Top Post Ad

Zp news आरोग्यमंत्र्यांचा ‘परफॉर्मन्स मंत्र’ : अधिकाऱ्यांच्या पुढील जबाबदाऱ्या कामगिरीशी जोडणार


*जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे वार्षिक श्रेणीकरण; तीन वर्षांच्या कामगिरीचे १०० गुणांच्या आधारे मूल्यांकन*

 महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागात कामगिरीवर आधारित कार्यसंस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने आरोग्यमंत्री *प्रकाश आबिटकर* यांनी जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कामगिरीचे वस्तुनिष्ठ वार्षिक मूल्यांकन करण्याची प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या प्रणालीअंतर्गत अधिकाऱ्यांच्या मागील तीन वर्षांच्या कामगिरीचे *१०० गुणांच्या आधारे मूल्यांकन करून त्यांचे अ, ब, क आणि ड* अशा चार श्रेणींमध्ये वर्गीकरण करण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांना भविष्यात जबाबदाऱ्या सोपविताना तसेच त्यांच्या पुढील पदस्थापना करताना या श्रेणीकरणाचा विचार केला जाणार असून, गुणवत्ता आणि प्रत्यक्ष कामगिरीला अधिक महत्त्व दिले जाणार आहे.


यासोबतच *पुढील तीन वर्षांच्या कामाचे नियोजन आणि उद्दिष्टांचाही आगामी पदस्थापना व जबाबदाऱ्या निश्चित करताना विचार केला जाणार आहे. या निर्णयामुळे केवळ सेवाज्येष्ठतेऐवजी मोजता येण्याजोगी कामगिरी, नेतृत्वगुण, रुग्णसेवेची गुणवत्ता, आर्थिक शिस्त, मनुष्यबळ व्यवस्थापन आणि शासकीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी यांना अधिक महत्त्व मिळण्याची अपेक्षा आहे.

*तीन वर्षांचे ‘रिपोर्ट कार्ड’ ठरणार आधार*....३१ मार्च २०२६ रोजी किमान तीन वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांची कामगिरी अद्ययावत करून तिचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. यामध्ये २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या तीन आर्थिक वर्षांतील कामगिरीचा १०० गुणांच्या मूल्यांकनासाठी विचार केला जाणार आहे. हे मूल्यांकन दरवर्षी करण्यात येणार असल्याने अधिकाऱ्यांची कामगिरीची नोंद त्यांच्या भविष्यातील प्रशासकीय जबाबदाऱ्या आणि पदस्थापना निश्चित करण्यासाठी महत्त्वाचा आधार ठरणार आहे.

*रुग्णसेवेपासून डिजिटल प्रशासनापर्यंत विविध निकष*..ही मूल्यांकन प्रणाली केवळ नियमित कार्यालयीन कामकाजापुरती मर्यादित न ठेवता, जिल्ह्यातील आरोग्यसेवेवर अधिकाऱ्यांच्या कामाचा प्रत्यक्ष परिणाम किती झाला, याचे मोजमाप करण्यावर भर देणार आहे. यामध्ये *लोकाभिमुखता व तक्रार निवारण, नेतृत्वगुण, विशेष कौशल्ये, प्रशिक्षण व संवाद कौशल्ये, तसेच जिल्हा वार्षिक नियोजन, राज्याच्या अर्थसंकल्पीय लेखाशीर्षांतर्गत कामगिरी, राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि CSR निधीचा प्रभावी वापर* यांचा समावेश असेल...

आरोग्य संस्थांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचाही आढावा घेतला जाणार आहे. यामध्ये *आहार व्यवस्था, औषधांची उपलब्धता, स्वच्छता आणि कंत्राटी मनुष्यबळाचे कार्यक्षम व्यवस्थापन* यांचा समावेश असेल...जिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमधील *मनुष्यबळ व्यवस्थापन* देखील मूल्यांकनाचा महत्त्वाचा भाग असेल.

