शिक्षणव्यवस्थेतील गैरप्रकारांविरोधात कॉक्रोच जनता पार्टीने काही महिन्यापूर्वीच जंतर-मंतर दणाणून सोडले. युवा वर्गाच्या आंदोलनापुढे अखेर सरकारला नमते घ्यावे लागले. मात्र हा पराभव सत्ताधाऱ्यांच्या प्रचंड जिव्हारी लागला. त्यामुळे याचा वचपा कसा काढायचा या विचारात असतानाच देशात एसआयआर विरोधात रान उठले. एकूणच सर्व संघटना आक्रमक झाल्या. त्यात पुन्हा युवा वर्गाने पुढाकार घेऊन आंदोलनाला सुरुवात केली. मागील 10-12 दिवसांपासून आंदोलन सुरू होते. सीजेपीने 10 ऑक्टोबरला आंदोलन होणार असे जाहीर केले. आणि सरकारने मग हे आंदोलन मोडीत काढण्याचे सर्व डावपेच आखले. मागील आंदोलनात केलेला अमानूष प्रकार अजून लोक विसरले नाहीत तोच त्यापेक्षाही भयंकर प्रकाराची रचना यावेळी करण्यात आली.
मुळात आंदोलकांना जंतर-मंतरवर पोहोचूनच द्यायचे नाही, म्हणून सर्व यंत्रणा कामाला लागली. थेट दिल्लीकडे येणाऱ्या रेल्वे गाड्याच रद्द करण्यात आल्या तर काही दुसरीकडे वळवण्यात आल्या. आंदोलकांची जिथे मिळेल तिथे धरपकड करण्यात आली. देशातील वकीलांनीही या आंदोलनात उडी घेतली. त्यांनाही अटक करण्यात आली. नॉन-रजिस्टर संस्थेचे कार्यकर्त्यांनी हैदोस घातला. तरीही जंतर-मंतर ओसंडून वाहू लागले. नंतर 12 ऑक्टोबरला काँग्रेसने आंदोलन केले. याही आंदोलनाने गर्दीचा उच्चांक गाठला. यामुळे सत्ताधाऱ्यांची झोप उडाली. अखेर त्यांनी थेट जंतर-मंतरवर आंदोलनालाच बंदी घातली. आंदोलनावर बंदी घालू शकत नसल्याने आंदोलनाच्या ठिकाणावरच कायमची बंदी घालण्यात आली. 'जंतर-मंतर'हे आंदोलन करण्याचे स्थळ म्हणून असलेली मान्यता रद्द करण्यात आली आणि यापुढे जंतर-मंतर हे आंदोलनाचे ठिकाण नाही असे जाहीर करण्यात आले.
सुमारे 1990च्या काळापासून जंतर-मंतर मैदान हे आंदोलनांचे केंद्र बनले. या मैदानावर वेगळ्या पहाडी राज्याच्या मागणीसाठी तरुण आणि बुद्धिजीवींनी दीर्घ संघर्ष केला. त्यानंतर 2000मध्ये उत्तराखंड राज्याची निर्मिती झाली. इ.सन 2006 मध्ये जेसिका लाल खटल्यात न्याय आणि व्हीआयपी संस्कृतीच्या विरोधात आंदोलन करण्यात आलें होते. त्यामुळं खटल्यातील दोषींना शिक्षा झाली. इ.सन 2011च्या अण्णा हजारे आंदोलनाने लोकपाल कायदा निर्माण झाला इतकेच नव्हे तर सत्ता समिकरणेही बदलली. त्यानंतर 2012 मध्ये दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर न्याय, कायद्यात बदल आणि महिला सुरक्षा यांसाठी मोठ्या प्रमाणात लोक एकत्र आले. यामुळे गुन्हेविषयक कायद्यांत सुधारणा झाल्या.निवृत्त लष्करी जवानांनी समान रैंक आणि सेवाकालासाठी समान पेन्शनची मागणीकरीता 2015ंला धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर दुष्काळ मदत, कर्ज माफी आणि कावेरी व्यवस्थापन मंडळासाठी 2017 मध्ये तमिळनाडू शेतकरी आंदोलन झाले. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात 2019 मध्ये दीर्घकालीन मोठं आंदोलन पार पडलं होतं. तीन कृषी कायद्यांच्या विरोधातील आंदोलनाचा भाग म्हणून 2021मध्ये इथं समांतर किसान संसद आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर सरकारला हे कृषी कायदे मागे घ्यावे लागले होते. इ.सन.2023 विनेश फोगट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांसारख्या ऑलिंपिक पदकविजेत्यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन प्रमुख बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध महिला पैलवानांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांवरून दीर्घकाळ धरणं आंदोलन केले. अशा मोठमोठ्या आंदोलनाची पार्श्वभूमी लाभलेल्या या जंतर-मंतर मैदानातून आता आंदोलनकर्त्यांना छू-मंतर करण्याचा डाव सरकारने रचला आहे.
