जातीव्यवस्थेच्या उच्चाटनासाठी संघर्षाची नवी दिशा! जातीअंत संघर्ष समितीचे तिसरे मुंबई जिल्हा अधिवेशन उत्साहात संपन्न झाले. यावेळी 35 सदस्यीय कमिटीची स्थापना करण्यात आली तसेच 100 प्रतिनिधींच्या सहभागातून जातीअंताच्या लढ्याला बळ देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. घाटकोपर, जातीय विषमता, सामाजिक अन्याय आणि शोषणाविरोधातील लढा अधिक व्यापक व संघटित करण्याचा निर्धार व्यक्त करत जातीअंत संघर्ष समिती, मुंबई जिल्हा यांचे तिसरे जिल्हा अधिवेशन रविवारी माता रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर (पूर्व) येथील गंधकुटी विहार येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या अधिवेशनाला सुमारे शेकडो प्रतिनिधी उपस्थित होते.
अधिवेशनाची सुरुवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून करण्यात आली. कॉम्रेड हेमकांत सामंत, कॉम्रेड रेगे आणि कॉम्रेड सुगंधी फ्रान्सिस यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर कॉम्रेड बर्वे आणि कॉम्रेड अनिकेत यांनी सादर केलेल्या क्रांतिकारी गीतांनी सभागृहात उत्साह आणि संघर्षाची ऊर्जा निर्माण केली. अधिवेशनाचे उद्घाटन मुंबई जिल्हा सचिव कॉम्रेड शैलेंद्र कांबळे यांनी केले. त्यानंतर कॉम्रेड सुबोध मोरे यांनी मागील तीन वर्षांचा संघटनात्मक कार्याचा अहवाल सादर केला. या अहवालावर झालेल्या चर्चेत विविध विभागांतील प्रतिनिधींनी सक्रिय सहभाग घेतला. प्रतिनिधींनी संघटनेच्या कामाचा आढावा घेत आपली मते मांडली.
अधिवेशनातील चर्चेमुळे संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी सामूहिक विचारविनिमयाची संधी उपलब्ध झाली. संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे आणि जातीअंताच्या चळवळीचा विस्तार करणे या दृष्टीने अधिवेशनाला महत्त्व प्राप्त झाले. संघटनेचे काम अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी अधिवेशनात 35 सदस्यीय कमिटीची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून आगामी काळातील संघटनात्मक कार्याला अधिक गती देण्याच्या दिशेने पाऊल टाकण्यात आले. अधिवेशनाचा समारोप कॉम्रेड एस. के. रेगे यांच्या भाषणाने झाला. त्यांच्या समारोपाच्या भाषणानंतर क्रांतिकारी घोषणा देत अधिवेशनाची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता करण्यात आली. जातीव्यवस्थेचे उच्चाटन, सामाजिक समता आणि शोषणमुक्त समाजाची निर्मिती हे उद्दिष्ट समोर ठेवून जातीअंताचा लढा अधिक व्यापक, संघटित आणि प्रभावी करण्याचा संदेश या अधिवेशनातून देण्यात आला.
0 टिप्पण्या