बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांना पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा करण्यासोबतच सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन हे कृत्रिम तलावात करावे, असे आवाहन केले होते. या आवाहनाला मुंबईकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. यासोबतच मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळांनीदेखील महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध देखाव्यांतून पर्यावरणपूरक उत्सवाचा संदेश दिला. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाच्या प्रयत्नांना सुजाण मुंबईकरांची आणि सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळांची साथ लाभल्यामुळे मुंबईचा गणेशोत्सव आता पर्यावरणपूरक उत्सवाकडे अधिक वेगाने वाटचाल करीत आहे, असे गौरवोद्गार ‘श्री गणेश गौरव पुरस्कार स्पर्धा - २०२६’ पुरस्कार वितरण सोहळ्यात मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी काढले.
महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाच्या वतीने आयोजित ‘श्री गणेश गौरव पुरस्कार स्पर्धा- २०२६’चा तसेच ‘परिमंडळनिहाय आयोजित नैसर्गिक व कृत्रिम विसर्जन स्थळा स्पर्धा २०२६’ या दोन्ही स्पर्धांचा पुरस्कार वितरण सोहळा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऐतिहासिक सभागृहात आज ३० ऑक्टोबर रोजी संपन्न झाला. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना मुंबईच्या महापौर श्रीमती तावडे बोलत होत्या.या पुरस्कारवितरण सोहळ्याला उपमहापौर श्री. संजय घाडी, सभागृह नेते श्री. गणेश खणकर, शिवसेना गटनेते श्री. अमेय घोले, शिक्षण सिमिती अध्यक्षा श्रीमती राजेश्री शिरवडकर, सी आणि डी प्रभाग समिती अध्यक्ष श्री. आकाश पुरोहित, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उप आयुक्त (परिमंडळ २) तथा श्रीगणेशोत्सव समन्वयक श्री. प्रशांत सपकाळे, सह आयुक्त, उप आयुक्त, सहायक आयुक्त उपस्थित होते. त्याचबरोबर बृहन्मुंबई सार्वजनिक समन्वय कृती समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे प्रमुख कार्यवाह श्री. सुरेश सरनोबत, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे श्री. विविक भाटकर, श्रीगणेशोत्सव समन्वय समितीचे सचिव श्री. गिरीश वालावलकर तसेच विविध सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यात विजेत्या मंडळांना चषक, मानधन, प्रमाणपत्र, तुळसकुंडी तसेच सर्वोत्तम नैसर्गिक आणि कृत्रिम तलाव उभारणाऱ्या प्रशासकीय विभागांना (वॉर्ड ऑफीस) प्रमाणपत्र व तुळसकुंडी देवून गौरविण्यात आले.
या कार्यक्रमादरम्यान महापौर श्रीमती रितू तावडे म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या राज्य उत्सवाचा मान मिळालेला श्रीगणेशोत्सव हा संपूर्ण देशाचे आकर्षण असणारा सांस्कृतिक उत्सव आहे. मुंबईला भारावून टाकणाऱ्या या श्रीगणेशोत्सवाचा रंग अधिक खुलावा म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने विविध उपक्रम राबविले. मुंबई उच्च न्यायालय आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशांनुसार महानगरपालिकेने मुंबईकरांना पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनास मुंबईकरांसह सार्वजनिक गणेश मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पर्यावरणपूरक श्रीगणेशमूर्ती निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी महानगरपालिकेकडून मूर्तिकारांना ९४० मेट्रिक टनांहून अधिक शाडू माती मोफत वितरित करण्यात आली. तसेच, यंदा २५ हजार ४०० लिटर पर्यावरणपूरक रंग विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले. मुंबईकरांनी पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सवाला दिलेल्या प्रतिसादाचे फलित म्हणून यंदाही कृत्रिम तलावांमध्ये श्रीगणेशमूर्ती विसर्जनाला प्राधान्य देण्यात आले, असे महापौर श्रीमती रितू तावडे म्हणाल्या.
