राज्यात सध्या सुरू असलेल्या टिपूसुलतान यांच्या जयंतीच्या वादावर समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आसिम आझमी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आपली रोखठोक भूमिका मांडली. टिपूसुलतान यांचा इतिहास आणि आजच्या सरकारची धोरणे यावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर कडक शब्दांत टीका केली. अबू आसिम आझमी म्हणाले की, "टिपूसुलतान हे असे पराक्रमी योद्धे होते, ज्यांनी इंग्रजांविरुद्ध सर्वप्रथम थेट आणि कडवा लढा उभारला. जगातील पहिले रॉकेट लाँचर त्यांनी बनवले, ज्याची इंग्रजांना प्रचंड दहशत होती. ते शहीद झाल्यानंतरही त्यांच्या मृतदेहाजवळ जाण्याची हिंमत इंग्रजांमध्ये नव्हती, त्यांना भीती होती की जर त्यांच्यात प्राण शिल्लक असतील तर ते पुन्हा आम्हाला ठार करतील."
टिपूसुलतान यांच्या देशासाठी असलेल्या योगदानाचा उल्लेख करताना आझमी पुढे म्हणाले, "स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली. त्यांची बहादुरी आणि देशभक्ती पाहूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या संविधानाच्या पुस्तकात टिपूसुलतान यांचे छायाचित्र छापले आहे. मात्र, आजचे सरकार अशा महापुरुषाच्या विरोधात विधाने करत आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे." पुढे बोलताना अबू आजमी म्हणाले की, "मी इतिहासात वाचले आहे की टिपूसुलतान यांनी अनेक मंदिरे बांधली आहेत. आजही तुम्ही बंगळुरूहून म्हैसूरच्या दिशेने गेलात, तर वाटेत असे ठिकाण आहे जिथे टिपूसुलतान यांनी बांधलेले मंदिर आणि मशीद एकाच ठिकाणी आहेत आणि तिथे आजही नियमित पूजा होते. जे लोक त्यांच्यावर मंदिरे पाडल्याचा आरोप करतात, त्यांनी आजच्या सरकारने किती मशिदी पाडल्या आणि किती बांधल्या याचे उत्तर द्यावे."
देशातील सद्यस्थितीवर चिंता व्यक्त करताना आमदार आझमी म्हणाले की, "आज देशात संविधानाच्या कलम २५ चे वारंवार उल्लंघन होत आहे. मशीद भरल्यास बाहेर नमाज पठण करण्यास मज्जाव केला जातो, अजानवर बंधने आणली जात आहेत आणि कुर्बानीमध्ये अडथळे निर्माण केले जात आहेत. मुस्लिमांना राहण्यासाठी घरे नाकारली जात आहेत. ज्या सरकारने या देशात मुस्लिमांचे जगणे कठीण केले आहे, ते सरकार आज संविधानात स्थान असलेल्या टिपूसुलतान यांच्या विरोधात बोलत आहे."
भाजप आणि त्यांच्या विचारसरणीवर टीकास्त्र सोडताना आझमी यांनी सवाल उपस्थित केला की, "टिपूसुलतान यांनी इंग्रजांकडून कधी पगार घेतला होता का? की त्यांनी इंग्रजांचे तळवे चाटले होते? आज तुम्ही ज्या लोकांची नावे घेऊन राजकारण करता आणि ज्यांची पूजा करता, तेच लोक इंग्रजांकडून दरमहा पगार घेत होते आणि महात्मा गांधींच्या स्वदेशी आंदोलनाला चिरडून टाकण्याची भाषा करत होते."

0 टिप्पण्या