Top Post Ad

FDAnews 1.85 कोटींचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त, 49 जण अटकेत

राज्यातील अन्न भेसळ, निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ आणि प्रतिबंधित गुटखा-पानमाला विक्रीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) 16 ते 20 जुलै 2026 या कालावधीत राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवून मोठी कारवाई केली. या मोहिमेत प्रतिबंधित गुटखा-पानमसाल्याचा 1 कोटी 80 लाख 32 हजार 893 किमतीचा साठा जप्त करण्यात आला असून 37 एफआयआर दाखल करून 49 जणांना अटक करण्यात आली. याशिवाय विविध प्रकारच्या अन्नपदार्थांचा लाखो रुपयांचा साठा जप्त करण्यात आला असून अनेक हॉटेल, रेस्टॉरंट आणि डेअरी आस्थापनांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे.

मोहिमेदरम्यान दूध व दुग्धजन्य पदार्थांवर विशेष भर देण्यात आला. राज्यभरातून 1,731 लिटर दूध आणि 896 किलो दुग्धजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. या साठ्याची एकूण किंमत 1 लाख 44 हजार 894 इतकी आहे. गोवंडी येथील सूफी डेअरीमध्ये दूध आवश्यक तापमानात साठवले जात नसल्याचे आढळल्याने 1,683 लिटर दूध (किंमत 1.07 लाख) जप्त करून जागेवरच नष्ट करण्यात आले. लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे संशयित 9 किलो खवा, तर बीडमध्ये नोंदणी न घेता दूध विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर 25 हजारांचा दंड ठोठावण्यात आला. धाराशिव जिल्ह्यातील शालेय पोषण आहारासाठी वापरण्यात येणाऱ्या सोयाबीन वडीत आळ्या आढळल्याने संबंधित साठा जप्त करण्यात आला. सिन्नर येथील दोन दूध आस्थापनांमधून संशयित निकृष्ट दर्जाचे 887 किलो दूध जप्त करण्यात आले.

अन्न व औषध प्रशासनाने प्रतिबंधित पानमसाला, गुटखा आणि सुगंधित तंबाखूविरोधात राज्यभर धडक कारवाई केली. एकूण 53 धाडी टाकण्यात आल्या. या कारवाईत प्रतिबंधित आणि इतर अन्नपदार्थ मिळून 18 कोटी 58 लाख 91 हजार 142 किमतीचा माल जप्त करण्यात आला. इतर अन्नपदार्थांचा 2,796.5 किलो साठा (किंमत 5.56 लाख) देखील जप्त करण्यात आला. विभागनिहाय कारवाईत बृहन्मुंबई विभागात 20 आस्थापनांवर कारवाई करून ₹29.97 लाखांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. 16 एफआयआर दाखल झाले, 24 जणांना अटक झाली, 17 आस्थापने सील करण्यात आली आणि दोन वाहने जप्त करण्यात आली. कोकण विभागात ₹1.02 लाखांचा साठा जप्त करून दोन एफआयआर आणि तीन अटक करण्यात आल्या. छत्रपती संभाजीनगर विभागात ₹17.50 लाखांचा साठा जप्त करून सहा एफआयआर व आठ अटक, नागपूर विभागात ₹8.36 लाखांचा साठा जप्त करून सहा एफआयआर व आठ अटक, अमरावती विभागात तब्बल ₹1.23 कोटींचा प्रतिबंधित साठा जप्त करून एक एफआयआर आणि एक अटक, तर नाशिक विभागात ₹17,524 किमतीचा साठा जप्त करून दोन एफआयआर दाखल करण्यात आले.