उपमहापौर श्री. संजय घाडी म्हणाले, मुंबईत अनेक जाती-धर्मांचे लोक एकत्र येवून सण-उत्सव तर साजरे करतात. एकमेकांच्या रुढी-परंपरा, सण-उत्सवांमध्ये आनंदाने सहभागीही होतात. या उत्सवांतूनच या महानगराची एकात्मता दिसून येते. तसेच या महानगराच्या प्रगतीमागेही याचा मोलाचा वाटा आहे. दरवर्षी येणाऱ्या श्रीगणेशोत्सवातही ही एकात्मता, परंपरा जोपासली जाते, वृद्धिंगत केली जाते, असेही श्री. घाडी म्हणाले. आपल्या मनोगतात श्री. घाडी यांनी अस्सल मालवणी बोलीतही उपस्थितांशी संवाद साधत श्रीगणेशोत्सवाच्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सवासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. तसेच श्रीगणेशोत्सवादरम्यान भाविकांना, नागरिकांना आणि मूर्तिकारांना आवश्यक त्या विविध सेवा-सुविधा बृहन्मुंबई महानगरपालिका सक्षमपणे पुरविण्यासह मुंबईतील श्रीगणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा, यासाठी महानगरपालिका दरवर्षी विविध उपक्रम हाती घेत असलेल्या विविध उपक्रमांचीही त्यांनी माहिती दिली. कार्य्रकमाच्या अखेरीस उप आयुक्त (परिमंडळ-२) तथा गणेशोत्सव समन्वयक श्री. प्रशांत सपकाळे यांनी अभार मानले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऐतिहासिक सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला महानगरपालिकेच्या संगीत कला अकादमीच्या चमूने विविध गीतांसह गणेशवंदना सादर केली. या गणेशवंदनेमुळे श्रीगणेशोत्सव अजूनही सुरू आहे, असे उत्साहावर्धक वातावरण तयार झाल्याचा उल्लेख माननीय महापौरांनी आपल्या भाषणात आवर्जून केला. तसेच या चमूला महापौर श्रीमती रितू तावडे यांनी ११ हजार रुपयांचे विशेष बक्षिस देखील जाहीर केले.
- *श्रीगणेश गौरव स्पर्धेतील पुरस्कारप्राप्त विजेते*
- १. प्रथम पारितोषिक (रु.७५,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)- स्वप्नाक्षय मित्र मंडळ, सार्वजनिक गणेशोत्सव अंधेरी (पश्चिम)
- २. द्वितीय पारितोषिक (रु.५०,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)- अखिल भटवाडी सार्जनिक उत्सव मंडळ, भटवाडीचा राजा, घाटकोपर पश्चिम
- ३. तृतीय पारितोषिक (रु.३५,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)- पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ, करीरोड
- ४. सर्वोत्कृष्ट मूर्तिकार (रु.२५,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)- श्री. मयेकर, बाळगोपाळ मित्रमंडळ मुंबईचा पेशवा, विलेपार्ले पूर्व
- ५. सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार (सजावटकार) (रु.२०,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)- श्रीमती रेश्मा शिंदे, विघ्नहर्ता रहिवासी मित्रमंडळ (चंपाभुवनचा विघ्नहर्ता), बोरिवली पूर्व
- ६. उत्तेजनार्थ दोन पारितोषिकेः (प्रत्येकी रुपये १०,०००/-)
- १) बेस्ट नगर श्रीगणेशोत्सव मंडळ, गोरेगाव पश्चिम
- २) युवक उत्कर्ष मंडळ, मालवणी मालाड पश्चिम
१. श्री श्रद्धा मित्र मंडळ ट्रस्ट, कोकणीपाडा, दहिसर पूर्व
२. शिवाजी पार्क (हाऊस) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (शिवाजी पार्कचा विघ्नहर्ता) दादर
