बेस्ट उपक्रमाच्या आगामी २०२७-२८ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात तब्बल १,३१७.५० कोटी रुपयांची तूट अपेक्षित करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा यांनी बुधवारी बेस्ट समितीसमोर हा अर्थसंकल्प सादर केला. आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या बेस्टच्या परिवहन विभागाचा वाढता खर्च आणि त्यातून निर्माण होणारी तूट ही यंदाच्या अर्थसंकल्पातील प्रमुख चिंता ठरणार आहे. आगामी आर्थिक वर्षात बेस्टला ८,५५९.०६ कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न मिळण्याचा अंदाज असून, त्यासाठी ९,८७६.५६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे उत्पन्न आणि खर्चातील तफावतीमुळे बेस्टला १,३१७.५० कोटी रुपयांची तूट सहन करावी लागणार आहे. भांडवली कामांसाठी ६४७.७९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
बेस्टच्या परिवहन विभागाला २०२७-२८ मध्ये ३,५५१.५५ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. मात्र, या विभागाचा खर्च तब्बल ५,०७०.२६ कोटी रुपये राहण्याचा अंदाज आहे. परिणामी परिवहन विभागाची तूट १,५१८.७१ कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. याउलट, बेस्टच्या वीज विभागाकडून आर्थिक हातभार मिळणार आहे. विद्युत विभागातून ५,००७.५० कोटी रुपयांचे उत्पन्न, तर ४,८०६.३० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे या विभागातून सुमारे २०१ कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम उपलब्ध होण्याचा अंदाज असून, परिवहन विभागाच्या तुटीचा काही प्रमाणात भार कमी करण्यास त्याची मदत होणार आहे.
प्रवाशांना अधिक आधुनिक आणि वेळेवर सेवा देण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात तंत्रज्ञानावर विशेष भर देण्यात आला आहे. बेस्टची बहुप्रतीक्षित ‘एकात्मिक परिवहन व्यवस्थापन प्रणाली’ (ITMS) याच आर्थिक वर्षात कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. या प्रणालीमुळे बससेवेचे रिअल-टाइम निरीक्षण, बस ट्रॅकिंग, मार्ग व वेळापत्रकाची माहिती तसेच प्रवास नियोजन अधिक सुलभ होणार आहे. बसगाड्यांमध्ये कॅमेरे बसवून चालकांच्या हालचालींवर केंद्रीय कमांड अँड कंट्रोल सेंटरमधून देखरेख ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर तिकीट व्यवस्था आणि प्रवाशांच्या तक्रार निवारण यंत्रणेतही सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्रवाशांची मागणी, मार्गावरील गर्दी आणि उपलब्ध डेटाच्या आधारे बससेवेचे नियोजन करण्यावर भर दिला जाणार आहे.
बेस्टच्या तिकीट व्यवस्थेलाही डिजिटल स्वरूप देण्याच्या दिशेने पावले उचलण्यात आली आहेत. ONDC नेटवर्कच्या माध्यमातून QR कोडवर आधारित मोबाईल तिकीट सुविधा सुरू करण्यात आली असून, ONE Ticket, PhonePe, Paytm, WhatsApp, RedBus, Rapido, Namma Yatri आदी डिजिटल माध्यमांवरून बेस्टचे तिकीट उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. मुंबईतील पर्यटनाला चालना देण्यासाठी छतविरहित दुहेरी मजली हेरिटेज/HOHO बससेवा बेस्ट सुरू करणार आहे . या बससेवेद्वारे मुंबईतील ऐतिहासिक वास्तू आणि प्रमुख पर्यटनस्थळे पाहण्याची सुविधा पर्यटकांना उपलब्ध होणार आहे.
सप्टेंबर २०२६ अखेर बेस्टच्या ताफ्यात २,६३४ बसगाड्या होत्या. आगामी काळात या ताफ्यात मोठी वाढ करण्याचे नियोजन आहे. पीएम-ई-बस योजनेअंतर्गत आणखी १,५०० मिडी इलेक्ट्रिक बसगाड्या मिळणार असून, २०० मिडी सीएनजी बसगाड्यांसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. भविष्यात बेस्टचा बस ताफा १० हजारांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.बेस्टच्या चालकांना अधिक सुरक्षित वाहनचालकाचे प्रशिक्षण देण्यासाठी अत्याधुनिक बस ड्रायव्हिंग सिम्युलेटर उभारण्यात येणार आहे. अपघात टाळणे, खराब हवामानात सुरक्षित वाहन चालविणे आणि इंधन कार्यक्षमता वाढविणे यासंदर्भात चालकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. बेस्टच्या विद्युत विभागाच्या पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणावरही अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. जुन्या ऊर्जा रोहित्रांसह सर्किट ब्रेकर बदलणे तसेच नवीन विद्युत वितरण उपकेंद्रे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईतील वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम आणि आधुनिक करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

0 टिप्पण्या