Top Post Ad

आजच्या भारतीय लोकशाहीसमोरचा बिकट प्रश्न...

 आजच्या भारतीय लोकशाहीसमोर एक बिकट प्रश्न आ वासून उभा राहिला आहे. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त 'ज्ञानेश कुमार' यांचे निर्लज्ज गैरप्रकार कितीही गंभीर असले, तरी ते केवळ एक मुखवटा आहेत. इतिहासात डोकावले तर दिसेल की, भारताच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना रायबरेली या केवळ एका संसदीय मतदारसंघात सरकारी यंत्रणेच्या किरकोळ वाटणाऱ्या गैरवापरामुळेही सत्ता गमवावी लागली होती...  तर दुसऱ्या बाजूला आज जेव्हा संपूर्ण देशातील मतदार याद्यांच्या पारदर्शकतेवर आणि विश्वासार्हतेवरच भलेमोठे कारस्थानी प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे, तेव्हा राजकीय व घटनात्मक जबाबदारीचा कोणता मापदंड लावायला हवा ? 

१२ जून १९७५ रोजी भारताच्या राजकीय आणि कायदेशीर इतिहासाला कलाटणी देणारा एक अभूतपूर्व निर्णय लागला. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जगमोहनलाल सिन्हा यांनी एक ऐतिहासिक निकाल देत तत्कालीन शक्तिशाली पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची १९७१ मधील रायबरेली मतदारसंघातील निवडणूक बेकायदेशीर आणि रद्दबातल ठरवली.  विशेष म्हणजे, इंदिरा गांधी यांनी ही निवडणूक तब्बल १,११,८१० मतांच्या प्रचंड फरकाने (एकूण मतदानाच्या जवळपास ६६% मते मिळवून) जिंकली होती आणि त्यांचे प्रतिस्पर्धी संयुक्त सोशलिस्ट पार्टीचे नेते राजनारायण यांचा दारुण पराभव झाला होता. परंतु, लोकशाहीत जनमताचा कौल कितीही मोठा असला, तरी तो कायद्याच्या चौकटीपेक्षा मोठा असू शकत नाही, हाच धडा या निकालाने घालून दिला. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात ऐतिहासिक विजय मिळवून बांगलादेशची निर्मिती केल्यानंतर इंदिरा गांधी लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर होत्या, अशा काळात आलेल्या या निकालाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. 

पंतप्रधान पदावरील एका एवढ्या बलाढ्य नेत्याला पदच्युत करणाऱ्या या खटल्यातील 'गुन्हा' किंवा आरोप काय होते ? राजनारायण यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने इंदिरा गांधी यांना लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या कलम १२३(७) अंतर्गत 'भ्रष्ट आचरणाचे' (Corrupt Practices) दोषी मानले. त्यांच्यावर अनेक आरोप होते, परंतु ज्या दोन मुख्य कारणांवरून त्यांना दोषी ठरवण्यात आले, ती आजच्या काळातील निवडणुकांचे स्वरूप पाहता अगदीच किरकोळ वाटू शकतात.  

पहिला गंभीर आक्षेप असा होता की, इंदिरा गांधी यांचे अतिरिक्त खाजगी सचिव यशपाल कपूर हे राजपत्रित सरकारी अधिकारी (Gazetted Officer) पदावर कार्यरत असताना, त्यांनी अधिकृत राजीनामा मंजूर होण्यापूर्वीच इंदिरा गांधी यांच्या निवडणूक प्रचाराचे काम पाहण्यास आणि जाहीर सभांचे नियोजन करण्यास सुरुवात केली होती. कायद्यानुसार कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याचा निवडणुकीतील असा सहभाग हा सत्तेचा गैरवापर मानला जातो.तर दुसरा आक्षेप हा थेट सरकारी यंत्रणेच्या आणि संसाधनांच्या गैरवापराशी संबंधित होता. न्यायालयाने असे स्पष्ट मानले की, रायबरेलीतील निवडणूक प्रचारसभांदरम्यान केवळ सुरक्षा व्यवस्थेपुरते मर्यादित न राहता, जिल्हा दंडाधिकारी आणि उत्तर प्रदेश सरकारच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इंदिरा गांधी यांच्या जाहीर सभांसाठी लाकडी व्यासपीठ (रोस्ट्रम) उभारण्यात मदत केली होती. एवढेच नव्हे तर, या सभांना वीजपुरवठा करणे, लाऊडस्पीकरची व्यवस्था करणे आणि त्यासाठी लागणारे चॅनेल्स व बॅरिकेड्स उभारणे यासाठी शासकीय अधिकारी आणि निधीचा वापर करण्यात आला होता. 