स्वच्छतेचे नियम पायदळी तुडवणाऱ्या अन्न आस्थापनांवरही प्रशासनाने कठोर कारवाई केली. राज्यभर 103 हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे आणि कॅन्टीनची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 34 आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या, तर 16 अन्न व्यवसायांचे परवाने निलंबित करण्यात आले. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अमरावती, नागपूर आणि जळगाव येथील अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बेकरी, कॅन्टीन आणि डेअरींमध्ये स्वच्छतेचे गंभीर उल्लंघन, अन्न साठवणुकीतील त्रुटी आणि अन्न सुरक्षा नियमांचे पालन न झाल्याचे आढळले. 'सेफ फूड, सेफ महाराष्ट्र' मोहिमेंतर्गत सोलापूर, कोल्हापूर, नाशिक आणि अमरावती येथेही विशेष कारवाया करण्यात आल्या. सोलापूर जिल्ह्यातील एका कंपनीतून लेबलिंगमधील त्रुटी आणि निकृष्ट दर्जाच्या संशयावरून पॅकेज्ड पाणी व मँगो ज्यूसचा साठा जप्त करण्यात आला. कोल्हापूरमध्ये विनापरवाना विक्री करणाऱ्या हेल्थ केअर आस्थापनातून विविध आरोग्यपूरक पेयांच्या 134 बाटल्या जप्त करण्यात आल्या. नाशिकमध्ये मसाले, खोवा आधारित मिठाई आणि गुळाचा संशयित साठा ताब्यात घेण्यात आला, तर अमरावतीमध्ये लेबलिंग नियमांचे उल्लंघन करणारा नमकीनचा साठा जप्त करण्यात आला.

दरम्यान, नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित आणि प्रभावी निवारण करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित 'Food & Drug Grievance Portal' सुरू केले आहे. या पोर्टलवर अन्न भेसळ, असुरक्षित अन्नपदार्थ, बनावट किंवा निकृष्ट दर्जाची औषधे याबाबत मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत ऑनलाइन तसेच आवाजाद्वारे तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तक्रारींचा ऑनलाइन मागोवाही घेता येणार आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या या विशेष मोहिमेद्वारे राज्यातील अन्न सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू असून, नागरिकांनी अन्न भेसळ, प्रतिबंधित गुटखा-पानमसाला किंवा निकृष्ट अन्नपदार्थांची माहिती मिळाल्यास FoSCoS Portal, Food Safety Connect App, AI तक्रार पोर्टल किंवा टोल-फ्री क्रमांक 1800-222-365 वर त्वरित तक्रार नोंदवावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.


  • *महाराष्ट्र FDA - तुकाराम मुंढे यांच्या खात्याचे नंबर:*
  • *1. आयुक्त कार्यालय, मुंबई:*
  • - *फोन*: 022-26122652
  • - *पत्ता*: 4th Floor, Survey No. 341, Bandra Kurla Complex, Opposite RBI, Bandra (East), Mumbai 400051
  • - *ईमेल*: commfda-mahnicin 82b7[dot][at] 82b7
  • *2. अन्न-औषध भेसळीबाबत तक्रार करण्यासाठी टोल फ्री नंबर:*
  • - *1800 222 365* - हा तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेला 24 तास मोफत नंबर आहे
  • - *ईमेल (अन्न विभाग)*: jc-foodhq@gov.in
  • - *ईमेल (औषध विभाग)*: http://jchq.fda-mah@nic.in
  • - *दक्षता विभाग*: pavigilancefda@gmail.com
  • *कशासाठी तक्रार करू शकता:*
  • 1. भेसळयुक्त दूध, तेल, मसाले, मिठाई
  • 2. बनावट/कालबाह्य औषधे
  • 3. नकली कॉस्मेटिक उत्पादने
  • 4. अस्वच्छ हॉटेल/स्ट्रीट फूड
  • 5. चुकीचे लेबल, एक्सपायरी डेट बदलणे.
  • तुकाराम मुंढे यांनी मे 2026 मध्ये "Safe Food, Safe Drug, Safe Maharashtra" मोहीम सुरू केली आहे.
  • *टीप*: *टोल फ्री नंबर 1800 222 365 वर कॉल करून थेट तक्रार नोंदवू शकता. तुमचे नाव गुप्त ठेवले जाते.*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com