Top Post Ad

डाॅ. दत्ता सामंत.... भांडवली-व्यवस्थेकडून झालेल्या निर्घृण हत्ये

 _ डाॅ. दत्ता सामंतांच्या भांडवली-व्यवस्थेकडून झालेल्या निर्घृण हत्येला जवळपास तीन दशके पूर्ण होत असताना.... _

डाॅ. दत्ता सामंतांचं निःपक्षपाती वृत्तीने मूल्यमापन करताना, काही व्यवधानं निश्चितच बाळगावी लागतील...तो आजचा विषय नव्हे! डाॅ. दत्ता सामंतांच्या कार्यशैलीविषयी जरुर वाद असू शकतात...वाद व मतमतांतरं असावीत; पण, कामगार नेता व राजकीय नेता म्हणून, त्यांच्या प्रामाणिकपणाविषयी व लढवय्येवृत्तीविषयी शंका घ्यायला यःकिंचितही कधि जागा नव्हती...डाॅ. दत्ता सामंतांसारखे आज किती कामगार नेते, राजकीय नेते आपल्याला दाखवता येतील? मी त्यांना प्रदीर्घकाळ खूप जवळून पाहिलं. मला ते 'पंपवाल्या' म्हणायचे (आधी 'खिमलाईन पंप्स्' आणि नंतर मालकी व नाव बदललेल्या 'सुल्झर पंप्स्' या कंपनीत काम करायचो म्हणूनच)...आमच्यात काही मतभेद होते, मतभेद असणारच; पण, त्यांच्या कारकिर्दीत माझ्या रुपाने, ते प्रथमच एखाद्या छोट्या स्थानिक-कामगारनेत्याला स्वतंत्र बुद्धीने काम करायला मोकळीक देते होणार होते...त्यामुळेच, त्यांच्याविषयीचा आदर दुणावला...आजच्या अगदी दयनीय, हवालदिल झालेल्या कामगार-चळवळीत नवी प्रेरणा जागवण्यासाठी, डाॅ. दत्ता सामंताच्या स्मृतिचा यथोचित जागर करणं, म्हणूनच अत्यावश्यक आहे}_

काॅ. श्रीपाद अमृत डांगे यांच्यानंतर अवघ्या कामगार-जगताला, ज्याने नुसत्या आपल्या नावानेच जैवविद्युतभारित करुन सोडलं होतं...तो कामगार-नेता म्हणजे, डाॅ. दत्ता सामंत!  आडनावाने 'सामंत' असले; तरी, देवबागच्या माडाच्या उंचच उंच झाडांवर सरसर चढणारा, हा ताकदवान कोकणी गडी...भांडवली-व्यवस्थेतली 'सामंतशाही' संपवू पहात होता.  आर्थिक-विषमतेला प्रचंड चालना देणाऱ्या, अत्यंत 'कामगारघातकी' भांडवली-विचारसरणीतून, ऐंशीच्या दशकापासूनच जगभरात कामगारवर्ग पुरता होरपळला जाऊ लागला होता...भारतात मात्र, डाव्या पक्षांच्या सततच्या दबावापोटी, त्याला निदान एका दशकाचा तरी विलंब झाला. महाराष्ट्रातच देशाचा औद्योगिक-विकास बव्हंशी केंद्रित असल्याने, इथल्या घराणेबाज व मराठी-अस्मितेचा 'धंदा' मांडून बसलेल्या आणि पश्चिम-महाराष्ट्रातल्या गद्दारीच्या राजकारणाचं विष, संबंध महाराष्ट्रात पसरवणार्‍या  बड्या राजकारण्यांना हाताशी धरुनच...'खाउजा-धोरणा'ची व त्याद्वारे, 'कंत्राटी-गुलामी'ची खुबीने पेरणी करण्यात आली.  जागोजागी कंपन्या-कारखान्यांतून त्याकामी,  "कारखाना जगला; तर कामगार जगेल",  अशा जैन, गुज्जू, मारवाडी भांडवलदारवर्गाची 'दलाली' करणार्‍या बुलंद घोषणा देत, 'कामगारांची मक्का' असलेली 'लालबाग'', रातोरात 'दलालबाग' बनवली गेली!