८. शाडू मातीची सर्वोत्कृष्ट मूर्ती पारितोषिक (रु.२५,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र) - शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कांजूरमार्ग पूर्व
९. सामाजिक कार्य / समाजकार्य / अवयवदान जागृती- पारितोषिक (रु.१५,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र) – बालमित्र कला मंडळ, विक्रोळी पश्चिम
- *प्रशस्तीपत्र प्राप्त गणेशोत्सव मंडळे*
- १. स्री शक्ती – गोकुळ नगर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, दहिसर पूर्व
- २. कागदी मूर्ती- मराठा मित्र मंडळ, जमील नगर, भांडूप पश्चिम
- ३. विषयाची योग्य मांडणी- बालविकास मित्र मंडळ, सार्वजनिक गणेशोत्सव, कांजूर पूर्व
- ४. अन्नधान्य भेसळ जनजागृती- इलेव्हन इव्हिल्स क्रिकेट क्लब सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, धारावी
- ५. सामाजिक कार्य- श्री हनुमान सेवा मंडळ, काळा किल्ला, धारावी
- ६. कृत्रिम बुद्धिमत्ता- महादेवाची वाडी ते वागेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, महादेवाची वाडी परळ
- ७. सामाजिक जाणीव- पारशीवाडी मित्रमंडळ सार्वजनिक गणेशोत्सव, चिंचपोकळी पश्चिम
- ८. पर्यावरणपूरक- बालसाथी मित्र मंडळ, करीरोड
- ९. सुबक मूर्ती- धसवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ठाकूरद्वार
- १०. सामाजिक कार्य- श्रीक्ष्मी नारायण बाल गणेश मित्र मंडळ, घाटकोपरचा राजा, घाटकोपर पूर्व
- ११. उंच कागदी मूर्ती- ओम श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ (मुंबईचा महाराजाधिराज) परेरावाडी, साकीनाका
- १२. सामाजिक विषय- श्री साईदर्शन मित्रमंडळ, म्हात्रेवाडी बोरिवली पश्चिम
- १३. उत्कृष्ट रंगसंगती- श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कस्तुरपार्क, बोरिवली पश्चिम
- १४. सामाजिक कार्य- हिंदू कॉलनी गणेशोत्सव मंडळ, दादर
*परिमंडळ-१*
सर्वोत्तम नैसर्गिक विसर्जन स्थळ - स्वराज्यभूमी गिरगांव चौपाटी, नैसर्गिक स्त्रोत, डी विभाग
सर्वोत्तम कृत्रिम तलाव - गेट वे ऑफ इंडिया, ए विभाग
*परिमंडळ-२*
सर्वोत्तम नैसर्गिक विसर्जन स्थळ - केळूसकर मार्ग (उत्तर), दादर, नैसर्गिक स्त्रोत, जी/उत्तर विभाग
सर्वोत्तम कृत्रिम तलाव - कामगार मैदान, परळ, एफ/दक्षिण विभाग
*परिमंडळ-३*
सर्वोत्तम नैसर्गिक विसर्जन स्थळ - बॅन्डस्टँड, बी. जे. रोड, वांद्रे (प), नैसर्गिक स्त्रोत एच/पश्चिम विभाग
सर्वोत्तम कृत्रिम तलाव - मुक्तानंद पार्क, सरस्वती मार्ग, सांताक्रूझ पश्चिम एच/पश्चिम विभाग
*परिमंडळ-४*
सर्वोत्तम नैसर्गिक विसर्जन स्थळ - जुहू समुद्र किनारा, नैसर्गिक स्त्रोत, के/पश्चिम विभाग
सर्वोत्तम कृत्रिम तलाव - भुजाळे कृत्रिम तलाव, पी/पश्चिम विभाग
*परिमंडळ-५*
सर्वोत्तम नैसर्गिक विसर्जन स्थळ - छत्रपती शिवाजी महाराज तलाव (शीतल तलाव) एल विभाग
सर्वोत्तम कृत्रिम तलाव - आर. सी. एफ. मैदान, वाशी नाका, चेंबूर, एम पूर्व विभाग
*परिमंडळ-६*
सर्वोत्तम नैसर्गिक विसर्जन स्थळ - गणेश घाट, पवई तलाव, एस विभाग
सर्वोत्तम कृत्रिम तलाव - आचार्य अत्रे मैदान, पंतनगर, घाटकोपर एन विभाग
*परिमंडळ-७*
सर्वोत्तम नैसर्गिक विसर्जन स्थळ - गोराई जेट्टी, आर/मध्य विभाग
सर्वोत्तम कृत्रिम तलाव - ७७ ब, कार्टर मार्ग क्रम ५, बोरिवली पूर्व, आर/मध्य विभाग
=

0 टिप्पण्या