आजच्या राजकीय संस्कृतीत हे अत्यंत सामान्य वाटू शकत असले, तरी न्यायमूर्ती सिन्हा यांनी कायद्याचे काटेकोर पालन करत स्पष्ट केले की, कायदा सर्वांसाठी समान आहे मग ती देशाची सामान्य जनता असो वा पंतप्रधान. (या ऐतिहासिक कायदेशीर लढाईचे आणि त्या काळातील राजकीय घडामोडींचे अत्यंत वस्तुनिष्ठ आणि तटस्थ चित्रण ज्येष्ठ इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी त्यांच्या प्रसिद्ध अशा 'इंडिया आफ्टर गांधी' या पुस्तकात केले आहे.) या गुन्ह्याचा कायदेशीर परिणाम दूरगामी ठरला. या 'भ्रष्ट आचरणासाठी' दोषी ठरवून न्यायालयाने केवळ त्यांची निवडणूकच रद्द केली नाही, तर त्यांना पुढील सहा वर्षांसाठी कोणतीही निवडणूक लढवण्यास आणि लोकप्रतिनिधी होण्यासाठी अपात्र घोषित केले. विचार करा, सत्तेचा गैरवापर रोखण्यासाठी त्या काळात उत्तरदायित्वाचा आणि नैतिकतेचा हा किती उच्च मापदंड लावला गेला होता! 

ज्या पंतप्रधानांकडे संसदेत प्रचंड बहुमत होते, ज्यांना देशात अफाट जनसमर्थन होते, त्यांना केवळ एका मतदारसंघातील प्रशासकीय त्रुटी आणि सरकारी यंत्रणेच्या गैरवापरामुळे आपले पद सोडावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. याच ऐतिहासिक निकालाच्या पार्श्वभूमीवर पुढे देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली, विरोधी पक्षांनी इंदिराजींच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आणि अखेर २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी (Emergency) लागू करण्यात आली. हा इतिहास आजच्या काळातही निवडणूक प्रक्रियेची शुद्धता आणि लोकशाहीतील नैतिकतेची आठवण करून देणारा एक ज्वलंत दस्तऐवज आहे. दुसऱ्या बाजूला आजचा काळ आहे, जिथे देशातील संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणेची रचना आणि त्याचे कायदेशीर कवच पूर्णपणे बदलून टाकण्यात आले आहे. हे बदल वरवर प्रशासकीय वाटत असले, तरी त्यांनी भारताच्या घटनात्मक रचनेला आणि निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेला मुळापासून हादरवून सोडले आहे.

यातील पहिला महत्त्वाचा आणि अत्यंत वादग्रस्त बदल म्हणजे २०२३ मध्ये मोदी सरकारने निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीच्या पद्धतीत केलेला फेरबदल होय. मार्च २०२३ मध्ये, सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने ‘अनुप बरनवाल विरुद्ध भारत सरकार’ या ऐतिहासिक खटल्यात एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता. निवडणूक आयोगाची निष्पक्षता टिकवून ठेवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) आणि इतर निवडणूक आयुक्तांची (ECs) नियुक्ती करणाऱ्या समितीत पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि भारताचे सरन्यायाधीश (CJI) यांचा समावेश असावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. जोपर्यंत संसद यावर कायदा करत नाही, तोपर्यंत ही व्यवस्था लागू राहील असे न्यायालयाने म्हटले होते. संसदेला कायदा करण्याचा अधिकार होताच, त्यानुसार डिसेंबर २०२३ मध्ये केंद्र सरकारने ‘मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त कायदा, २०२३’ संमत केला. परंतु, या कायद्याद्वारे सरकारने समितीमधून थेट भारताच्या सरन्यायाधीशांनाच (CJI) बाहेर काढले आणि त्यांची जागा पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेल्या एका केंद्रीय कॅबिनेट मंत्र्याला दिली.

