400 कोटी रुपये किमतीची महानगरपालिकेची जमीन 56 कोटी रुपयांना बेकायदेशीर संस्थेला देण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप नगरसेवक आणि काँग्रेस गट नेते मोहम्मद अश्रफ आझमी यांनी केला आहे. 22 ऑक्टोबर रोजी सुधार समितीसमोर येणारा विषय क्र. 5 ला आम्ही तीव्र विरोध करू. असेही आझमी यांनी सांगितले. 17 जुलै 2025 रोजी या मोक्याच्या जमिनीचा ताबा पंचनाम्यावरून हे सिद्ध होते की, त्या जमिनीवर कोणतीही सोसायटी किंवा इमारत नव्हती. जमीन मोकळी होती आणि महापालिकेच्या ताब्यात होती. महापालिकेने ताबा दिल्यानंतर अवघ्या 2 महिन्यांत, 12 सप्टेंबर 2025 रोजी त्याच जमिनीवर एक तथाकथित सोसायटी स्थापन करण्यात आली. 17 जुलै 2025 रोजी ही सोसायटी अस्तित्वात नव्हती. ती बेकायदेशीर असल्याचा आरोप आझमी यांनी केला.
खुल्या बाजारातील दर 400 कोटी असून यामुळे महानगरपालिकेचे 344 कोटी थेट नुकसान होत आहे. यामध्ये जमीन 60 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर देण्याचा प्रस्ताव असून, त्यामध्ये बिल्डरला विक्रीतील हिस्सा गहाण ठेवण्याची परवानगी देणारे एक कलम आहे. बिल्डर महानगरपालिकेच्या जमिनीवर 500 कोटी रुपयांचे बँक कर्ज घेईल आणि महानगरपालिका ही जमीन कायमची गमावून बसेल. यापूर्वी, महानगरपालिकेने स्वतच या जमिनीचा विकास करण्यासाठी निविदा काढली होती, ज्यामुळे महानगरपालिकेसाठी 2000 कोटी रुपयांची कायमस्वरूपी मालमत्ता निर्माण झाली असती. खाजगी विकासकाला फायदा व्हावा म्हणून ती निविदा रद्द करण्यात आली. अशा तऱहेने मागील वर्षभरात 6.17 एकर सेंच्युरी मिलची जमीन, 5166 चौ.मी. टेस्टिंग लॅबची जमीन (आयटम क्र. 9, रु. 470 कोटी) - आता आयटम क्र. 5, रु. 400 कोटी, रु. 56 कोटींना विकली गेली.12 सप्टेंबर 2025 रोजी स्थापन झालेली सोसायटी बेकायदेशीर घोषित करावी अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे करणार असल्याचेही आझमी म्हणाले. कारण 17 जुलै 2025 रोजी जमीन आधीच महानगरपालिकेच्या ताब्यात होती. एमएमसी कायदा कलम 92 आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 400 कोटी रुपयांचा बाजारभाव मिळवण्यासाठी या जमिनीकरिता खुली ई-निविदा / सार्वजनिक लिलाव काढावा. महानगरपालिकेचा स्वतचा 2000 कोटी रुपयांचा टॉवर बांधण्यासाठी महानगरपालिकेची स्वतची विकास निविदा पुनर्संचयित करणे. तसेच 60 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर दिलेल्या महानगरपालिकेच्या सर्व जमिनींबाबत श्वेतपत्रिका प्रकाशित कराव्या. सर्व भाडे करारांमधून गहाण ठेवण्याचे कलम काढून टाका या मागणींकरिता लवकरच आयुक्तांची भेट घेणार असल्याचे आझमी यांनी सांगितले.

0 टिप्पण्या