवर्गामध्ये सकारात्मक दृष्टिकोन व समाधान आहे.

0 टिप्पण्या