Top Post Ad

व्होटचोरी... आता मुंबई मराठी साहित्य संघाच्या निवडणुकीतही

सध्या देशात सर्वत्र मतचोरीचे प्रकरण चांगलेच गाजत असतानाच आता मुंबई मराठी साहित्य संघाच्या निवडणुकीतही हाच मतचोरीचा प्रकार सर्रास सुरू आहे. संघातील कर्मचारी आणि निवडणूक अधिकारी यांच्याशी संगनमत करून ६०० सदस्यांच्या मत पत्रिका चोरून लपवून ठेवल्या आहेत. योग्य वेळी त्या पेटीत टाकायच्या,असे कारस्थान सुरू आहे. तसेच मतदारांना आता '  डुप्लिकेट   ' मत पत्रिका दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप डॉ.भालेराव विचार मंच पॅनलच्या उमेदवारांनी डॉ. उषा तांबे यांच्या 'ऊर्जा' पॅनलवर केला आहे. निवडणुकीचा कंत्राटदार आणि निवडणूक अधिकारी यांची फौजदारी चौकशी व्हावी, अशी मागणीही भालेराव पॅनलने केली आहे. गिरगाव येथील मुंबई मराठी साहित्य संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सुरू असलेल्या मनमानी कारभाराबाबत ही निवडणूक लढविणाऱ्या डॉ.भालेराव विचार मंच पॅनलचे उमेदवार प्रा.नरेंद्र पाठक, प्रमोद पवार, दिवाकर दळवी, अनिल गजके, सारंग दर्शने, विनोद सातपुते, सतिश करंदीकर यांनी मंगळवारी मुंबई मराठी पत्रकार भवन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

याबाबत अधिक माहिती देतांना  प्रा.नरेंद्र पाठक, प्रमोद पवार  म्हणाले,  संघाचे सदस्य सोमेश कोलगे यांना मतपत्रिका मिळाली नाही, मात्र संघाच्या नोंदीप्रमाणे इंडिया पोस्ट द्वारे कुरिअर करण्यात आल्याचे दाखवले गेले. संबंधित मतपत्रिकेचा कन्साइनमेंट क्रमांक EM804399024IN असून १६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११:३२ वाजता ४१ रुपये भरून कुरिअर बुक केल्याचे पावतीवर नमूद आहे. परंतु इंडिया पोस्टच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासणी केली असता ३ सप्टेंबरपर्यंत “Article Not Booked” अशी नोंद दिसून आली. म्हणजेच मतपत्रिका प्रत्यक्षात पोस्ट ऑफिसला दिल्याच नाहीत, केवळ रिसिट तयार करून जमा करण्यात आल्या. परिणामी सदस्यांना मतपत्रिका न मिळाल्याने ते मतदानापासून वंचित राहिले. निवडणूक अधिकारी ऍड. यशोधन दिवेकर यांनी या गैरप्रकाराकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले,  

खासगी एजन्सीने मतपत्रिका प्रत्यक्षात न पाठवता केवळ रिसिट दिल्या असून यामुळे फौजदारी स्वरुपाचा आर्थिक घोटाळा झाल्याची शक्यता आहे. इतकेच नव्हे तर ३० ते ४० मृत व्यक्तींनाही मतपत्रिका पाठवण्यात आल्या असून जवळपास २०० पत्रिका चुकीच्या पत्त्यामुळे परत आल्या आहेत. निवडणूक जाहीर होण्याआधी सहा महिने मतदार याद्या अद्ययावत करण्याची सूचना देण्यात आली होती. मात्र प्रमुख कार्यवाह डॉ. अश्विनी भालेराव यांनी त्याची गरज नाही असे सांगत याद्या अद्ययावत केल्या नाहीत. त्यामुळे मृत व्यक्ती, चुकीचे पत्ते आणि चुकीचे संपर्क क्रमांक यामुळे मोठा गोंधळ झाला. ऊर्जा पॅनलचे उमेदवार व काही सदस्यांनी निवडणूक अधिकारी, संघाचे कर्मचारी आणि खासगी एजन्सी यांच्यावर संगनमत करून ६०० मतपत्रिका लपवल्यात आला असून या प्रकरणात निवडणूक अधिकारी आणि कंत्राटदार एजन्सी यांच्यावर फौजदारी चौकशी व्हावी तसेच निवडणूक नव्याने घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

निवडणुका जाहीर होण्यापूर्वी मतदार यादी अद्यावत करणे गरजेचे होते. मात्र संघाच्या कार्यवाह डॉ.अश्विनी भालेराव यांनी त्याची काही आवश्यकता नसल्याचे सांगत आमची सूचना दुर्लक्षित केली. आम्ही ४०० रुपये भरून यादी घेतली. त्यातील १३१५ मतदारांना आमचा जाहीरनामा पाठविला. सदस्य यादी अद्यावत नसल्यामुळे ३४५ पत्रे परत आली. मतदारांकडे चौकशी केली असता त्यांना अदयाप मत पत्रिका मिळालेल्या नाहीत. ऊर्जा पॅनलचे डॉ. उषा तांबे, डॉ. भालेराव, भागवत, मेहेंदळे, हिंगलासपूरकर, केंकरे व इतर उमेदवारांनी निवडणूक अधिकारी ऍड. यशोधन दिवेकर आणि संघातील कर्मचारी यांच्याशी संगनमत करून ६०० मत पत्रिका लपवून ठेवल्या आहेत. योग्य वेळी ही मत पेटीत टाकायची कारस्थान रचण्यात आले आहे. मत पत्रिकेचे कंत्राट ज्या खासगी एजन्सीला देण्यात आले त्या एजन्सीने प्रत्यक्षात मतपत्रिका न पाठविता केवळ बुकिंग रिसिट साहित्य संघात जमा केली. हा  फौजदारी स्वरूपाचा आर्थिक घोटाळा असून त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही डॉ.भालेराव विचार मंच पॅनलचे प्रमोद पवार यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com