मराठी सिनेमा प्रेक्षकांना सिनेमागृहात खेचून आणू शकत नाही, हे मत आता दिलीप प्रभावळकर यांनी बदलून टाकलं आहे. वय वर्षे ८१ पण अभिनयाच्या ताकदीने या तरुणाने प्रेक्षकांना चित्रपट गृहात खेचून आणलं आहे. दशावतार चित्रपट गेल्या काही महिन्यांपासून चांगलाच चर्चेत आलेला बघायला मिळाला होता. बाबुली मिस्त्री या प्रमुख भूमिकेत अष्टपैलू व बहुरूपी अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी अक्षरशः जीव ओतला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी वयाची ८१ वर्ष पूर्ण केली आहेत यावर विश्वास बसणार नाही इतक्या ताकदीने हा संपूर्ण चित्रपट त्यांनी प्रचंड ऊर्जेने व्यापून टाकलेला आहे. त्यांच्या अभिनय क्षमतेला उशिरा का होईना ह्या चित्रपटातील प्रमुख भूमिकेमुळे न्याय मिळाला आहे. या चित्रपटात ते मुख्य भूमिकेत असणार म्हणून प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल आधिच उत्सुकता होती. त्यांची भूमिका प्रेक्षकांना आवडली असून चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांना मात्र भावूक होऊन डोळे पुसत बाहेर पडावं लागत आहे. हीच तर चित्रपटाची खरी कमाल म्हणावी लागेल. बऱ्याच प्रतीक्षेनंतर मराठीत असा वेगळा विषय घेऊन आल्यामुळे प्रेक्षकांनीही या चित्रपटाचे कौतुक केले आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी त्यांनी काही स्टंट देखील केलेले आहेत. पण याच जोडीला सुनील तावडे, महेश मांजरेकर, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदलकर, भरत जाधव, रवी काळे, विजय केंकरे, आरती वाडगबाळकर या सगळ्यांनीच त्यांच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
कोकणातील इरसाल माणसांचे नमुने, तिथल्या प्रथा परंपरा, दशावतारी नाट्यकला यांचा सुरेख मिलाफ असलेल्या या चित्रपटाचे कथानक पुढे सरकताना कधी 'तुंबाड', तर कधी 'कांतारा' आठवत जातो. भयपट वाटावा असाही तो नाही. पण दिलिप प्रभावळकरांना या वयात अशा विविध भूमिकांमधे बघताना एक आगळा-वेगळा आनंद आहे हे मात्र नक्की. त्यातही अजून विशेष म्हणजे कोकणाच्या पोटातली अमूल्य अशी खनिजं पोखरून खाणा-या व्यापा-यांनी कित्येक वर्षांपासुन कोकण बोडका करायचा पण ऊचललाय. गावातल्या पोरांना पाच-दहा हजाराची नोकरी लावायची आणि 'कोकणात रोजगार दिला' अशी आवई ऊठवायची ही राजकीय खेळी तशी जुनीच आहे. दोन नोक-या देऊन शेकडो गावांच्या पिढ्या न पिढ्या बरबाद करायच्या याला बरीच वर्षे कोकणी माणूस कंटाळलेला. आणि म्हणूनच शेवटी कोकणी माणसाला कोण वाचवू शकत असेल तर तो 'दशावतार' करणारा मातीतला 'महाराजाच' हे सत्य होतं. अर्थात, हा चित्रपट वेगवेगळ्या अंगांनी लाजवाब आहे.वयाच्या ८१ व्या वर्षी अवघा पडदा व्यापून राहणारे प्रभावळकर यांनी हा शेवटचा चित्रपट करणार असं सांगितल्यापासूनच या चित्रपटाची ऊत्सुकता होती. कित्येक दशकं काम केलेलं हे 'रंगभूमीचं जग' आता सोडावं लागणार याचं भळभळीचं दुःख त्यांच्या 'भिष्म' साकार केलेल्या डोळ्यातून ओथंबून वाहतं. ते जसं पडद्यावरच्या कथानकात आहे तसंच त्यांच्या मनातही आहे. प्रेक्षकांच्या डोळ्यातुन पाणी बाहेर पडणार हे इथं ठरलेलं आहे. प्रेक्षकांच्या पाणावलेल्या कडा हे या भिष्माला देत असलेला हळहळीचा निरोप आहे. आणि हीच त्यांची आजवरची कमाई. आजवरचा त्यांचा प्रवास आणि भूमिकांचा डोंगर बघता चित्रपट क्षेत्रातला 'भिष्म' म्हणजे दिलिप प्रभावळकरच आहेत. कारण त्यांच्यासारख्या भूमिका आजपर्यंत जगाच्या कुठल्याच रंगमंचावर कुणी सादर केल्या नसतील. मराठीतल्या भिष्माचा हा शेवटचा 'दशावतार' प्रत्येक मराठी माणसाने थिएटरमधे जाऊन बघावा एवढा श्रेष्ठ नक्कीच आहे.
