दूरदर्शी शिक्षणतज्ज्ञ, पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील यांनी वयाच्या 90 व्या वर्षी कोल्हापूर येथे अखेरचा श्वास घेतला. शेतकरी कुटुंबातून जन्माला आलेल्या डी. वाय पाटील यांनी राजकीय तसेच शिक्षण, आरोग्य आणि समाजकारण अशा विविध क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला. त्यांच्या जाण्याने राज्यात शोककळा पसरली आहे. कोरोना काळानंतर कोल्हापुरातील निवासस्थानी ते वास्तव्यास असत. मागील सहा महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावत चालली होती. राहत्या घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. अगदी 20 दिवसांपूर्वीच त्यांना हृदयविकाराचा झटका देखील आला होता. मात्र त्यातून ते सावरत होते. अशातच 3 ऑगस्ट रोजी दिवसभरात त्यांची प्रकृती खालावत गेली आणि 4 ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. 5 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता यशवंत निवास येथून त्यांची अंत्ययात्रा निघणार असून, सायंकाळी 5 वाजता डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज (लाईन बाजार, कसबा बावडा) च्या प्रांगणात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा डॉ. संजय डी. वाय. पाटील, माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, विजय पाटील, डॉ. अजिंक्य पाटील, मुलगी डॉ. नंदिता पालशेतकर आणि नातू ऋतुराज पाटील यांच्यासह मोठा आप्तपरिवार आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यपाल डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील उर्फ डॉ. डी. वाय. पाटील यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1935 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील अंबप या छोट्याशा गावात झाला होता. काँग्रेसमध्ये नेते असलेले डी.वाय. पाटील १९५७ ते १९६२ दरम्यान कोल्हापूर शहराचे महापौर होते. १९६७ व १९७२ साली ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघामधून विधानसभेवर निवडून आले होते.
१९७८ च्या निवडणुकीत डी. वाय. पाटील यांचा पराभव झाला. त्यानंतरच्या पुढच्या पराभवानंतर त्यांचा राजकारणातील रस कमी झाला. राजकीयदृष्ट्या ऐन उमेदीच्या काळात डी. वाय. पाटील यांनी वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी राजकारणाचा त्याग केला. मात्र, त्यांनी राजकारणाच्या परिघाबाहेर आपली नवी इनिंग सुरू केली. डॉ. डी. वाय. पाटील यांनी शैक्षणिक संस्था स्थापन करून मध्यमवर्गीय, बहुजन विद्यार्थ्यांसाठीची ज्ञानगंगा खुली केली.
ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे, हा ध्यास त्यांनी आयुष्यभर जपला. 1983 मध्ये नवी मुंबईत 'रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी'ची स्थापना केली. आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर, मुंबई आणि पुणे येथे 3 हून अधिक डीम्ड विद्यापीठ आणि 180 पेक्षा जास्त शिक्षण संस्था कार्यरत आहेत, जिथे लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. डॉ. डी. वाय पाटील यांची सार्वजनिक जीवनातील सुरुवात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून झाली. 1957 ते 1962 या काळात त्यांनी कोल्हापूरचे महापौर म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर 1967 आणि 1972 मध्ये ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा सन्मान म्हणून त्यांची त्रिपुरा आणि बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली, तसेच त्यांनी पश्चिम बंगालचा अतिरिक्त कार्यभारही समर्थपणे सांभाळला. 2018 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. शिक्षण आणि समाजसेवेतील अतुलनीय योगदानाबद्दल भारत सरकारने 1991 मध्ये त्यांना 'पद्मश्री' या पुरस्काराने सन्मानित केले होते. याशिवाय त्यांना विविध आंतरराष्ट्रीय विद्यापीठांकडून मानद डॉक्टरेट आणि शिवाजी विद्यापीठाकडून 'डी.लिट' पदवी प्रदान करण्यात आली होती.