'कामगारकारण', हेच राजकारणाचं मुख्य अंग असताना...राजकारणातून 'कामगारकारण' हा विषयच बाद करण्याचं महापातक, डावे पक्ष वगळता, एकजात सगळ्याच मराठी-राजकारण्यांनी महाराष्ट्रात अहमअहमिकेने केलं.  शहरी भागातून नव्वद टक्क्यांहून अधिक मराठी-माणसं, कामगार-कर्मचारी म्हणूनच उदरनिर्वाह करत असताना आणि 'कामगारकारण', हा 'मराठी-राजकारणा'चा' गाभाच नव्हे; तर, 'आत्मा' असणं गरजेचं असताना..."कामगारकारण आणि राजकारण, हे दोन्ही पूर्णतया स्वतंत्र व एकमेकाशी फटकून रहाणारे विषय असल्याचा" विखारी-प्रचार जाणिवपूर्वक केला गेला...  समस्त कामगारवर्गाची फसगत व दिशाभूल करणारे, असले हिणकस राजकीय डावपेच यशस्वी होत जाण्याचा तो अवसानघातकी कालखंड होता...आणि, महाराष्ट्राचं मोठं दुर्दैव हे की,  'मराठी-माणसा'च्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी, कामगारांच्या मानगुटीवर बसवलेलं हे 'भूत' काहीकेल्या, आजही उतरायला तयार नाही  आणि म्हणूनच,  महाराष्ट्राच्या कामगारक्षेत्रातून जाज्वल-जातिवंत 'राजकीय-कार्यकर्ते' तयार होण्याची, डाव्यांनी कष्टपूर्वक जोपासलेली परंपरा साफ खंडित झाली, कुंठीत झाली...  ती आजतागायत!

...आणि, त्याचीच अतिशय कटू फळं आणि शहरी-जीवनातली उध्वस्ततेची शिक्षा, सगळा मराठी-कामगारवर्ग भोगतोय.  "षंढ नवरा कुंकवाला आधार", असे असणारे आपले अगदी षंढ कामगार-कायदे,  पाश्चात्य देशांतील कामगार-कायद्यांसारखे धारदार-टोकदार करण्याची गंभीर स्वरुपाची गरज असताना...उलटपक्षी, आहेत ते षंढ कामगार-कायदे देखील नष्ट करुन, कामगार-कर्मचारीवर्गावर व त्यांच्या पुढील पिढ्यापिढ्यांवर  अखंड गुलामगिरी लादण्याचं षडयंत्र, त्यामुळेच या देशात, 'हिंदुत्वा'च्या व 'हिंदुराष्ट्रा'च्या ढोंगी-घातकी मुखवट्याआड  सुरुच आहे.

 "डाॅ. दत्ता सामंत, दत्ता सामंत...दे दणादण, दे दणादण"  हा, तेव्हाच्या कामगारक्षेत्रातील 'सामंती-पर्वा'त, भर उन्हात तळपणार्‍या धामणीसारखा सळसळणारा, एक मंत्रोच्चारच जणू कामगारविश्वात बनला होता. त्यानंतर,  आजतागायत कुठल्याच कामगार-नेत्याची औकात कधि उभी राहिली नाही की, त्याने एकहाती डाॅ. सामंतांच्या हत्येपश्चात निर्माण झालेली, ती पोकळी भरुन काढावी!  ...आणि, अनेक कारणांनी ते तसं होऊ शकणारं नव्हतंच; म्हणूनच, ही हत्या 'खाउजा-धोरण' (खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण) राबवण्यादरम्यानच्या, नव्वदीच्या दशकाच्या उत्तरार्धात घडवली गेली. पुढे यथावकाश मारेकरी सुटले, ते सुटणारच होते, आधी ठरल्यासारखे. डांग्यांनंतरच्या डाव्या चळवळीतील, मी मी म्हणणार्‍या कामगार नेत्यांना जे कधि जमलं नाही; ते 'डाॅक्टरांनी करुन दाखवलं'...ते म्हणजे  "Paying capacity of the corporates"  त्यांनी प्रथमच दाखवून दिली...किंवा, दुसर्‍या शब्दात सांगायचं; तर,  कामगारांच्या रक्ताघामाची दीर्घकाळ चाललेली लूट, त्यांनी अल्पावधीतच आपल्या घणाघाती व शीघ्रगती 'सामंतीशैली'मुळे मुंबई-ठाण्याच्या रस्त्यावर उघड्यावर आणून ठेवली... 