या रचनेमुळे निवड समितीमधील शक्तीचे संतुलन पूर्णपणे बिघडले आणि ते थेट सत्ताधाऱ्यांच्या बाजूने झुकले. या नवीन रचनेनुसार समितीत पंतप्रधान आणि त्यांनीच निवडलेले कॅबिनेट मंत्री (ज्यामध्ये गृहमंत्री अमित शाह यांची निवड करण्यात आली) हे दोन सदस्य झाले, तर विरोधी पक्षनेते (राहुल गांधी) हे तिसरे सदस्य ठरले. साहजिकच, कोणत्याही नियुक्तीचा निर्णय घेताना हे गणित २-१ असे सत्ताधारी पक्षाच्या बाजूने स्पष्ट झाले. लोकशाहीत निवडणूक आयोग ही एक पूर्णपणे तटस्थ आणि स्वायत्त संस्था असणे अपेक्षित आहे, जी कोणत्याही राजकीय दबावाशिवाय काम करेल. परंतु, जेव्हा या संस्थेच्या प्रमुखांची निवड करणारी समितीच संपूर्णपणे सरकारच्या नियंत्रणात जाते, तेव्हा निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविक आहे. या रचनेमुळे विरोधी पक्षाचा आवाज केवळ नामधारी ठरला आणि नियुक्तीचे सर्व अधिकार अप्रत्यक्षपणे एकाच राजकीय पक्षाच्या हातात केंद्रित झाले.

त्यानंतर या कायद्यात दुसरी एक अत्यंत विलक्षण गोष्ट जोडली गेली, ती म्हणजे या कायद्यातील 'कलम १६'. हे कलम निवडणूक आयुक्तांना एक असे कायदेशीर कवच प्रदान करते, ज्याची कल्पनाही यापूर्वी कधी केली गेली नव्हती. या कलमानुसार, कार्यरत किंवा माजी मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांविरुद्ध, त्यांनी त्यांच्या अधिकृत कर्तव्यादरम्यान केलेल्या कोणत्याही कृत्यासाठी, बोललेल्या शब्दांसाठी किंवा घेतलेल्या निर्णयांसाठी देशातील कोणत्याही न्यायालयात दिवाणी (Civil) किंवा फौजदारी (Criminal) कारवाई दाखल केली जाऊ शकत नाही किंवा ती सुरू ठेवली जाऊ शकत नाही. म्हणजेच, निवडणूक प्रक्रियेदरम्यान त्यांच्याकडून कितीही मोठी चूक किंवा बेकायदेशीर कृत्य झाले, तरी त्यांना न्यायालयात उत्तरदायी धरण्यावरच कायदेशीर बंदी घालण्यात आली आहे.

हा कायदेशीर संरक्षणाचा अतिरेक एका स्वतंत्र लोकशाही देशात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करतो. तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की, लोकशाहीचे रक्षण करण्याची आणि देशात मुक्त व न्याय्य निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी असलेल्या एका घटनात्मक संस्थेला जनतेपासून आणि न्यायव्यवस्थेपासून इतक्या व्यापक संरक्षणाची गरज का पडते?   भारतीय संविधानात असे पद सोडल्यानंतरही लागू राहणारे सरसकट कायदेशीर संरक्षण केवळ राष्ट्रपतींसारख्या सर्वोच्च घटनात्मक पदांनाच दिलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनाही त्यांच्या निवृत्तीनंतर अशा प्रकारचे अमर्याद कवच नसते. मग निवडणूक आयुक्तांना कायद्याच्या आणि न्यायालयाच्या कक्षेबाहेर ठेवण्याचा हा खटाटोप कशासाठी? संविधानाच्या अनुच्छेद ३२४ (Article 324) नुसार निवडणूक आयोग स्वतंत्र असणे आवश्यक आहे, पण 'स्वायत्तता' म्हणजे 'बेजबाबदारी' (Lack of Accountability) नव्हे.  

नुकतेच ‘इंडियन एक्सप्रेस’ने केलेल्या तपासातून समोर आलेल्या बाबी अत्यंत गंभीर आहेत. त्यांच्या वृत्तानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी तब्बल दहा महिन्यांच्या कालावधीत मतदार याद्यांशी संबंधित निर्णय आणि प्रक्रियांवर किमान १४ वेळा लेखी आक्षेप नोंदवले होते. हे काही किरकोळ मतभेद नव्हते. मतदार याद्यांशी संबंधित महत्त्वाच्या निर्णयांबाबतच त्यांना गंभीर आक्षेप होते आणि या प्रक्रियेत आपल्याला अंधारात ठेवले जात असल्याची तक्रार त्यांनी केली होती. याहूनही गंभीर बाब म्हणजे, नवीन मतदारांशी संबंधित काही कार्यवाहीला त्यांनी 'अनधिकृत' आणि 'बेकायदेशीर' असे संबोधले होते. म्हणजेच, प्रश्न केवळ प्रशासकीय पद्धती किंवा अंतर्गत मतभेदांचा नव्हता; निवडणूक प्रक्रियेतील निर्णय कायदेशीर चौकटीत आणि योग्य पद्धतीने घेतले जात आहेत का, याबाबतच गंभीर शंका उपस्थित करण्यात आली होती.

