मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत झोपडपट्टीवासीयांच्या सोयीसाठी व्हॉट्सॲप चॅटबॉट प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे झोपडपट्टीधारकांना पात्रता, वारस, प्रकल्पबाधित (PAP) तसेच सदनिका वाटपाबाबतची माहिती सहज उपलब्ध होणार असून नागरिकांनी या सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ राव यांनी केले आहे. प्राधिकरणाच्या 022-41356840 या दूरध्वनी क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे संदेश पाठवून नागरिकांना संबंधित माहिती प्राप्त करता येणार आहे. माहिती विचारताना संबंधित झोपडपट्टीधारकाचे नाव आणि गृहनिर्माण संस्थेचे नाव नमूद करणे आवश्यक आहे.
नागरिकांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेशी संबंधित माहिती घरबसल्या, विनामूल्य आणि सुलभपणे उपलब्ध व्हावी, तसेच कार्यालयात सातत्याने येऊन वेळेचा अपव्यय होवू नये या उद्देशाने ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे. व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवा २४ तास, सातही दिवस उपलब्ध असल्याने नागरिकांना कोणत्याही वेळी आवश्यक माहिती मिळवता येणार आहे. व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे त्वरित माहिती उपलब्ध होत असल्याने नागरिकांचा वेळ वाचणार असून, प्राधिकरणाशी संबंधित माहिती मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे. तरी नागरिकांनी या प्रणालीचा लाभ घ्यावा. तसेच प्राधिकरणातील अधिकारी व अधिनस्त कर्मचाऱ्यांनीही आपल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना या सुविधेची माहिती द्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ राव यांनी केले आहे.
0 टिप्पण्या