मराठा जातीला EWS (१० टक्के) आणि SEBC (१० टक्के) असे दुहेरी आरक्षणाचा लाभ आज मिळत असतानाही कुणबी म्हणून त्यांना ओबीसींमध्ये घुसायचे आहे. मराठा जातीच्या ओबीसीमधील घुसखोरीविरोधात आपण ओबीसी म्हणून कायमच लढत आलो असलो, तरी ५८ लाख कुणबी नोंदीद्वारे मराठा समाज मागच्या दाराने ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत आहे. यापूर्वीही मराठ्यांना 'मराठा कुणबी' आणि 'कुणबी मराठा' म्हणून दाखले दिले जात आहेतच. तरीही राज्य सरकार मराठा जातीच्या प्रचंड दबावापुढे झुकत आहे. राजकीय व्यवस्थेवर तर उच्च जातींनीच कब्जा केला आहे. आता तर दि. २ सप्टेंबर, २०२५ रोजी हैद्राबाद गॅझेटीयर लागू करण्याच्या नावाखाली मराठ्यांना सरसकट कुणबी जातीचे दाखले देण्यासाठी शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आला आहे. या GRच्या आधारे प्रगत, प्रतिष्ठीत, प्रस्थापित मराठा समाजाला कुणबी जातीच्या दाखल्यांचे खुलेआम आणि युद्धपातळीवर वाटप केले जात आहे. हा कुणबी-ओबीसींवर घोर अन्याय आहे.
कुणबी जातीचे कुळ कायद्यासारखे इतर अनेक प्रश्न्न कित्येक वर्षे प्रलंबित आहेत. ओबीसींचा राज्यसरकारच्या नोकरीतील सुमारे २ लाखाचा अनुशेष भरला जात नाही. ओबीसींची आर्थिक विकास महामंडळे, महाज्योती (प्रशिक्षण संस्था), शिष्यवृत्ती, वसतिगृहे यासाठी राज्याच्या बजेटमध्ये पुरेशी आर्थिक तरतूद केली जात नाही. जी तरतूद केली आहे, त्यापैकी रु. ३८०० कोटीपेक्षा जास्त निधी ओबीसी विभागाकडे वर्गच केला नाही, कोकणातील एकाही जिल्ह्यात सरकारने मंजूर केलेली विद्यार्थी आणि विद्यार्थीनींसाठी वसतिगहे सुरुच केली नाहीत. याऊलट एकट्या मराठा जातीसाठी अंदाजे रु. २५००० कोटीपेक्षा जास्त निधी वापरण्यात आला आहे. हा गोर-गरीब कुणबी-ओबीसींवर अन्याय नाही का? हा अन्याय किती दिवस सहन करायचा? किती दिवस बर्फाच्या थड गोळ्यासारखे गप्प बसून आपल्या डोळ्यादेखत आमच्या पुढील पिढीचे वाटोळे होत असलेले पहात बसायचे? आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.- १) हैद्राबाद गॅझेटीअर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा-कुणबी किंवा मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबतचा जीआर म्हणजे ओबीसींचे आरक्षण संपविण्याचा सरकारचा कट आहे. हा जीआर मागे घेण्यात यावा.
- २) मराठा समाजाचा कोणत्याही प्रकारे व कोणत्याही परिस्थितीत प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे ओबीसीमध्ये समावेश करण्यास आमचा ठाम विरोध आहे.
- ३) मराठा समाज सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास नसतानासुद्धा ५८ लाख मराठ्यांना कुणबी नोंदीद्वारे दिले गेलेले बोगस जातीचे दाखले तात्काळ रद्द करण्यात यावेत.
- ४) मराठा समाजाच्या कुणबी नोंदी तपासण्यासाठी स्थापन करण्यात आलेली आणि मराठ्यांच्या दबावाखाली पुन्हा पुन्हा मुदतवाढ देण्यात आलेली न्या. संदिप शिंदे समिती ही घटनाबाह्य असून ती तात्काळ बरखास्त करण्यात यावी.
- ५) २००४ साली ओबीसीच्या यादीत 'अ. क्र. ८३ कुणबी' मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या 'मराठा कुणबी' आणि 'कुणबी मराठा' या पोटजातीच्या समावेशाबाबतचा शासन निर्णय रद्द करून त्यांना ओबीसी यादीतून वगळण्यात यावे.
- ६) कुणबी आणि मराठा एक नाहीत, याबाबत दि. ५ मे, २०२१ रोजीचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा स्वयंस्पष्ट आहे. याची राज्यशासनाने दखल घेऊन मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसी आरक्षण देण्यात येऊ नये.
- ७) मराठा समाज हा खुल्या जागा, EWS, SEBC आणि बोगस कुणबी नोंदीद्वारे OBC आरक्षणाचा लाभ घेत आहे. तरी हे बोगस दाखले रोखण्यासाठी जातीचा दाखला आधार कार्डला लिंक करण्यात यावा,
- ८) ओबीसींचा राज्य सरकारच्या नोकऱ्यांमधील अनुशेष ताबडतोब भरण्यात यावा.
- ९) भारताची सार्वत्रिक जनगणना हि जातनिहाय झाली पाहिजे.
- १०) लोकनेते शामराव पेजे समिती व महाराष्ट्र राज्य कुणबी उच्चाधिकार समिती (शंकरराव म्हसकर) या दोन समितीच्या शिपारशींची अंमलबजावणी ताबडतोब व्हावी.
- अशा मागण्या सरकारकडे करण्यात येणार असून ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता कुणबी-ओबीसीं आझाद मैदान, फोर्ट, मुंबई येथे लाखोंच्या संख्येने मोर्चात सहभागी होणार असल्याची माहीती कुणबी समाजोन्नती संघाचे सरचिटणीस कृष्णा वि. वाण यांनी दिली.


0 टिप्पण्या