दिल्लीत मतदार डेटाबेसच्या वापराचे केंद्रीकरण करण्याबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली होती. मतदारांची माहिती, तिचे व्यवस्थापन आणि तिचा वापर हा निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेचा अत्यंत संवेदनशील भाग आहे. अशा परिस्थितीत डेटाबेसच्या वापराचे केंद्रीकरण होत असेल आणि त्याबाबतच निवडणूक आयुक्तांकडून आक्षेप नोंदवले जात असतील, तर त्याकडे केवळ ‘संस्थात्मक मतभेद’ म्हणून दुर्लक्ष करता येईल का? आणि प्रश्न केवळ मतदार याद्यांपुरता मर्यादित नव्हता. निवडणूक सॉफ्टवेअरच्या विश्वासार्हतेबद्दलची चिंता इतकी गंभीर झाली होती की, निवडणूक आयुक्तांनी थेट कॅबिनेट सचिवांकडे धाव घेतली. निवडणूक व्यवस्थेचा मोठा भाग आता डिजिटल प्रणाली, डेटाबेस आणि सॉफ्टवेअरवर अवलंबून असताना, त्या प्रणालींच्या विश्वासार्हतेबद्दल स्वतः निवडणूक आयुक्तच प्रश्न उपस्थित करत असतील, तर त्याची स्वतंत्र आणि सखोल तपासणी होणे ही किमान अपेक्षा नाही का?

दरम्यान, विशेष सखोल पुनरावलोकन प्रक्रियेमुळे ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील मसुदा मतदार याद्यांमधून १३ कोटींहून अधिक नावे वगळण्यात आली आहेत. एवढ्या प्रचंड संख्येने नावे मतदार याद्यांमधून वगळली जात असतील, तर प्रत्येक नावामागची प्रक्रिया पारदर्शक, तपासता येण्याजोगी आणि कायदेशीर होती का, हा प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित होतो. कोणाचे नाव का वगळले गेले? कोणत्या निकषांवर वगळले गेले? त्याची पडताळणी कोणी केली? आणि ज्या व्यक्तीचे नाव चुकीने वगळले गेले असेल, त्याला ते पुन्हा समाविष्ट करून घेण्याची पुरेशी संधी मिळाली का? या सर्व प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग या उघड झालेल्या बाबींचे गांभीर्य नाकारत आहे. आयोगाचे म्हणणे असे आहे की, संस्थात्मक निर्णयप्रक्रियेत भिन्न मते असणे हा स्वाभाविक भाग आहे आणि अंतिम निर्णय एकमताने घेण्यात आले होते.

ठीक आहे. समजूया तसं. पण जर अंतिम निर्णय खरोखरच एकमताने घेण्यात आले असतील, तर मग या संपूर्ण प्रक्रियेबाबत इतके प्रश्न का निर्माण झाले? लेखी आक्षेप नेमके कशाबद्दल होते? त्या आक्षेपांचे काय झाले? त्यावर कोणती चर्चा झाली? कोणते निर्णय बदलले गेले? कोणते आक्षेप फेटाळले गेले? आणि अंतिम निर्णयापर्यंत पोहोचताना कोणत्या प्रक्रियेचे पालन करण्यात आले? याचे उत्तर देण्याचा सर्वात सोपा आणि पारदर्शक मार्ग म्हणजे —  सर्व गोष्टींची सखोल आणि स्वतंत्र चौकशी करा. सर्व नोंदी सार्वजनिक करा. सॉफ्टवेअरमधील प्रत्येक बदलाची नोंद तपासा. तो बदल कोणी केला, का केला आणि त्याला कोणी मंजुरी दिली, हे स्पष्ट करा.  फॉर्म ६ मधील प्रत्येक फेरफाराचा मागोवा घ्या. कोणाचे नाव कधी जोडले गेले, कोणाचे नाव कधी वगळले गेले आणि कोणते नाव पुन्हा समाविष्ट करण्यात आले, याची संपूर्ण नोंद सार्वजनिक करा.  प्रत्येक निर्णयामागे कोणता अधिकारी किंवा कोणती यंत्रणा जबाबदार होती, हे स्पष्ट झाले पाहिजे. एखाद्या प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन झाले असेल, तर ते नेमके कुठे आणि कोणाच्या निर्देशाने झाले, हे समोर आले पाहिजे. आणि जर कायद्याचे उल्लंघन झाले नसेल, तर तशी खात्री करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व दस्तऐवज आणि नोंदी सार्वजनिक करण्यात आयोगाला नेमकी अडचण काय आहे?