जशा  ‘मराठीत्व आणि हिंदुत्व’  या, परस्परविरोधी बाबी आहेत; म्हणजेच,  ‘हिंदुत्वा’चं पाणी पडलं की, ‘मराठीत्वा’ची आग विझलीचं समजायची...  तशीच, मूलतः  'भांडवलशाही व लोकशाही', या 'आग आणि पाण्या'सारख्या 'परस्परविरोधी' संकल्पना!  प्रत्यक्षात, ज्याला आपण  "Democracy at work"  म्हणतो, ती खरीखुरी लोकशाही-परंपरा अंशाने तरी, आपल्याला कधि कुठल्या 'काॅर्पोरेटीय-व्यवस्थे'त दिसते? ज्यावर, आजच्या  भांडवली-व्यवस्थेत आपलं सगळं अस्तित्व अवलंबून आहे व जिथे आपल्या आयुष्याचा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा वेळ व्यतीत होतो, तिथेच कायम नृशंस-संवेदनशून्य भांडवली-हुकूमशाही चालत रहावी व आपण ती चालवून देत रहावी? 

शीतयुद्धाच्या कालखंडात जोपर्यंत, अमेरिकन-युरोपीय भांडवली-जगताला, रशियन वा चिनी साम्यवाद-समाजवादाचं थेट आव्हान होतं; तोपर्यंतच, लोकशाहीचा व व्यक्ति-स्वातंत्र्याचा खोटा मुखवटा घालून भांडवलशाही पुतनामावशीसारखी जगभरात वावरत राहिली. पण,  शीतयुद्ध समाप्तीनंतर 'नवउदारमतवादा'च्या (Neo-Liberalism) रुपानं तिचं शूर्पणखेसारखं भेसूर-नृशंस 'सत्यस्वरुप'  जगासमोर आल्यावाचून शिल्लक राहू शकलं नाही! जोडीला, मानवजातीसह अवघी सजीवसृष्टी उध्वस्त करु पहाणाऱ्या  'जागतिक-तापमानवाढी'सारख्या (Global Warming) पर्यावरणीय-महासंकटांची मालिका, हे अजूनच एक वेगळंच भयंकर उत्पाती 'भांडवली-अपत्य'  त्यातूनच जन्माला आलं!

 "स्टॅलिन-माओच्या कालखंडात परिस्थितीवशात झालेल्या दुर्दैवी रक्तपाताला व कम्युनिस्टांच्या झेंड्यातील लाल रंगाला", एकाच नाण्याच्या दोन बाजू कल्पून भांडवली-व्यवस्थेनं... 'समाजवाद व साम्यवादा'ला जगभरात जनसामान्यांमध्ये केवळ नाहक बदनामच केलं नाही; तर, त्याविषयी एक फार मोठी भ्रामक-दहशत निर्माण केली. मार्क्सवादाच्या आपल्या चुकीच्या आकलनातून, मराठी कामगार-कर्मचारीवर्ग, अशा कामगारघातकी-संकल्पना कवटाळून बसू लागला.  कधि मराठीत्व, तर कधि हिंदुत्व...  अशा परस्परविरोधी दोन्ही टोकांवर 'लंबका'सारख्या फिरणाऱ्या मराठी-राजकारण्यांनी त्यांना...पोकळ-ढोंगी धर्मसंप्रदायी पंथ व सण-सार्वजनिक उत्सव, यांच्या अवसानघातकी फाजील-उत्सवप्रियतेत अडकवून पुरतं फसवलं. कम्युनिस्टांना 'लाल माकडं' संबोधून व कृष्णा देसाईंसारख्या कम्युनिस्ट नेत्यांच्या हत्या घडवून,  'साम्यवादा'ला जनसामान्यांच्या विचारविश्वातून बाद करण्याचं महापातक केलं गेलं...त्यातूनच गिरणी-कामगारांचं क्रांतिमैदान असलेली 'लालबाग', 'दलालबाग' बनली! हा मराठ्यांचा घात करणारा सिलसिला इथेच थांबला नाही; तर तो थेट लढाऊ कामगारनेते डाॅ. दत्ता सामंतांच्या हत्येपर्यंत पोहोचला. 

