अनधिकृत बांधकामांची स्मार्ट सिटी म्हणून ख्याती पावलेल्या ठाण्यात मागील काळात मोठ्या प्रमाणात अनधिकृत इमारतीची निर्मिती झाल्याने नागरिकरणातही प्रचंड वाढ झाली आहे. तरीही महापालिकेने २०१७ प्रमाणेच प्रभाग रचना कायम ठेवल्याने ठाणेकर नागरिकांनी यावर तब्बल २७० हरकती आणि सूचना नोंदवल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत हीच रचना कायम ठेवण्यात आल्याने प्रभाग आणि नगरसेवक संख्येत वाढ झालेले नाही. यात चार सदस्यांच्या प्रभाग रचनेत ५० ते ६२ हजार लोकसंख्येचा एक प्रभाग तयार करण्यात आला आहे. तर, तीन सदस्यांचा प्रभाग ३८ हजार लोकसंख्येचा करण्यात आला आहे. भौगोलिक सीमांकन आणि वाढत्या लोकसंख्येचा विचार न करताच ही प्रभाग रचना असल्याच्या बहुसंख्य तक्रारींचा यात समावेश आहे. ३ सप्टेंबरपर्यंत केवळ ६० हरकती व सूचना नागरिकांनी दाखल केल्या होत्या.
ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या वार्ड रचनेवर "सेव्ह दिवा फाउंडेशन"ने हरकत नोंदवली आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड. रोहिदास मुंडे यांनी गुरुवारी आयुक्तांना सविस्तर निवेदन देऊन प्रभाग क्रमांक २७, २८, २९ आणि ३० मधील अन्यायकारक विभागणीविरोधात तीव्र आक्षेप नोंदवले. प्रभाग क्रमांक २९ मध्ये २७ आणि २८ मधील भागांचा जबरदस्ती समावेश करण्यात आला आहे. यामुळे भौगोलिक सलगता तुटली असून लोकसंख्या असमतोल निर्माण झाला आहे. परिणामी प्रभाग क्रमांक ३० वर १५ ते १८ टक्के अतिरिक्त लोकसंख्येचा भार पडला आहे. "ही विभागणी पूर्णपणे कायदेशीर निकषांच्या विरोधात असून जनतेच्या न्याय्य प्रतिनिधित्वावर सरळ आघात आहे, असे मुंडे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
दिव्यातील प्रभाग रचनेविरोधात भाजपचे ठाणे शहर उपाध्यक्ष विजय भोईर यांनीही आक्षेप नोंदविले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने नागरिक गावी गेलेले असून अनेकांना संबंधित माहिती वेळेवर उपलब्ध झाली नाही. अनेक लोक गावी गेले असताना स्थानिक स्वराज्य संस्थेची प्रारूप रचना प्रकाशित करणे ही बाब अत्यंत चुकीची आहे. त्या रचनेवर हरकत घेण्यासाठी नागरिकांना संधी मिळाली नाही. महापालिका आयुक्त आणि निवडणूक अधिकारी यांनी ही संपूर्ण प्रक्रिया सर्वसमावेशक स्वरूपात राबवावी. केवळ ठराविक गटाला लाभ होईल अशा पद्धतीने नियोजन होऊ नये. अशी मागणीही त्यांनी केली आहे.

0 टिप्पण्या