सर्वात महत्त्वाचा प्रश्न मात्र हा आहे की, या संपूर्ण प्रक्रियेचा राजकीय लाभ कोणाला झाला? कारण मतदार यादी ही केवळ प्रशासकीय कागदपत्रांची यादी नाही. ती लोकशाहीतील नागरिकाच्या सर्वात मूलभूत अधिकाराशी मतदानाच्या अधिकाराशी थेट जोडलेली आहे. एखाद्या पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीतून गायब झाले, तर तो नागरिक केवळ एका यादीतून गायब होत नाही; त्याचा मतदानाचा घटनात्मक अधिकारच प्रत्यक्षात निष्प्रभ होतो. म्हणूनच या प्रकरणाकडे केवळ निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेद म्हणून पाहणे पुरेसे नाही. प्रश्न हा आहे की, या प्रक्रियेत कायदेशीर नियमांचे पालन झाले का? निर्णय पारदर्शकपणे घेतले गेले का? मतदारांच्या अधिकारांचे संरक्षण झाले का? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, जर या प्रक्रियेत अनियमितता किंवा फेरफार झाला असेल, तर त्याचा फायदा कोणाला झाला?

या सर्व कळीच्या प्रश्नांचे उत्तर एका स्वतंत्र, निष्पक्ष आणि सखोल चौकशीद्वारे स्पष्ट झाले पाहिजे. कारण हा प्रश्न आता केवळ काही निवडणूक आयुक्तांच्या मतभेदांचा राहिलेला नाही. हा प्रश्न भारताच्या निवडणूक प्रक्रियेवरील जनतेच्या विश्वासाचा आहे. आणि लोकशाहीमध्ये मतदारांच्या विश्वासापेक्षा मोठी कोणतीही निवडणूक प्रक्रिया असू शकत नाही. केवळ ज्ञानेश कुमार यांच्यापुरता मर्यादित प्रश्न राहिलेला नाही, हा घटनात्मक प्रश्न आता खूप मोठा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवडत्या आणि आक्रमक घोषणेच्या शैलीत बोलायचे झाल्यास, १९७५ मधील इंदिरा गांधींचे ते ऐतिहासिक प्रकरण केवळ रायबरेलीपुरतेच मर्यादित होते. तिथे प्रश्न फक्त एका उमेदवाराचा, एका मतदारसंघाचा आणि एका विशिष्ट निवडणुकीचा होता. परंतु, आज २०२६ मध्ये भारतासमोर उभा असलेला प्रश्न हा कोणत्याही एका व्यक्तीचा किंवा मतदारसंघाचा नाही, तर तो देशातील प्रत्येक नागरिकाच्या मतदानाच्या पवित्र अधिकाराचे नियमन करणाऱ्या संपूर्ण यंत्रणेशी संबंधित आहे. हा प्रश्न ५४३ लोकसभा मतदारसंघांचा आणि १४० कोटींहून अधिक भारतीयांच्या लोकशाहीच्या अस्तित्वाचा आहे. लोकशाहीमध्ये जोपर्यंत एखादा गुन्हा न्यायालयात अंतिम स्वरूपात सिद्ध होत नाही, तोपर्यंत नागरिकांनी प्रश्न विचारणेच थांबवावे, अशी राजकीय उत्तरदायित्वाची व्याख्या कधीच नव्हती आणि असूही शकत नाही. जनतेचा आवाज आणि त्यांचे प्रश्न हीच लोकशाही जिवंत ठेवण्याची मुख्य ताकद असते.

