ठाणे महापालिकेतील टेंडर प्रक्रियेवरून नगरसेवक आणि कार्यकारी अभियंता यांच्यातील वादाचे पडसाद थेट महापालिका प्रशासनाच्या कामकाजावर उमटले आहेत. नगरसेवक राजेंद्र फाटक यांनी कार्यकारी अभियंता रणधीर राणे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांचा आणि 'चोर', 'भ्रष्ट अधिकारी' अशा केलेल्या उल्लेखाचा निषेध करत महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मागील आठवड्यात लेखणी बंद आंदोलन केले. कार्यकारी अभियंता रणधीर राणे यांच्यावर नगरसेवक राजेंद्र फाटक यांन 'चोर' आणि 'भ्रष्ट अधिकारी' असा केलेला उल्लेख अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या जिव्हारी लागला. याच्या निषेधार्थ मागील आठवड्यात ठाणे महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन केले. मात्र या प्रकरणी पुढील कारवाई बाबत अधिक माहीती मिळू शकलेली नाही.
रणधीर राणे हे ठाणे महापालिकेच्या वर्तकनगर प्रभाग समितीतील सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी टेंडर प्रक्रियेवरून राणे आणि शिवसेना नगरसेवक राजेंद्र फाटक यांच्यात तीव्र वाद झाला होता. महापालिकेच्या सर्व साधारण सभेत टेंडरला विरोध झालेला असतानाही प्रशासनाने टेंडर खुले केल्याने फाटक आक्रमक झाले होते. या टेंडर प्रक्रियेत 'मॅच फिक्सिंग' किवा भागीदारी झाल्याचा थेट आरोप फाटक यांनी नगर अभियंता आणि कार्यकारी अभियंता रणधीर राणे यांच्यावर केला होता. तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती. काही टेंडरच्या संदर्भात पाच टक्के कमिशनच्या कथित मागणीचाही आरोप झाल्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली होती. नगरसेवकांकडून अधिकाऱ्यांचा अशा प्रकारे अपमान सहन केला जाणार नाही, अशी भूमिका अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतल्याने टेंडरचा वाद आता अधिकारी विरुद्ध लोकप्रतिनिधी अशा संघर्षाच्या दिशेने जाण्याची शक्यता निर्माण झाली होती.
राणे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत नियमानुसार कामकाज केल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, फाटक यांनी कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांवर केलेली टीका आणि 'चोर', 'भ्रष्ट अधिकारी' असा केलेला उल्लेख यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात मंगळवारी सकाळी ११ वाजता सार्वजनिक बांधकाम विभागासह महापालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन सुरू केले. आंदोलनकर्त्यांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यानंतर महापालिका आयुक्त सौरभ राव यांना तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या प्रकरणी आपली भूमिका मांडण्याचा निर्णय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतला होता. मात्र एका बड्या नेत्याच्या हस्तक्षेपामुळे हे प्रकरण रफादफा करण्यात आल्याची माहीत मिळत आहे. .
0 टिप्पण्या