चित्रपटाचे नाव 'दशावतार' असल्याने कथा बीज अर्थातच देवभूमी कोकण परिसराची पार्श्वभूमी असणारे असेल हे चाणाक्ष रसिकांनी ओळखले असेलच. आपला गाव, आपले जंगल, आपला निसर्ग याचे रक्षण करायला हवे. विकासाच्या मुखवट्याआड धन दांडगे उद्योजक व राजकारणी कशा पद्धतीने जंगल, निसर्ग, पर्यावरण नष्ट करण्याचा प्रयत्न करत असतात हे आपण नेहमी पाहत असतो. या चित्रपटामध्ये जंगलाच्या तसेच गावाच्या रक्षणासाठी वाईट प्रवृत्ती विरोधात लढणाऱ्या जंगलाच्या राखणदाराची गोष्ट आहे. या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी फार उत्तम दर्जाची आहे. यासाठी या चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर देवेंद्र गोलतकर यांना दहा पैकी दहा मार्क द्यायला हवेत. देवभूमी कोकणचा सुंदर परिसर प्रेक्षकांसमोर तितक्याच ताकदीने उभा करण्यात चित्रपटाची संपूर्ण टीम यशस्वी झाली आहे. या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन व निर्मिती अशी तिहेरी जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या सुबोध खानोलकरचे करावे तितके कौतुक थोडेच आहे.
मराठीमध्ये एक चांगला सस्पेन्स थ्रिलर चित्रपट पाहण्याची ट्रीट त्यांने प्रेक्षकांना दिली आहे. अर्थात चित्रपटाचा शेवट आणखीही परिणामकारक करता आला असता हे मात्र राहून राहून वाटते. संगीतकार ए व्ही प्रफुल्ल चंद्र यांनी 'आवशीचो घो' या गाण्याला संगीत देताना पकडलेला फ्रेश मूड आवडला. इतर गाणी मात्र फारशी लक्षात राहत नाहीत. गुरु ठाकूर या चित्रपटात गीतकार व अभिनेता या दोन्ही भूमिकेत दिसला हे सरप्राईज आवडले. तीन तासांचा चित्रपट पाहून नाही आवडला तर लगेचच नावे ठेवणे, चुका शोधणे खूप सोपे आहे. पण कोणतीही कलाकृती निर्माण करताना शेकडो लोकांनी खुप कष्ट घेतलेले असतात ह्याचे भान ठेवणे आवश्यक आहे. सध्या मराठी चित्रपट सृष्टी असंख्य आव्हानांना सामोरे जात असताना असा सस्पेन्स थ्रिलर मराठी चित्रपट बनवण्याचे शिवधनुष्य समर्थपणे पेलल्याबद्दल सुबोध खानोलकर या दिग्दर्शकाचे व त्याच्या टीमचे मोठ्या मनाने कौतुक करणे आवश्यक आहे.
ओशन फिल्म्स निर्मित आणि सुबोध खानोलकर लिखित, दिग्दर्शित दशावतार चित्रपट १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. ‘दशावतार’ हा चित्रपट केवळ एक सस्पेन्स थ्रिलर नसून, भावनांचा, रूढी परंपरांचा, पारंपरिक लोककलेचा आणि आधुनिक आव्हानांचा खेळ आहे. कोकणातील भव्य निसर्ग दृश्ये, दशावतारी कलेशी संबंधित दृश्य आणि घनदाट अरण्य पाहून हा नेहमीपेक्षा वेगळा अनुभव देणारा चित्रपट असल्याची खात्री पटत आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशातील अनमोल ठेवा असलेल्या दशावतार परंपरेला मोठ्या पडद्यावर भव्यतेने मांडण्याचा प्रयत्न निर्माते-दिग्दर्शकांनी केला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर तब्बल ५८ लाखांचा गल्ला जमवला. तर विकेंडमुळे शनिवारी प्रेक्षकांनी चित्रपट गृहात हाऊसफुल्ल गर्दी केली. या चित्रपटाने १.३९ कोटीचा गल्ला जमवला. बॉलिवूड चित्रपटांनाही मागे टाकेल असा हा चित्रपट अवघ्या दोन दिवसातच तब्बल २.०२ कोटींची कमाई बॉक्सऑफिसवर करत आहे. खरं तर मराठी चित्रपट हे मराठी प्रेक्षकांपुरते मर्यादित असतात, त्यामानाने ही कमाई कमाल आहे असंच यातून म्हणावं लागेल... तर रविवारी दशावतारला चांगला प्रतिसाद मिळाला, दुपारपर्यंत या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर तब्बल ३ कोटींचा पल्ला पार केला आहे. दशावतार चित्रपट १०० कोटींचा पल्ला लवकरच गाठो हीच मनापासून सदिच्छा!
दशावतार सिनेमातून गंभीर प्रश्नाला हात घालण्यात आला आहे, मी गेली अनेक वर्ष माझ्या भाषणांमधून ही गोष्ट महाराष्ट्राला सांगत आहे की आपल्याकडच्या जमिनी वाचवा. जमीन हे आपले अस्तित्व आहे, महाराष्ट्रातील अनेक जमिनींचा हा विषय आहे, फक्त कोंकणातील जमिनींचा नाही, सुबोधने हा विषय अत्यंत चलाखीने मांडला आहे, दशावताराच्या रुपात ते मांडले असून अत्यंत उत्कृष्ट छायाचित्र, संगीत आहे. दिलीप प्रभावळकर यांनी अत्यंत चांगले काम केले आहे, मला वाटतं हे अत्यंत छोटे वाक्य आहे. कारण, ते खूप मोठे आहेत आणि त्यांनी उत्तम काम केले आहे, बाकीच्या कलाकारांनी, महेश मांजरेकर यांनीही साजेशे काम केले, प्रियदर्शनी यांनीही चांगल काम केलं. एकंदरीत हा चित्रपट एंटरटेनमेंट आहे, पण महाराष्ट्रातील अत्यंत गंभीर विषयाला त्यांनी हात घातला आहे, त्यामुळे नक्की हा सिनेमा पाहायला हवा,- मनसेप्रमुख राज ठाकरें

0 टिप्पण्या