या पार्श्वभूमीवर, आज प्रत्येक जागरूक नागरिकाने थांबून काही मूलभूत प्रश्नांचा गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे. निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीची ती निष्पक्ष यंत्रणा नेमकी कोणी बदलली? निवडणूक अधिकाऱ्यांना न्यायालयात खेचण्यापासून रोखणारे हे अवाजवी आणि अभूतपूर्व कायदेशीर संरक्षण कोणी तयार केले? आणि या नवीन यंत्रणेचा वापर करून स्वतःच्या सोयीनुसार मुख्य निवडणूक आयुक्तांची (CEC) नियुक्ती कोणाद्वारे केली गेली? सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा प्रश्न हा आहे की, जर देशातील लाखो वैध मतदारांची नावे मतदार यादीतून अचानक गायब होत असतील, तर या पद्धतशीर फेरफाराचा थेट राजकीय फायदा कोणाला होत आहे? नवीन मतदारांच्या नोंदणीशी संबंधित असलेल्या 'फॉर्म-६' च्या अत्यंत गंभीर बाबतीत थेट सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल करण्याचा किंवा खोटे सांगण्याचा धक्कादायक प्रकार का घडला? 'जनरेशन झेड' म्हणजेच देशातील तरुण आणि नवीन मतदारांना मतदानाच्या प्रक्रियेपासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्याचा किंवा त्यांना वगळण्याचा हा एखादा छुपा प्रयत्न होता का? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्जल भुयान यांनी निवडणूक आयोगाच्या एकूणच भूमिकेवर आणि कार्यपद्धतीवर जे गंभीर आरोप केले आहेत, त्याकडे मोदी सरकार आणि संपूर्ण भारत देश एका साध्या प्रशासकीय त्रुटीसारखे पाहून दुर्लक्ष करू शकतो का?

 आजच्या 'प्राइम-टाइम'साठी आणि देशाच्या भवितव्यासाठी सर्वात महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर कुठला आहे ? जर रायबरेलीमध्ये सरकारी अधिकाऱ्यांनी केवळ निवडणूक सभेसाठी लाकडी व्यासपीठ उभारण्यात आणि वीजपुरवठ्याची व्यवस्था करण्यात मदत केल्यामुळे एका बलाढ्य पंतप्रधानांना आपली खासदारकी आणि देशाचे सर्वोच्च पद गमवावे लागू शकत असेल... तर मग अशा वेळी देशात काय व्हायला हवे, जेव्हा एका निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशीतून हे स्पष्टपणे सिद्ध होईल की, सत्तेत असलेल्या पक्षाला थेट राजकीय फायदा पोहोचवण्यासाठी देशाच्या संपूर्ण निवडणूक यंत्रणेत आणि सॉफ्टवेअरमध्येच फेरफार केले गेले होते? अशा एका महाघोटाळ्याचे उत्तर केवळ एखाद्या निवडणूक आयुक्ताचा राजीनामा देणे हे अजिबात असू शकत नाही. कारण, केवळ वरून हलणारी कळसूत्री बाहुली स्वतःहून कधीच संपूर्ण खेळ किंवा शो घडवून आणू शकत नसते; त्यामागे नेहमीच पडद्यामागचे सूत्रधार असतात.

जर निवडणुकीच्या पवित्र प्रक्रियेत आणि मतदार याद्यांमध्ये अशा प्रकारे फेरफार केल्याचे सिद्ध झाले, तर त्याची अंतिम जबाबदारी निश्चितपणे त्या फेरफारांचा थेट राजकीय लाभ घेणाऱ्या मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचलीच पाहिजे. हेच लोकशाहीतील न्याय आणि नैतिकतेचे सर्वात मोठे लक्षण ठरेल. १९७५ मध्ये देशासमोरील मुख्य प्रश्न अतिशय मर्यादित होता: रायबरेलीची एक वैयक्तिक निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधानांनी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला होता का? परंतु, आज २०२६ मध्ये हा प्रश्न त्याहून कितीतरी पट अधिक व्यापक, खोल आणि गंभीर बनला आहे: या खंडप्राय भारतात नेमके कोणाला मतदान करता येईल आणि कोणाचा मतदानाचा अधिकार हिरावून घ्यायचा, हे पडद्यामागून ठरवण्यासाठी संपूर्ण सरकारी यंत्रणेचा आणि तंत्रज्ञानाचा गैरवापर केला गेला आहे का? जर याचे उत्तर 'हो' असे असेल, तर सत्तेतून पायउतार होणे किंवा राजीनामा सादर करणे ही काही औदार्याची, नैतिकतेची किंवा जनतेवर उपकाराची कृती ठरणार नाही. ती भारताच्या संविधानाने घालून दिलेल्या घटनात्मक जबाबदारीची केवळ एक किमान  प्राथमिक किंमत असेल.  आणि खरं तर, दररोज ज्या प्रकारे निवडणूक यंत्रणेतील अनेक गंभीर गैरप्रकारांचे धडधडीत पुरावे देशासमोर येत आहेत, ते पाहता तुम्हाला या सत्याप्रत पोहोचण्यासाठी खरोखरच आणखी एखाद्या वेगळ्या चौकशीची गरज उरते का? 

- संजय झा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com