Top Post Ad

पहिले राज्यस्तरीय मोडी लिपी संमेलन उत्साहात संपन्न

मुंबई, दादर इथल्या शिवाजी मंदिराच्या शाहू महाराज सभागृहात आज आयोजित करण्यात आलेले पहिले राज्यस्तरीय मोडी लिपी संमेलन – २०२६ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या प्रतिसादात संपन्न झाले. या संमेलनात मुंबई आणि मुंबई बाहेरील एकंदरीत ३०० मोडी लिपी अभ्यासक आले होते. या संमेलनाचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध मोडी लिपी अभ्यासक व शस्त्र संग्राहक. सुनीलजी कदम यांनी भूषविले, तर स्वागताध्यक्ष म्हणून मोडी लिपी अभ्यासक. पंकजजी भोसले यांनी जबाबदारी पार पाडली.


सकाळी ९:३० वाजल्यापासून नोंदणी व प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली. चहा-नाश्त्यानंतर कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात सूत्रसंचालक डॉ. तेजस लोखंडे यांच्या संचालनाखाली झाली. प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर मोडी लिपी संवर्धक. अमित घाटये यांनी प्रास्ताविकातून संमेलनाच्या उद्देशांवर प्रकाश टाकला. 

पहिल्या सत्रात , श्रीशिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे यांचे सचिव सुधीरजी थोरात यांनी “मोडी लिपीतून खऱ्या इतिहासाचा मागोवा” या विषयावर मार्गदर्शन करताना मोडी कागदपत्रांमधून उलगडणाऱ्या इतिहासाचे महत्त्व आणि सध्या वाचन न झालेले असे अनेक रुमाल पुराभिलेख संचालनालयात वाचनाच्या प्रतीक्षेत आहेत असे मत स्पष्ट केले.

संमेलनातील विशेष आकर्षण ठरलेल्या “मोडी लिपीचा युवा संवाद” या चर्चासत्रात डॉ. तेजस लोखंडे यांनी मुलाखतकार म्हणून युवा पिढीच्या नजरेतून मोडी लिपीचे महत्त्व उलगडून दाखविले. यामध्ये अनिकेत खाडीलकर, दर्शना वेताळ आणि अंजली तांबे यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या नवीन पिढीच्या मुलांनी ही मोडी लिपी स्वतः आत्मसात करून आज त्यांच्याच वयोगटातील अनेक त्यांच्याच मित्र-मैत्रिणींना मोडी ची गोडी लावत त्यांना सुद्धा मोडी शिकवत आहेत आणि येत्या भविष्यामध्ये डिजिटल माध्यमातून या मोडीचे सुवर्ण दिन ते पाहत आहेत.

 “मोडी लिपी संवर्धन – परिसंवाद” या महत्त्वपूर्ण चर्चासत्रात श्री. पंकज भोसले यांनी मुलाखतकार म्हणून सूत्रे हाताळली. या परिसंवादात सुधीरजी थोरात (सचिव, शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे),  सुनीलजी कदम (मोडी लिपी प्रशिक्षक,अभ्यासक आणि शस्त्र संग्राहक), श्री. महेशजी जोशी (मोडी लिपी प्रशिक्षक व लेखक) आणि श्रीमती कांचन फिरदौस कराई (व्यावसायिक मोडी लिप्यंतरकार) यांनी मोडी लिपी संवर्धन, अभ्यास, पुराभिलेख संचालनालय आयोजित मोडी प्रमाणपत्र परीक्षा, प्रशिक्षण , AI आणि त्याचा मोडी लिपी मध्ये होणारा अंतर्भाव, आणि लिप्यंतरण याविषयी सखोल विचार मांडले.

संमेलनाध्यक्ष सुनीलजी कदम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मोडी लिपी ही महाराष्ट्राच्या ऐतिहासिक अस्मितेची ओळख असून तिचे जतन आणि संवर्धन ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

समारोप प्रसंगी शिवव्याख्याते अभयजी जगताप यांनी आपल्या भाषणातून मोडी लिपीच्या प्रसारासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता अधोरेखित केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अमित घाटये यांनी केले. वंदे मातरम् ने संमेलनाची सांगता करण्यात आली.

संमेलनादरम्यान भरविण्यात आलेल्या विशेष प्रदर्शनीत शिवकालीन मोडी कागदपत्रे, मोडी लेखन साहित्य, हेमाद्री मोडी लिपी अंक, मोडी लिपीतील साहित्य, दिवाळी अंक, कलाकृती आणि मोडी लिपी मंथन पुस्तक यांना उपस्थितांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. मोडी लिपीच्या जतन, अभ्यास आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हे पहिले राज्यस्तरीय संमेलन ऐतिहासिक आणि प्रेरणादायी ठरले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com