बुद्ध धम्माची पवित्र भूमी असलेल्या भारतात प्रथमच २१ व्या आंतरराष्ट्रीय त्रिपिटक सुत्तपाठ सोहळ्याचे (ITCC) आयोजन करण्यात येणार आहे. बिहारमधील बोधगया येथील ऐतिहासिक महाबोधी महाविहार परिसरात २ ते १२ डिसेंबर २०२६ या कालावधीत हा भव्य आंतरराष्ट्रीय बौद्ध महासोहळा पार पडणार आहे. जगभरातील २७ हून अधिक देशांतील सुमारे २५ हजार बौद्ध अनुयायी या सोहळ्यात सहभागी होणार असून, भारताला प्रथमच या जागतिक बौद्ध परंपरेचे यजमानपद मिळाले आहे.आंतरराष्ट्रीय त्रिपिटक सुत्तपाठ कौन्सिलचे सरचिटणीस भंते विनय रक्खिता आणि सदस्य अमन कांबळे यांनी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी डॉ. विजय कदम, डॉ. निशा रंगारी आणि सतशील मेश्राम उपस्थित होते.
२००६ पासून सुरू असलेल्या या जागतिक बौद्ध परंपरेचा सोहळा प्रथमच भारतात होत असल्याने ही देशासाठी अभिमानाची बाब असल्याचे आयोजकांनी सांगितले. या दहा दिवसीय सोहळ्यात म्यानमार, थायलंड, नेपाळ, भारत, व्हिएतनाम, श्रीलंका, लाओस, कंबोडिया, बांगलादेश यांसह अमेरिका, जपान, जर्मनी, दक्षिण कोरिया, भूतान आणि मलेशिया अशा विविध देशांतील भिक्षू, भिक्षुणी आणि बौद्ध अनुयायी सहभागी होणार आहेत. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक देशातील भिक्षुसंघ आपापल्या मातृभाषेत त्रिपिटकाचे पठण करणार आहे. 'भाषा अनेक, अर्थ एक' या संकल्पनेतून जागतिक शांतता, बंधुता आणि एकतेचा संदेश दिला जाणार आहे.२ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता आंतरराष्ट्रीय बौद्ध सांस्कृतिक परिक्रमेद्वारे सोहळ्याचा प्रारंभ होईल. या परिक्रमेत विविध देशांचे सांस्कृतिक चित्ररथ सहभागी होतील. त्यानंतर महाबोधी महाविहारात अभिधम्म पिटक पठणाला सुरुवात होणार आहे. दररोज बौद्ध आचार्यांकडून धम्मप्रवचनांसह विपश्यना आणि ध्यानधारणेचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या महासोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे ओडिशामध्ये तयार करण्यात आलेल्या चार फूट उंचीच्या २२० हस्तनिर्मित सुवर्ण बुद्धमूर्तींचे देशातील विविध बुद्धविहार आणि बौद्ध संस्थांना महादान करण्यात येणार आहे. लाईट ऑफ बुद्धधम्मा फाउंडेशन इंटरनॅशनलच्या संस्थापिका व कार्यकारी संचालिका वांग्मो डिक्सी यांनी ही माहिती दिली. याशिवाय कर्नाटकच्या महाबोधी सोसायटीच्या वतीने महाविहार परिसराची आकर्षक पुष्पसजावट करण्यात येणार आहे.
सोहळ्यासाठी कालचक्र मैदानावर सुमारे ३० हजार चौरस फुटांचा भव्य मंच आणि वातानुकूलित मंडप उभारण्यात येत आहे. सहभागी भिक्षुसंघासाठी दान, तसेच उपस्थितांसाठी मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. मुख्य सोहळ्यानंतर १३ ते १५ डिसेंबरदरम्यान जेठियन दरी ते राजगीर येथील प्राचीन आम्रवनापर्यंत आंतरराष्ट्रीय बौद्ध शांतता व हेरिटेज यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. या यात्रेत २७ देशांतील एक हजाराहून अधिक मान्यवर सहभागी होतील.
लाईट ऑफ बुद्धधम्मा फाउंडेशन इंटरनॅशनल इंडिया आणि इंटरनॅशनल त्रिपिटक चॅटिंग कौन्सिल-इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने, भारतातील १७ बौद्ध संस्थांच्या सहकार्याने या सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयासह बिहार सरकारचा या उपक्रमाला पाठिंबा आहे. उद्घाटन समारंभाला बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी प्रमुख अतिथी, तर केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, किरेन रिजिजू, जीतनराम मांझी आणि रामदास आठवले यांच्यासह अनेक मान्यवरांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. या आंतरराष्ट्रीय महासोहळ्यामुळे भारतातील बौद्ध पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा असून, बोधगया परिसरातील स्थानिक अर्थव्यवस्थेत सुमारे २५ कोटी रुपयांची उलाढाल होईल, असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे.
'बुद्ध धम्माची मातृभूमी असलेल्या भारतात धम्माचा पवित्र स्वर पुन्हा घुमणार आहे, ही आमच्यासाठी भाग्याची बाब आहे. बोधिवृक्षाखाली होणारे प्रत्येक पठण हे जगातील सर्व प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी आणि शांततेसाठी केलेले सामूहिक प्रार्थनास्वरूप आहे. जागतिक अशांततेच्या पार्श्वभूमीवर बोधगयेतून करुणा आणि समन्वयाचा संदेश संपूर्ण मानवतेला नवी दिशा देईल,' असे वांग्मो डिक्सी यांनी सांगितले.

0 टिप्पण्या