महात्मा गांधींचे तत्त्व मारता येणार नाही आणि त्यांचे विचारही कधी संपवता येणार नाहीत. जोपर्यंत हा देश जिवंत आहे, तोपर्यंत गांधींचे विचारही अमर राहतील. सर्वांना सोबत घेतल्याशिवाय हा देश चालवता येत नाही,” असे ठाम प्रतिपादन 'लोकमत'चे माजी संपादक मधुकर भावे यांनी केले. कै. पद्मावती शामराव सामाजिक व शैक्षणिक प्रतिष्ठानच्या वतीने महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख वक्ते म्हणून मधुकर भावे बोलत होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुधीर जाधव-नळवाडीकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
भावे पुढे म्हणाले की, "ज्यांनी केवळ मंदिरे बांधली, त्यांना खऱ्या अर्थाने श्रीराम कळलेलाच नाही." गांधीजींच्या विचारांतील समता, सर्वसमावेशकता आणि मानवी मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी स्पष्ट केले की, महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ऐतिहासिक योगदानाशिवाय आधुनिक भारताची उभारणी शक्यच झाली नसती. देशाच्या प्रगतीसाठी आणि जडणघडणीत सर्व समाजघटकांना एकत्र घेऊन पुढे जाणे हीच आजची खरी गरज आहे.
संस्थेचे अध्यक्ष सुधीर जाधव-नळवाडीकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “महात्मा गांधींनी सत्य, अहिंसा आणि सर्वसमावेशकतेच्या जोरावर देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, तर लालबहादूर शास्त्री यांनी आपल्या साधेपणाने, प्रामाणिकपणाने आणि निष्ठावंत देशसेवेने समाजासमोर एक महान आदर्श ठेवला. आजच्या तरुण पिढीला गांधीजींचे विचार आणि शास्त्रीजींचे आचरण दिशा दाखवणारे आहे. या महापुरुषांच्या आदर्शांवर चालत देशाची एकता, प्रगती आणि सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहिले पाहिजे.”
या कार्यक्रमात उपस्थितांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या स्मृतींस आणि कार्याला विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

0 टिप्पण्या