Top Post Ad

Hemant Samant जगातील सर्वांत तरुण प्राध्यापक : नॅथन थॉमस

ज्ञान, जिज्ञासा आणि सातत्यपूर्ण मेहनत यांच्या बळावर एखादी व्यक्ती वयाच्या चौकटी मोडून अभूतपूर्व यश मिळवू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिकेतील ‘फ्लोरिडा’ राज्यातील ‘नॅथन थॉमस’. अवघ्या अठरा वर्षे आणि ३४६ दिवसांच्या वयात महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळवून त्यांनी जगातील सर्वांत तरुण पुरुष प्राध्यापक होण्याचा मान मिळवला. हा केवळ वैयक्तिक विक्रम नसून शिक्षण क्षेत्रातील एक ऐतिहासिक घटना मानली जाते. प्राध्यापक होण्यासाठी अनेक वर्षांचा शैक्षणिक प्रवास, उच्च शिक्षण, संशोधन आणि अनुभव आवश्यक असतो, अशी सर्वसाधारण धारणा आहे. मात्र नॅथन यांनी असामान्य बुद्धिमत्ता, अभ्यासातील सातत्य आणि ज्ञानाची ओढ यांच्या बळावर ही धारणा बदलून दाखवली.

नॅथन यांचा जन्म अमेरिकेतील ‘फ्लोरिडा’ येथे झाला. लहानपणापासूनच त्यांची बौद्धिक क्षमता आणि शिकण्याची गती इतर मुलांपेक्षा वेगळी होती. त्यांचे कुटुंब अभियंत्यांचे असल्यामुळे विज्ञान, गणित आणि तंत्रज्ञान यांचे वातावरण त्यांना घरातूनच लाभले. ‘स्टेम’ (STEM) अर्थात ‘सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनियरिंग आणि मॅथेमॅटिक्स’ या क्षेत्रांबद्दल त्यांना बालपणापासूनच आकर्षण निर्माण झाले. विशेष म्हणजे गणिताची आवड निर्माण करण्याचे श्रेय ते आपल्या आईला देतात. कठीण गणिती संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगण्याची तिची पद्धत नॅथन यांच्या बौद्धिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली. त्यामुळे गणित हा केवळ अभ्यासाचा विषय न राहता त्यांच्या विचार प्रक्रियेचा अविभाज्य भाग बनला.

नॅथन यांनी दहाव्या वर्षी ‘मियामी डेड कॉलेज’मध्ये 'ड्युअल एनरोलमेंट' कार्यक्रमाद्वारा प्रवेश घेतला. या कार्यक्रमामुळे शालेय शिक्षणाबरोबरच महाविद्यालयीन अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी त्यांना मिळाली. इतक्या लहान वयात महाविद्यालयीन वातावरणात प्रवेश मिळणे हीच मोठी गोष्ट होती; परंतु नॅथन यांनी त्याचाही उत्तम उपयोग करून घेतला. अभ्यासातील प्रावीण्यामुळे त्यांनी प्राध्यापक आणि सह विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले.

नॅथन यांच्या प्रतिभेला योग्य व्यासपीठ मिळावे म्हणून त्यांच्या पालकांनी पारंपरिक शिक्षणाबरोबरच प्रगत शैक्षणिक संधींचा शोध घेतला. याच प्रयत्नांतून वयाच्या केवळ दहाव्या वर्षी त्यांनी ‘मियामी डेड कॉलेज’च्या 'ड्युअल एनरोलमेंट' कार्यक्रमात प्रवेश घेतला. एवढ्या लहान वयात महाविद्यालयीन विद्यार्थ्यां सोबत शिकण्याचा अनुभव त्यांच्यासाठी आव्हानात्मक असला, तरी त्यांनी आत्मविश्वासाने त्या वातावरणाशी जुळवून घेतले. हा अनुभवच पुढे त्यांच्या उच्च शिक्षणाचा आणि प्राध्यापक बनण्याच्या प्रवासाचा मजबूत पाया ठरला.

वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी तेथे प्रवेश घेतला. पुढील चार वर्षांत त्यांनी ‘इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग’ विषयातील पदवी आणि पदव्युत्तर पदवी सन्मानासह पूर्ण केली. एवढ्या कमी वयात दोन उच्च पदव्या संपादन करणे हे दुर्मिळ यश मानले जाते. 

ऑगस्ट २०२३ मध्ये नॅथन थॉमस यांची अमेरिकेतील ‘मियामी डेड कॉलेज’मध्ये ‘प्राध्यापक’ म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी 'COP 2270 : C for Engineers' हा संगणक प्रोग्रामिंगचा अभ्यासक्रम शिकवण्यास सुरुवात केली. या विषयामध्ये अभियंत्यांसाठी आवश्यक असलेली ‘सी’ प्रोग्रामिंग भाषा, संगणकीय तर्क शक्ती आणि प्रोग्रामिंगच्या मूलभूत संकल्पना शिकवल्या जातात. विशेष म्हणजे त्यावेळी त्यांच्या वर्गातील अनेक विद्यार्थी त्यांच्या वयाचेच किंवा त्यांच्यापेक्षा थोडे मोठे होते. त्यामुळे सुरुवातीला अनेकांना आश्चर्य वाटले; परंतु त्यांच्या सखोल ज्ञानामुळे, स्पष्ट अध्यापन शैलीमुळे आणि विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादामुळे त्यांनी अल्पावधीतच सर्वांचा विश्वास संपादन केला.

