Top Post Ad

bookpublication शिवा इंगोले यांच्या 'अक्षराचा तिसरा डोळा' या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटर्स असोसिएशनच्या वतीने क्रांतिकारी लेखक बाबुराव बागूल यांच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ आंबेडकरी कवी शिवा इंगोले यांच्या 'अक्षराचा तिसरा डोळा' या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा दादर येथील सुरेंद्र गावस्कर सभागृहात उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी न्यायाधीश डी. के. सोणवणे, समीक्षक प्रा. डॉ. अनिल सपकाळ, प्रा. रामप्रसाद तौर आणि प्रा. कुसुम त्रिपाठी उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात डॉ. मुणगेकर म्हणाले, "शिवा इंगोले यांनी आपल्या कवितेत पौराणिक संदर्भांचा अत्यंत समर्पक वापर केला आहे. त्यांची कविता क्रांतिकारी लेखक बाबुराव बागूल यांच्या साहित्यप्रतिभेशी नाते सांगणारी आहे. बाबुराव बागूल यांचे समग्र वाङ्मय प्रकाशित करण्यासाठी आवश्यक आर्थिक पाठबळासह पुढाकार घेण्यास आम्ही तयारआहोत." प्रा. डॉ. अनिल सपकाळ यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "शिवा इंगोले यांची कविता संस्कृतीला प्रश्न विचारणारी, समाजाच्या नवनिर्मितीचा ध्यास घेणारी आणि चिंतनगर्भ तत्त्वज्ञान व्यक्त करणारी महत्त्वपूर्ण काव्यनिर्मिती आहे."

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बाबुराव बागूल यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. तसेच दिवंगत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत कुमार सप्तर्षी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटर्स असोसिएशनचे सचिव नाना आहिरे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.मनोगत व्यक्त करताना कवी शिवा इंगोले म्हणाले, "बाबुराव बागूल अर्थात 'आबा' यांच्याशी संवाद साधताना दहा ग्रंथ वाचल्याचे समाधान मिळत असे. त्यांनीच मला लिहिण्याची प्रेरणा दिली, हातात लेखणी दिली, शब्द दिले आणि जगाकडे पाहण्याची दृष्टी दिली."

या प्रसंगी कवी शिवा इंगोले यांच्या पत्नी उषा इंगोले यांचा डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माजी न्यायाधीश डी. के. सोणवणे आणि प्रा. कुसुम त्रिपाठी यांनीही शिवा इंगोले यांच्या काव्यप्रतिभेचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन कवी सुधाकर सरवदे यांनी केले. यावेळी गझलकार भागवत बनसोडे, पत्रकार गुणाजी काजिर्डेकर, विश्वनाथ बोरकर, सुबोध मोरे, लेखक गजानन अलोने, शिल्पकार वनदेव अठोर, श्रीकृष्ण ठोंबरे, प्रा. डॉ. बहिरव, आण्णा त्रिभुवन, मोहन वाघमारे, सुनील ओवाळ, डॉ. महादेव कांबळे, सुरेखा पैठणे, अविनाश कदम, भटू जगदेव, राजरत्न राजगुरू, मधू कांबळे, दीपक पवार, भास्कर बोराळे, मंगेश बनसोडे, कवी काळखेर, चंद्रमणी तांबे, सूर्यकांत खरात, अमोल निकाळजे यांच्यासह अनेक साहित्यिक, कवी, लेखक व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com