Top Post Ad

सह्याद्रीची देणगी’मधून उलगडणार महाराष्ट्राचा दोन हजार वर्षांचा गौरवशाली इतिहास

महाराष्ट्राचा दोन हजार वर्षांचा समृद्ध इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि गौरवशाली परंपरा उलगडून दाखवणाऱ्या ‘गिफ्ट ऑफ द सह्याद्री : द स्टोरी अँड ग्लोरी ऑफ महाराष्ट्र’ या भव्य कॉफी टेबल पुस्तकाची हेरिटेज इंडिया कम्युनिकेशन्स प्रा. लि.ने घोषणा केली आहे. सातवाहन काळापासून ते १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपर्यंतचा ऐतिहासिक प्रवास या २८० पानी पुस्तकातून वाचकांसमोर मांडण्यात आला आहे. या पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन ३१ ऑक्टोबर रोजी पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या सभागृहात उद्योगपती डॉ. अभय फिरोदिया यांच्या हस्ते होणार आहे.

पुस्तकाच्या घोषणाप्रसंगी महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व व संग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘छावा’ या चित्रपटाच्या लेखकांपैकी एक असलेले उन्मान बनकर हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. या उपक्रमातून महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यासपूर्ण आणि रंजक परिचय करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भूगोल, इतिहास आणि संस्कृतीचा अनोखा संगम- महाराष्ट्राच्या जडणघडणीत सह्याद्री पर्वतरांगांनी बजावलेली भूमिका हे या पुस्तकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. पश्चिम घाटातील जैवविविधता, अजिंठा-वेरूळच्या लेण्या, ऐतिहासिक किल्ले, गोदावरी, कृष्णा आणि भीमा नद्यांचे उगमस्थान तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला लाभलेले नैसर्गिक संरक्षण यांचा परस्परसंबंध पुस्तकातून उलगडण्यात आला आहे.

सातवाहन काळापासून प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक महाराष्ट्राचा प्रवास मांडताना छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय, मराठा साम्राज्य, पेशवाईचा उत्कर्ष आणि अस्त, तसेच शिक्षण, पत्रकारिता, समाजसुधारणा आणि औद्योगिक विकासातील महाराष्ट्राचे योगदान यांचा आढावा घेण्यात आला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील १०६ हुतात्म्यांचे बलिदान आणि १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची झालेली स्थापना हा या ऐतिहासिक प्रवासाचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. संतपरंपरेपासून समाजसुधारणेपर्यंत- संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्यासारख्या संतकवींनी समृद्ध केलेली भक्तिपरंपरा, वारकरी संप्रदाय आणि मराठी भाषेचा झालेला विकास यांनाही पुस्तकात महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. जिजाबाई, ताराबाई, अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले यांसारख्या कर्तृत्ववान महिलांचे योगदानही अधोरेखित करण्यात आले आहे.

विदर्भ, मराठवाडा, कोकण, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र या प्रदेशांच्या स्वतंत्र वैशिष्ट्यांवर आधारित विभागांमुळे महाराष्ट्राच्या विविधांगी सांस्कृतिक ओळखीचे दर्शन घडते. इतिहासातील महत्त्वाच्या घटना, व्यक्तिमत्त्वे आणि स्थळे यांची माहिती नकाशे, छायाचित्रे, चित्रे आणि रेखाचित्रांच्या माध्यमातून आकर्षक पद्धतीने सादर करण्यात आली आहे.  हेरिटेज इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मंजिरी खांडेकर यांनी सांगितले की, इतिहास सर्वसामान्यांपर्यंत सहज आणि रंजक पद्धतीने पोहोचवणे हा संस्थेचा गेल्या दोन दशकांपासूनचा प्रयत्न आहे. ‘पुण्यकथा : पुण्याची दहा लाख वर्षांची कहाणी’ या पुस्तकाला मिळालेल्या प्रतिसादानंतर महाराष्ट्राच्या व्यापक इतिहासाचे चित्रण करण्याची संकल्पना पुढे आली. त्यासाठी पुस्तकाचा आवाका भव्य ठेवतानाच त्याचे सादरीकरण रंगतदार आणि आकर्षक करण्यावर भर देण्यात आला.

पुस्तकाच्या लेखिका आणि सर्जनशील संकल्पिका कल्याणी सरदेसाई यांनी महाराष्ट्राला स्वतःची स्वतंत्र ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख असल्याचे नमूद केले. महाराष्ट्राच्या व्यापक इतिहासाकडे अनेकदा दुर्लक्ष होते. त्यामुळे इतिहासातील नाट्य, कविता आणि कथनशैलीच्या माध्यमातून हा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.

या पुस्तकाच्या संशोधन मंडळात इतिहासकार डॉ. अजित आपटे, प्रा. पी. के. घाणेकर आणि डॉ. मंजिरी भालेराव यांचा समावेश आहे. राहुल देशपांडे, अनंत डेरे, तेजस मोडक आणि मधुमिता शिंदे यांनी पुस्तकासाठी चित्रे साकारली आहेत. १२ वर्षांवरील वाचकांसाठी उपयुक्त असलेले हे पुस्तक केवळ इतिहासप्रेमींसाठीच नव्हे, तर महाराष्ट्रात राहणाऱ्या आणि राज्याची संस्कृती, परंपरा व ऐतिहासिक वारसा समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शाळा-महाविद्यालयांची ग्रंथालये तसेच वैयक्तिक संग्रहासाठीही हे पुस्तक उपयुक्त ठरेल. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर इतिहासाची आवड जोपासणाऱ्यांसाठी ही एक संग्रहणीय भेट ठरू शकते.

  • पुस्तकाचे नाव : सह्याद्रीची देणगी : महाराष्ट्राची कहाणी आणि गौरव
  • प्रकाशक : हेरिटेज इंडिया कम्युनिकेशन्स प्रा. लि.
  • पृष्ठसंख्या : २८०
  • किंमत : २,५०० रुपये
  • प्रकाशन : ३१ ऑक्टोबर २०२६, पुणे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com