महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ - फेस्कॉम, मुंबई प्रादेशिक विभागातर्फे मनोयुवा महोत्सवानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचा भव्य शुभारंभ आज करण्यात आला. या स्पर्धा पुढील १० दिवस चालणार आहेत. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर फेस्कॉमची प्रार्थना सादर करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे अण्णासाहेब टेकाळे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी त्यांनी आपल्या खुमासदार शैलीतील भाषणातून उपस्थित सर्वांचे मनःपूर्वक स्वागत केले व सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
त्यापूर्वी फेस्कॉम मुंबई प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष सुरेश पोटे यांनी आपल्या मनोगतातून स्पर्धांची माहिती दिली. काव्यवाचन, निबंध, कॅरम (सिंगल व डबल), बुद्धिबळ, ब्रिज, एकल नृत्य, समूह नृत्य, एकपात्री व द्विपात्री नाट्य अभिनय, कथाकथन, वेशभूषा, गायन (कराओके) अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून कुलाबा, दहिसर, बोरीवली, कुर्ला, मुलुंड, ऐरोली, वाशी ते पनवेलपर्यंतच्या ५०० पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांनी यात सहभाग नोंदवला आहे, असे त्यांनी सांगितले. सर्वांनी स्पर्धेचा आनंद घ्यावा व सर्वांना आनंद द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी उपाध्यक्षा श्रीमती रेखा भातखंडे यांनी नवी मुंबईला स्वच्छतेबद्दल प्रथम पारितोषिक मिळाल्याबद्दल कौतुक व अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा सराफ यांनी केले, तर आभार स्वाती फडके यांनी मानले. यावेळी फेस्कॉम मुंबई प्रादेशिक विभागाचे कार्यकारिणी सदस्य लता पोवार, दत्तराज आंब्रे, संजय साने, उज्ज्वल पाठारे, श्री. बबनराव पाटणकर, दिलीप धारकर, प्रभाकर गुमास्ते, . सुनील आचरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक, स्पर्धक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शुभारंभ सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

0 टिप्पण्या