काही काळापूर्वी मुंबईत मंत्रालयावर मोर्चे आयोजित करण्यात यायचे जे काळा-घोडा इथे अडवले जायचे, नंतर ते सम्राट हॉटेलजवळ अडवले जाऊ लागले. हळू हळू सरकारने या मोर्चांना मंत्रालयापासून दूर आझाद मैदानातच कैद करून टाकले. गेली कित्येक वर्षे आझाद मैदानात आंदोलक येतात. बेंबीच्या देठापासून ओरडतात, पण त्यांची हाक मंत्रालयातील मंत्री सोडा त्यांच्या सचिवापर्यंत देखील पोहोचत नाही. केवळ पोलिसांच्या गाडीतून मंत्रालयात जायचं, चर्चा करायची. आश्वासनाची गाजरं घेऊन परत आझाद मैदानात बोंबलायचं. कारण कालांतराने आश्वासन हवेत विरून जाते. पुन्हा आंदोलन सुरू. हे देखील बंद व्हावं म्हणून सत्ताधाऱ्यांनी आझाद मैदानातून पाच वाजल्यानंतर आंदोलकाना बाहेर काढण्याचे फर्मान काढले. अशा तऱ्हेने सत्ताधाऱ्यांनी जनसामान्यांच्या आंदोलनाची हवाच काढून टाकली आहे. आंदोलन आणि आंदोलकांना बेदखल करून टाकले आहे.
असाच काहीसा प्रकार आता दिल्लीतही होणार आहे. दिल्ली पोलीस आयुक्त अनुराग कुमार यांनी हे ठिकाण बदलण्यात यावं अशी सूचना गृहमंत्रालयाकडं केली होती. त्यानुसार आंदोलनं किंवा निदर्शने करण्यासाठीच्या जंतर-मंतर ऐवजी पर्यायी आणि योग्य स्थळांची तपासणी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या शिफारशींच्या आधारे जंतर-मंतरऐवजी आता आंदोलन किंवा निदर्शनं आयोजित करण्यासाठी 'रामलीला मैदान', 'बुराडी मैदान' आणि 'सीबीडी मैदान' (पूर्व दिल्ली) या तीन नवीन स्थळांची निवड करण्यात आली आहे. ही तिन्ही ठिकाण सत्ताकेंद्रापासून दूर असल्याने सत्ताधाऱ्यांना याचा त्रास होणार नाही. जंतर-मंतरवरील आंदोलनावर घालण्यात आलेली बंदी विरोधात सुप्रीम कोर्टाने आंदोलन करण्याच्या अधिकाराचा आदर राखत सामान्य जनतेला त्रास होणार नाही अशा पद्धतीने व्यवस्थापन करण्याचे निर्देश दिले खरे, परंतु कायदा-सुव्यवस्थेच्या नावाखाली लोकशाही अधिकारांवर बंधने लादण्याचा हा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे.
"जब सड़कें सूनी हो जाती हैं, तो संसद आवारा हो जाती है", असे मत व्यक्त करणाऱ्या डॉ राममोहन लोहिया यांचा असा विश्वास होता की, लोकशाही ही केवळ निवडणुकांमध्ये मतदान करण्यापुरती मर्यादित नाही. जर जनता आणि विरोधी पक्षांनी सरकारच्या चुकीच्या निर्णयांविरोधात रस्त्यावर उतरून निषेध केला नाही, तर सत्तेत असलेले लोक हुकूमशाही प्रवृत्तीचे बनू शकतात. ज्याची प्रचिती मागील काही वर्षापासून पदोपदी येत आहे. त्याविरोधात उठणारा रस्त्यावरील आवाजच बंद करण्याचे षडयंत्र सत्ताधारी करीत आहेत. तेव्हा आता जतंर-मंतरवर एवढा आवाज वाढायला हवा की हे मदमस्त सत्ताधारीच छू-मंतर होतील.

0 टिप्पण्या