नॅथन यांच्या या ऐतिहासिक कामगिरीची नोंद ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये झाली. त्यांनी ३०६ वर्षांपासून अबाधित असलेला विक्रम मोडला. यापूर्वी हा विक्रम ‘स्कॉटलंड’चे प्रसिद्ध गणितज्ञ ‘कॉलिन मॅक्लॉरिन’ यांच्या नावावर होता. अठराव्या शतकाच्या सुरुवातीला ते वयाच्या एकोणिसाव्या वर्षी प्राध्यापक झाले होते. तीन शतकांहून अधिक काळ हा विक्रम कोणी मोडू शकले नव्हते. नॅथन यांनी अवघ्या अठरा वर्षे ३४६ दिवसांच्या वयात प्राध्यापक बनून हा इतिहास बदलला.

यापूर्वी २००८ मध्ये अमेरिकेतील ‘आलिया सबूर’ या जगातील सर्वांत तरुण महिला प्राध्यापक ठरल्या होत्या. त्यावेळी त्यांचे वय अठरा वर्षे ३६२ दिवस होते. नॅथन थॉमस हे त्यांच्यापेक्षाही सोळा दिवसांनी लहान वयात प्राध्यापक बनले. त्यामुळे त्यांनी केवळ पुरुषांमधीलच नव्हे तर सर्वांत कमी वयात प्राध्यापक बनलेल्या व्यक्तींमध्येही विशेष स्थान मिळवले.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सशी संवाद साधताना नॅथन यांनी आपल्या अध्यापन तत्त्वज्ञानाबद्दल अत्यंत महत्त्वाचे विचार मांडले. त्यांच्या मते, "एकदा तुम्ही शिक्षणाच्या वातावरणात प्रवेश केला की, प्रत्येक जण शिकण्यासाठीच आलेला असतो. तेथे वयाला कोणतेही महत्त्व नसते." ते पुढे म्हणतात की, “आपले संपूर्ण लक्ष विद्यार्थ्यांना सर्वोत्तम प्रकारे शिकवण्यावर आणि त्यांना शक्य त्या सर्व प्रकारे मदत करण्यावर असते. मेहनत घेण्याची तयारी असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य मार्गदर्शन मिळाले पाहिजे”, हीच त्यांची भूमिका आहे. त्यांच्या या विचारांतून शिक्षकाची खरी जबाबदारी आणि विद्यार्थीकेंद्रित अध्यापनाची भावना स्पष्टपणे दिसून येते.

नॅथन हे केवळ विषयाचे ज्ञान देणारे शिक्षक नाहीत, तर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारे मार्गदर्शकही आहेत. कॉम्प्युटिंग, प्रोग्रामिंग आणि अभियांत्रिकीतील अनेक कठीण संकल्पना ते सोप्या उदाहरणाद्वारा समजावून सांगतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषयाची भीती वाटत नाही, उलट त्यांच्यामध्ये समस्यांचे विश्लेषण करण्याची आणि नव्या कल्पना विकसित करण्याची क्षमता वाढते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापन अधिक परिणामकारक कसे करता येईल, याकडेही त्यांचा विशेष भर असतो.

त्यांच्या या असामान्य यशाचे कौतुक कॉलेजामधील सहकारी आणि वरिष्ठ अधिकार्‍यांनीही केले आहे. कॉलेजच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी अँड डिझाइनचे डीन ‘मॅनी पेरेझ’ यांनी नॅथन यांच्याविषयी बोलताना सांगितले की, "नॅथन आमच्या कर्मचारी वर्गाचा भाग असल्याचा मला अभिमान आहे. अशा व्यक्ती फार क्वचित भेटतात. ते केवळ उत्कृष्ट शिक्षक नाहीत, तर आमच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत." 

प्राध्यापक म्हणून कार्यरत असतानाही नॅथन यांनी स्वतःचे शिक्षण थांबवलेले नाही. सध्या ते ऑनलाइन अध्यापन करत असून त्याच बरोबर ‘युनिव्हर्सिटी ऑफ मियामी स्कूल ऑफ लॉ’ येथे 'ज्युरिस डॉक्टर' (Juris Doctor) या कायद्याच्या पदवीचे शिक्षण घेत आहेत. विज्ञान आणि अभियांत्रिकीच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवल्यानंतर त्यांनी कायद्याच्या अभ्यासाची निवड केली, यावरून त्यांची बहुआयामी बौद्धिक जिज्ञासा दिसून येते. विविध ज्ञान शाखांचा परस्परसंबंध समजून घेण्याची आणि व्यापक दृष्टी विकसित करण्याची त्यांची इच्छा त्यांच्या व्यक्तिमत्वाला अधिक समृद्ध बनवते. नॅथन थॉमस यांची जीवन कथा आजच्या तरुणांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. ज्ञानाला वयाची मर्यादा नसते आणि प्रतिभेला योग्य संधी मिळाल्यास ती जगभरात प्रेरणेचा दीप बनू शकते, हे नॅथन थॉमस यांनी आपल्या जीवनातून सिद्ध करून दाखवले आहे.

प्रा. हेमंत सुधाकर सामंत


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com