Top Post Ad

तीन जागांपैकी एक स्वीकृत नगरसेवकाची जागा द्या- मनसेची आग्रही भूमिका

 मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत जागा वाटपावेळी ठाकरेंच्या शिवसेनेला अधिकाधिक जागा देऊन अगदी मोजक्या जागांवर मनसेने निवडणूक लढवली. त्यावेळी कुठलाही आग्रह मनसेने केला नाही किंवा जागा वाटपाच्यावेळी पेच निर्माण केला नाही. त्यामुळे आता तीन जागांपैकी एक स्वीकृत नगरसेवकाची जागा मनसेसाठी सोडावी, असं मत मनसेच्या काही नेत्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाट्याला निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये तीन स्वीकृत नगरसेवक मुंबई महापालिकेमध्ये देता येणार आहेत. या तीन पैकी दोन नगरसेवक हे ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि एक नगरसेवक मनसेचा असावा असं मनसेच्या नेत्यांचा आग्रह असल्याची सूत्रांची माहिती आहे.   मुंबई महापालिकेत विविध पदावर निवडून आलेले सहा नगरसेवकांना संधी मिळावी त्यासोबतच स्वीकृत नगरसेवक मिळावा यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेसोबत चर्चा करून निर्णय घ्यावा, अन्यथा इतर प्रस्तावांचा सुद्धा विचार केला जावा, असेही मत मनसेच्या बैठकीत मांडण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. 

मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सभागृहात पहिल्यांदाच तब्बल 10 स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होणार आहे. 2023 मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेत पारित झालेल्या विधेयकानुसार स्वीकृत नगरसेवकांची संख्या पाचवरून दहावर वाढवण्यात आली होती. मुंबई महापालिकेच्या एकूण 227 निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्याबळानुसार भाजपाकडे (BJP) सर्वाधिक 89 नगरसेवक आहेत. त्यामुळे दहा स्वीकृत नगरसेवकांपैकी किमान चार सदस्य भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपनंतर उद्धव ठाकरे  यांच्या शिवसेनेला सर्वाधिक स्वीकृत नगरसेवक मिळण्याची शक्यता असून, एकनाथ शिंदे यांची शिवसेना तसेच काँग्रेसला देखील स्वीकृत नगरसेवक मिळणार आहेत. ठाकरेंची शिवसेना आपल्या तीन स्वीकृत नगरसेवकापैकी एक स्वीकृत नगरसेवकांचे पद मनसेला देणार का? आणि तिन्हीही स्वीकृत नगरसेवक ठाकरे यांच्या शिवसेनेने दिले तर मनसे काही वेगळी भूमिका घेणार का? हे लवकरच समोर येईल.

स्वीकृत नगरसेवक हा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील एक विशेष सदस्य असतो. त्याची निवड थेट जनतेद्वारे होत नाही. शहरातील अनुभवी, कार्यकुशल आणि विविध क्षेत्रात (प्रशासन, कायदा, आरोग्य, अभियांत्रिकी, शिक्षण, सामाजिक सेवा इ.) योगदान देणाऱ्या व्यक्तींना ही संधी दिली जाते. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शासकीय अधिकारी, वकील, डॉक्टर, अभियंते, शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा यात समावेश अपेक्षित असतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com