ठाणे महानगरपालिकेच्या ठेकेदारांनी पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून ठाण्यातील नाल्यांच्या गाळाची सफाई करण्याऐवजी ठाणेकरांच्या खिशाचीच सफाई केल्याचा आरोप काँग्रेस पक्षाकडून करण्यात आला आहे. शहरातील अनेक भागांमधील नाल्यांमधून काढण्यात आलेला गाळ अजूनही काही नाल्यांच्या काठावर ठेवण्यात आल्याचे चित्र समोर आले असून पालिकेच्या या कारभाराबाबत काँग्रेस पक्षाने संताप व्यक्त केला आहे. कापुरबावडी येथील नाल्याच्या काठावरील गाळ दोन महिन्यांपासून उचलण्यात आला नसल्याने परिसरात दुर्गंधी सोबतच डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण आढळून येत असल्याचे दिसून आले आहे.
कापुरबावडी नाका येथे असलेल्या स्लम वसाहतीतून जाणारा मोठा नाला आहे. पावसाळ्यात हा नाला तुडुंब भरून वाहत असतो. पावसाळा पूर्वी ठाणे महानगर पालिकेने नेमून दिलेल्या ठेकेदाराने नाल्यामधून गाळ काढून काठावर ठेवला आहे. या ठिकाणी 10 फुटाहून अधिक उंच आणि 30 फुटाहून अधिक रुंद गाळाचा डोंगर तयार झाला आहे. नियमानुसार नाल्यामधून बाहेर काढलेला हा गाळ जास्तीत जास्त 48 तासात उचलून घेऊन जाणे ठेकेदाराला बंधनकारक असताना घन कचरा विभागाच्या आशीर्वादाने मात्र हा गाळ दोन महिने उलटून गेलेले असतानाही उचलण्यात आलेला नाही. गेल्या दोन महिन्यांपासून येथील रहिवाशांना या गाळाच्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. गाळाची घाण रस्त्यावर पसरली असून येथील रहिवाशांवर मोठ्या प्रमाणात डासांचा हल्ला होण्याच्या तक्रारी आहेत. येथील रहिवाशांच्या तक्रारी काँग्रेस पक्षाकडे आल्यानंतर पक्षाचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी येथील रहिवाशांची भेट घेऊन त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या. दोन महिन्यांपूर्वी सुद्धा पिंगळे या ठिकाणी नाल्यामधून काढलेल्या गाळाची पाहणी करून गेले होते. त्यानंतर रहिवाशांच्या तक्रारी ऐकूण पुन्हा येथे रविवारी (ता. 3) आले असता दुर्गंधी पसरविणाऱ्या गाळाचा ढीग जैसे थे असल्याचे दिसून आले. दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला असल्याने त्यावर झूडपे उगवल्याचे दिसून आले.
दोन महिन्यांपूर्वी मी आमच्या पदाधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी आलो होतो. गाळ काढून आठवडा उलटून गेला असतानाही ठेकेदाराने तो उचलला नव्हता. त्यानंतर दोन महिन्यांनी येथे आलो आहे. मात्र गाळाच्या ढिगाची परिस्थिती जैसे थे होती. दुर्गंधी युक्त गाळाचा डोंगर येथे दिसून आला. या गाळामुळे 6 जणांना डेंग्यू झाला असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. या ठिकाणी रहिवासी स्वातंत्र्य दिनी ध्वजा रोहण करतात, दहीहंडी, गणपती उत्सव साजरे करतात. हे सर्व सण काही दिवसांवर येऊन ठेपले असतानाही घन कचरा विभागातील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ठेकेदाराने हा गाळ अजूनही उचलला नाही. त्यामुळे ठेकेदाराने 48 तासात गाळ उचलला नाही, या नियमाचा भंग केल्या प्रकरणी आणि येथील रहिवाशांच्या आरोग्याला बाधा पोहचवल्याच्या कारणावरून पालिका आयुक्तांनी ठेकेदाराला दंड थोठावतानाच त्याला काळ्या यादीत टाकायला हवे. घन कचरा विभागातील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करायला पाहिजे.
- राहुल पिंगळे, प्रवक्ते, काँग्रेस पक्ष, ठाणे
0 टिप्पण्या