...द. कोरियासारख्या अनेक अर्थव्यवस्था मुळातूनच 'उत्तम-वेतन संरचने'च्या म्हणूनच तिथल्या राजकारण्यांनी आखलेल्या आणि जगभरातल्या प्रगत  पाश्चात्य देशात, तेथील कामगारवर्ग व कामगार-नेतेच त्या त्या देशातील राजकारण प्रामुख्याने चालवत असतानाची....  आपल्या देशातील, कामगार-कर्मचारीवर्गाची ही अशी किंकर्तव्यमूढ अवस्था असावी? जी अवस्था मराठी-कामगारांची; तिचं अवस्था, पहिली साम्यवादी-क्रांती झालेल्या सोव्हिएत रशियाची...  नव्वदीतल्या सोविएत युनियनच्या पतनानंतर, साधा निषेध म्हणूनही रशियन कामगारांनी ना संप केला, ना ते रस्त्यावर उतरले...  रशियन कामगारवर्गाची 'राजकीय-प्रशिक्षणशून्यता' अगदी लाजिरवाण्या पद्धतीने जगासमोर त्यातून उघडी पडली! महाराष्ट्रात डाॅ. दत्ता सामंतांसारख्या लढवय्या कामगार-नेत्याची भांडवली-व्यवस्थेकडून कट रचून हत्या झाल्यानंतर देखील, मराठी-कामगाराने घरात बसून रहाणंच पसंत केले. 

सगळ्या  कामगार-कर्मचारीवर्गाची, अन्यायी, अत्याचारी, दमनकारी असलेल्या भांडवली-व्यवस्थेसंदर्भातील एवढी आत्मघातकी उदासीनता निदर्शनास आल्यामुळेच...डाॅक्टरांचे मारेकरी आरामात सुटणे व हत्येचे सूत्रधार कधिही हाती न लागणे, हे घडणं अटळ प्राक्तन होतंच.  १६ जानेवारी-१९९७ रोजी कामगार-चळवळीचं एक पर्व संपलं...  डाॅक्टरांच्या मृत्यूसोबतच कामगार-चळवळीची मृत्यूघंटा वाजायला सुरुवात होणार होती व ती लागलीच कर्णकर्कश्श स्वरात घणघणायला देखील लागली.  तळागाळातील मराठी-श्रमिकांसाठी लढणारे व सदैव संघर्षरत असलेले कामगार-नेते  डाॅ. सामंत गेले; पण, तरीही, हाडामांसी खिळलेल्या जुन्या सवयीने, नेतृत्त्वहीन झालेल्या मराठी-कामगारविश्वाच्या आसमंतात पोकळ राजकीय-घोषणा घुमत राहिल्या "जय भवानी, जय शिवाजी, जय भीम"! 

...कामगार-चळवळ, मराठीचं राजकारण करणाऱ्यांकडूनच मारली गेली; तरीही त्या घोषणा उरल्यासुरल्या हतवीर्य, दिशाहीन झालेल्या  कायम-कामगारांच्याच नव्हे; तर, आजच्या घडीला तद्दन 'गुलाम' असलेल्या 'कंत्राटी-कामगारां'च्या तंबूतूनही, आजही ऐकू येत रहातात...  'संपत्ती-निर्मात्या'च्या, या अवनत अवस्थेला नेमकं काय म्हणायचं...?

       || जय महाराष्ट्र, जय हिंद ||  

 (संयुक्त-महाराष्ट्रानंतर, आता 'स्वायत्त-महाराष्ट्र'... राष्ट्रांतर्गत राष्ट्र, 'स्वायत्त-महाराष्ट्र'!)  

_...राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)_

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com