Top Post Ad

Dadar मंडईत दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी अभिनव प्रकल्प राबविण्याचे निर्देश

दादरस्थित मॉं साहेब मीनाताई ठाकरे फुल बाजार परिसरातील विक्रेत्यांनी टाकलेल्या फुलांची विल्हेवाट लावण्यासाठी विशेष प्रकल्प हाती घेण्यात यावा. तसेच दादर स्थानक (पश्चिम) नजीकच्या क्रांतिसिंह नाना पाटील महानगरपालिका भाजी मंडई परिसरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची त्याच ठिकाणी विल्हेवाट लावण्याच्या अनुषंगाने प्रभावी उपाययोजना करावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा लवंगारे यांनी दिले. दैनंदिन स्वरूपात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट स्थानिक पातळीवरच करण्यासाठी अभिनव प्रकल्प राबविण्याबरोबरच त्याद्वारे रोजगारही उपलब्ध होईल, यादृष्टीने प्रयत्न करावेत, असेही त्या म्हणाल्या. 


टाकाऊ फुलांची विल्हेवाट लावण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाची चाचपणी करावी, जेणेकरून दररोज क्षेपणभूमीवर हा कचरा पाठवण्याचा ताण कमी करता येईल. जी उत्तर विभागाने त्यादृष्टीने स्वयंसेवी संस्था तसेच व्यापारी संघटना यांच्या सहकार्यातून कचऱ्याची विल्हेवाट स्थानिक परिसरात कशी लावता येईल, यासाठी विशेष प्रयत्न करावेत अशा सूचना श्रीमती प्राजक्ता वर्मा लवंगारे यांनी दिल्या. 

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्रीमती प्राजक्ता वर्मा लवंगारे यांनी आज (दिनांक २२ ऑगस्ट २०२६) परिमंडळ २ अंतर्गत एफ उत्तर आणि जी उत्तर विभागातील विविध परिसर व प्रकल्प ठिकाणांना भेट दिली. यावेळी त्यांनी निर्देश दिले.यावेळी उपायुक्त (परिमंडळ २) श्री. प्रशांत सपकाळे, सहायक आयुक्त (एफ दक्षिण) श्रीमती वृषाली इंगळे, सहायक आयुक्त (जी उत्तर) श्री. योगेश देसाई, सहायक आयुक्त (बाजार) श्री. सुनिल माने तसेच विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. 

दादर स्थित मॉंसाहेब मीनाताई ठाकरे फुल बाजार परिसरात दररोज १० मेट्रिक टन इतक्या प्रमाणात टाकाऊ फुलांची विल्हेवाट लावण्याचे काम करण्यात येते. क्षेपणभूमीला वाहतूक करून हा कचरा नेण्यापेक्षा नजीकच्या परिसरातच फुलांपासूनचे सेंद्रीय खत, अगरबत्ती यासारखी उत्पादने निर्माण करणे शक्य आहे. त्यासाठी जी उत्तर विभागाने फुलांच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठीचा प्रकल्प हाती घ्यावा. त्यामुळे फुलांच्या कचऱ्यासोबत इतर कचरा वर्गीकरण शक्य होईल. स्थानिक ठिकाणीच कचऱ्याची विल्हेवाट लावल्याने रोजगार निर्माण होतानाच कचऱ्याची समस्याही मार्गी लागेल. त्यादृष्टीने प्रयत्न करावेत अशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. वाहतूक कोंडी विषयाच्या अनुषंगाने या मार्गावरील वाहनचालकांची गैरसोय  होणार नाही, यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना श्रीमती वर्मा लवंगारे यांनी जी उत्तर विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. फुल बाजाराबाहेरील परिसरात मालवाहू वाहने पार्किंग होणार नाही यादृष्टीने उपाययोजना कराव्यात. व्यापारी संघटनांनीही रस्त्यावर वाहने पार्किंग न करता निर्धारित जागेत उभी करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन श्रीमती वर्मा लवंगारे यांनी केले. 

दादर स्थानक (पश्चिम) परिसरातील क्रांतिसिंह नाना पाटील महानगरपालिका भाजी मंडईच्या परिसरात दररोज सुमारे १५ मेट्रिक टन इतक्या प्रमाणात भाजीपाल्याचा कचरा निर्माण होतो. या कचऱ्याची विल्हेवाटदेखील स्थानिक परिसरात लावणे शक्य आहे. दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यापासून भूकटी, गॅस तसेच सेंद्रीय पद्धतीची उत्पादन निर्मिती शक्य आहे.  त्यामुळे भाजीपाल्याच्या कचऱ्याची विल्हेवाट स्थानिक पातळीवरच लावण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना श्रीमती प्राजक्ता वर्मा लवंगारे यांनी दिल्या. दैनंदिन स्वच्छतेच्या उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच भाजी मंडई परिसरात रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीचा विषय सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना श्रीमती प्राजक्ता वर्मा लवंगारे यांनी यावेळी दिल्या.       

    गणेशोत्सव कालावधीत भक्तांसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना, स्वच्छतेची कार्यवाही, रांग व्यवस्थापनासाठी बॕरिकेटींगची व्यवस्था, मंडप रांगेच्या परिसरातील वैद्यकीय सुविधांचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा - लवंगारे यांनी लालबाग सार्वजनिकक गणेशोत्सव मंडळ येथे भेट दिली. गणेश भक्तांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यादृष्टीने तयारी करण्याचे निर्देश श्रीमती प्राजक्ता वर्मा लवंगारे यांनी दिले.

माहीम मच्छीमार वसाहत येथून पश्चिम द्रुतगती मार्ग (वांद्रे) आणि वरळी वांद्रे सेतू यांना जोडल्या जाणाऱ्या उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामाचीही त्यांनी या भेटीदरम्यान पाहणी केली. प्रकल्प मार्गावर पुनर्वसनाची गरज असलेल्या कुटुंबांचे स्थलांतर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासोबत समन्वय साधण्याची सूचना त्यांनी केली. अडथळा ठरणारी बांधकामांचे निष्कासन विहित वेळेत करून प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com