डॉ. पाटील यांनी ज्ञानदेव या आपल्या नावाप्रमाणेच ज्ञानाची आराधना केली. शिक्षण क्षेत्रालाच आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. एका छोट्याशा शाळेपासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. सुमारे दोनशे संस्था, विविध प्रकारची आठ विद्यापीठे आणि हजारो विद्यार्थी, असा त्यांच्या कार्याचा विस्तार झाला. विशेषत: वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषधनिर्माण, आर्किटेक्चर अशा वैविध्यपूर्ण अभ्यासक्रमांची महाविद्यालये आणि आधुनिक सुविधांच्या उभारणीतून त्यांनी आपल्या शैक्षणिक समुहासोबतच महाराष्ट्राचा नावलौकिक उंचावला. महाविद्यालयांच्या माध्यमातून वैद्यकीय सोयी सुविधा आणि आरोग्य सेवेचे जाळे विस्तारले. त्यांनी अनेक भव्य दिव्य अशी शैक्षणिक संकुले, डॉ डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय स्टेडियमसारखे प्रकल्पही साकारले. डॉ. पाटील हे सहकार, शिक्षण, सांस्कृतिक – साहित्यिक आणि सामाजिक चळवळीचे आधारवड होते. त्यांनी आयुष्यभर शिक्षण, सेवा आणि विनम्रतेची मूल्ये जपली. 'अहंकार म्हणजे जीवनाचा मृत्यू; तर अहंकाराचा मृत्यू म्हणजेच खरे जीवन' हा त्यांचा विचार त्यांच्या संपूर्ण जीवनकार्याचे प्रतिबिंब होता. आज त्यांचे पार्थिव अस्तित्व आपल्यात नसले, तरी त्यांनी रुजवलेली शिक्षणसेवेची परंपरा, विनम्रतेचा आदर्श आणि समाजहिताची मूल्ये कायम प्रेरणादायी राहतील. त्यांच्या जाण्याने एका दूरदर्शी शिक्षणमहर्षीचा अंत झाला असला, तरी त्यांचे विचार आणि कार्य पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करत राहतील.- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
'डी. वाय. पाटील हे नाव नव्हते तर महाराष्ट्र राज्यातील शिक्षण व्यवस्थेला बळकटी देणारी संस्था होती. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक आणि शिक्षण क्षेत्राची हानी झाली आहे', काँग्रेस विचारसरणीचा निष्ठावंत शिलेदार म्हणून ते ओळखले जात. ते सुरुवातीला विधिमंडळात होते. पुढे शिक्षण क्षेत्रात त्यांनी भव्य संस्थात्मक कार्य केले. त्रिपुरा, बिहार सारख्या राज्यात राज्यपाल म्हणून काम पाहिले. शिवसेनाच्या कार्याबाबत त्यांना आस्था होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचा ऋणानुबंध होतेच. त्यामुळे ठाकरे परिवाराशी त्यांचा स्नेह अखेरपर्यंत राहिला. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने आपला सुपुत्र गमावला', - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
केवळ संस्था उभ्या न करता, 'Academic Excellence' आणि 'Holistic Education' या तत्त्वांवर आधारित शिक्षण देऊन त्यांनी देशातील उच्च शिक्षणाला एक नवी दिशा दिली. आज डी. वाय. पाटील विद्यापीठात अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन, फार्मसी, लॉ, आर्किटेक्चर अशा १६ हून अधिक विद्याशाखांमध्ये १४६ हून अधिक अभ्यासक्रम चालवले जातात. संपूर्ण देशात तब्बल ७ स्वतंत्र विद्यापीठे उभी करण्याचा अद्वितीय आणि ऐतिहासिक विक्रम त्यांच्याच नावावर आहे. कोल्हापूर, पुणे आणि नवी मुंबई या तिन्ही प्रमुख शहरांमध्ये त्यांनी उभारलेली रुग्णालये लाखो रुग्णांसाठी वरदान ठरली आहेत. तसेच नवी मुंबईत जगातील ६ व्या क्रमांकाचे अत्याधुनिक 'डी. वाय. पाटील स्टेडियम' उभारून त्यांनी क्रीडा विश्वात एक नवा वस्तुपाठ निर्माण केला. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक द्रष्टा नेता, महान शिक्षणमहर्षी आणि दिलदार मार्गदर्शक गमावला आहे. ईश्वर डॉ. डी. वाय. पाटील साहेबांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो व पाटील परिवाराला या दुःखातून सावरण्याची ताकद देवो, हीच प्रार्थना! डॉ. डी. वाय. पाटील साहेबांच्या पावन स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली! - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
0 टिप्पण्या