मराठा आरक्षण समितीचे नेते मनोज जरांगे यांना पूर्वपरवानगीशिवाय मुंबईतील आझाद मैदानावर निदर्शने करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली. मुंबईतील रहदारी आणि जनजीवन विस्कळीत होऊ नये, यादृष्टीने आझाद मैदानासह शहरातील प्रमुख जागांवर आंदोलनास परवानगी देणे उचित नाही. मात्र, जरांगे यांना निदर्शनासाठी खारघर किंवा नवी मुंबईसारखी पर्यायी जागा उपलब्ध करून देणे महाराष्ट्र सरकारसाठी खुले असल्याचेही खंडपीठाने स्पष्ट केले. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मार्ने यांच्या खंडपीठाने दिलेल्या या आदेशानुसार, मुंबई शहरातील प्रमुख ठिकाणी कोणत्याही आंदोलनास परवानगी दिली जाणार नाही, अशा स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

उच्च न्यायालयाचा हा निर्णय आला तरी मनोज जरांगे मोर्चावर ठाम आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त करत २७ ऑगस्टपासून मोर्चा काढण्याची तयारी केली आहे. त्यांच्या मार्गक्रमणाची रूपरेषा अशी आहे की, अंतरवालीहून २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मार्गक्रमण सुरू होईल. अंतरवाली – पैठण – शेवगाव (अहिल्यानगर) – कल्याण फाटा – आळे फाटा, शिवनेरी (जुन्नर मुक्कामी) असा मार्ग पार करत २८ ऑगस्टला खेड मार्गे चाकण, लोणावळा, वाशी, चेंबूर या मार्गे रात्री आझाद मैदानावर पोहचणार आहेत. २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत.
मराठा आरक्षणाचं वादळ घोंगावत असताना, मनोज जरांगे यांना मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी भाजप नेते प्रयत्नशील आहेत. संधी मिळेल त्यावेळी भाजपकडून मनोज जरांगे यांच्यावर टीका केली जात आहे. मराठा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार करत मुंबईला धडक देण्याची तयारी मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. जरांगेंच्या टार्गेटवर आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. एकनाथ शिंदे मराठ्यांना आरक्षण द्यायला तयार होते, पण देवेंद्र फडणवीसांनी आडकाठी आणली, असा आरोप जरांगेंनी केला आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी गेल्या आठ महिन्यात मराठा समाजाच्या मागण्यांचा विचार केला नाही. यावरून त्यावेळीही फडणवीसांनीच काम रोखल्याचा आरोप जरांगेंनी केला. मनोज जरांगे हे मुख्यमंत्री फडणवीसांवर सातत्यानं हल्लाबोल करत असताना एकनाथ शिंदेंनी मात्र यावर मौन बाळगलं आहे.
एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या मंत्र्यांना माध्यमांवर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये अशा सूचना केल्या आहेत. एकीकडे मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ओएसडींनी भेट घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनीही प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मात्र, आपली आणि मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींची काहीच चर्चा झाली नाही, असे जरांगे यांनी म्हटले. आम्हाला कोणताही एक रस्ता द्या. हजार रस्ते आहेत, त्यापैकी एक द्या. मी मोर्चावर ठाम आहे. मराठा आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे. माझ्या लेकराबाळांच्या आयुष्य़ाचा प्रश्न आहे. चर्चा नाही, मराठा आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे. तीन महिन्यांचा वेळ द्या म्हणाले होते. परंतु महाराष्ट्रातील मराठा समाज शांततेत निघणार, अशी माहिती मनोज जरांगे यांनी दिली.....
दरम्यान "नव्याने गठीत करण्यात आलेल्या मराठा आरक्षण उपसमितीची आज पहिलीच महत्त्वपूर्ण बैठक मंत्रालयात झाली. यापूर्वी आरक्षणासंदर्भात जी कार्यवाही झालीय त्यामुळे बऱ्यापैकी लोकांना मदत झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांसदर्भात आजच्या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली. तसंच सातारा, हैदराबाद, बॉम्बे गव्हरमेंटच्या गॅझेटियरसंदर्भात त्यांची जी मागणी आहे त्याचा आज आढावा घेण्यात आला. सगेसोयऱ्यांबाबत असलेल्या मागणीवरही चर्चा करण्यात आली. बाकी वेगवेगळ्या कायद्याच्या प्रक्रिया सुरू आहेत.
हैदराबाद गॅझेटियर आणि कुणबी नोंद शोधण्यासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी होती. आम्ही आजच्या पहिल्याच बैठकीत या समितीला सहा महिने मुदतवाढ देऊन जरांगे पाटलांची मागणी मान्य केली आहे, मराठा आरक्षण लढ्यात मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्यांना सरकारी नोकरी देण्याची मागणी होती. यातील अनेक जणांना नोकरी देण्यात आली असून फक्त नऊ जणांना नोकरी देणं बाकी असून पुढील तीन महिन्यांत ती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. तसंच सानुग्रह अनुदान देण्याचं काम पूर्ण झालेलं आहे मराठा समाजाच्या मागण्यांसदर्भात आम्ही सर्वजण सकारात्मक आहोत. आरक्षणाच्या बाबतीत शासनाची कोणतीच भूमिका नकारात्मक नाही," - राधाकृष्ण विखे पाटील
0 टिप्पण्या