नैसर्गिक आपत्ती, साथीचे आजार, रोगांचा उद्रेक तसेच मोठे अपघात यांसारख्या आपत्कालीन परिस्थितींमध्ये अधिकाऱ्यांनी दिलेला प्रतिसाद आणि केलेली कार्यवाही यालाही मूल्यांकनात महत्त्वाचे स्थान दिले जाणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील विविध कार्यक्रम तसेच शासनाच्या विशेष मोहिमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठीही गुणांकन करण्यात येणार आहे. यामध्ये ‘*माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’, अरुणोदय–सिकल सेलमुक्त महाराष्ट्र, उपशामक उपचार (Palliative Care) अभियान आणि कॅन्सरमुक्त महाराष्ट्र* यांसारख्या उपक्रमांचा समावेश आहे.

*डिजिटल कामगिरीलाही महत्त्व*...डिजिटल कामगिरीच्या घटकांत *आयुष्मान भारत कार्डचे कव्हरेज, आरोग्य विभागाच्या विविध पोर्टलवरील माहिती वेळेत अद्ययावत करणे, महाकर्मी पोर्टलवरील कामकाज तसेच आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना* यांच्या एकत्रित अंमलबजावणीचा समावेश असेल.*पुढील तीन वर्षांसाठीचे नियोजन आणि अपेक्षित कामगिरीचाही आगामी पदस्थापना व जबाबदारी निश्चित करताना विचार केला जाणार आहे.*

*प्रामाणिकपणा आणि स्वच्छ सेवा नोंद महत्त्वाची*

या प्रणालीसाठी विभागाने पात्रतेचे स्पष्ट निकष निश्चित केले आहेत. अधिकारी *जिल्हा शल्यचिकित्सक किंवा जिल्हा आरोग्य अधिकारी* संवर्गातील असणे आणि त्यांची किमान *तीन वर्षांची सेवा पूर्ण झालेली* असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध कोणतीही *प्रलंबित किंवा प्रस्तावित शिस्तभंगाची कार्यवाही*, गैरव्यवहार अथवा निधीच्या अपहाराशी संबंधित प्रकरण नसावे. त्यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाच्या तक्रारीही प्रलंबित नसाव्यात.

चांगले आचरण आणि *निर्दोष चारित्र्य व प्रामाणिकतेची प्रतिमा* हाही महत्त्वाचा निकष असेल. त्यामुळे मूल्यांकन केवळ संख्यात्मक कामगिरीपुरते मर्यादित न राहता अधिकाऱ्यांची प्रशासकीय विश्वासार्हता आणि व्यावसायिक प्रामाणिकता यांचाही विचार केला जाणार आहे.

‘*कामगिरी करा आणि प्रगती साधा’ : अधिकाऱ्यांना स्पष्ट संदेश...जिल्हास्तरीय आरोग्य प्रशासनाची नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्यसेवेच्या गुणवत्तेत अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी घेत असलेल्या निर्णयांचा थेट परिणाम रुग्णसेवा आणि आरोग्य संस्थांच्या कार्यक्षमतेवर होतो. त्यामुळे ही नवी प्रणाली अधिकाऱ्यांमध्ये *निकोप स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासोबतच आरोग्यसेवा सुधारणा, शासकीय कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्रेरणा देईल,* अशी अपेक्षा आहे.

या निर्णयामागील संदेश स्पष्ट आहे — *चांगल्या कामगिरीची दखल घेतली जाईल आणि गुणवत्तापूर्ण कामगिरीच्या आधारे अधिक जबाबदाऱ्या आणि संधी उपलब्ध होतील.*

*कामगिरीवर आधारित प्रशासनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल*

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक आरोग्य विभागात राबविण्यात येत असलेल्या व्यापक प्रशासकीय सुधारणांचा हा एक भाग असून, *गुणवत्ता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व* यावर विशेष भर देण्यात येत आहे.

या मूल्यांकन प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी *प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक आणि आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर* प्रशासकीय नेतृत्व करतील.

तीन वर्षांच्या कामगिरीवर आधारित अहवाल, १०० गुणांचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन आणि स्पष्ट श्रेणीकरण या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य विभागात *उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्या क्षमतेचा प्रभावी वापर करण्यासाठी अधिक पद्धतशीर यंत्रणा* निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे.


कामगिरीवर आधारित या दृष्टिकोनामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीला नवी दिशा मिळण्यासोबतच *कामगिरी, गुणवत्तेची दखल आणि जबाबदारी यांची सांगड अधिक प्रभावीपणे घातली जाईल*. परिणामी महाराष्ट्रातील नागरिकांना अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यास मदत होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com