Top Post Ad

आर. के. लक्ष्मणः एक अनकॉमन मॅन RKLaxman

आर. के. लक्ष्मण यांचा जन्म ऑक्टोबर १९२१ मधला. दुसरे महायुद्ध सप्टेंबर १९३९ मध्ये सुरू झाले, तेव्हा लक्ष्मण यांचे वय होते अवघे १७-१८ वर्षे. त्या काळात दररोजच्या वृत्तपत्रांमध्ये एकच विषय गाजत होता आणि तो म्हणजे जर्मनीचा हुकूमशहा हिटलर. १९३९ ते १९४५ या काळात महायुद्ध पेटत राहिले. जग हादरत राहिले. त्या काळात भारतातील ब्रिटिश सत्ताही हादरली होती. लक्ष्मण त्या काळात 'दि हिंदू' हे दैनिक नियमितपणे वाचत असत. ‘दि हिंदू’ मध्ये सर डेव्हिड लो यांची व्यंगचित्रे नियमितपणे प्रसिद्ध होत. या व्यंगचित्रांचा आणि डेव्हिड लो यांच्या शैलीचा त्या किशोरवयीन लक्ष्मण यांच्यावर मोठा प्रभाव पडला.बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म जानेवारी १९२६ मध्ये झाला. दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा ते अवघे १३ वर्षांचे होते. या मुलावरदेखील १९३९ ते १९४५ या काळात सर डेव्हिड लो यांच्या व्यंगचित्र शैलीचा प्रचंड प्रभाव पडला. कारण त्या काळात भारतीय वृत्तपत्रांमध्ये डेव्हिड लो यांची व्यंगचित्रे नियमितपणे प्रसिद्ध होत होती.

सर डेव्हिड लो यांची व्यंगचित्रे हिटलरला इतकी झोंबत असत की हिटलरने आपल्या गुप्तहेर यंत्रणेला आदेश दिला होता, की – "डेव्हिड लो याला ‘जिंदा या मुर्दा’ पकडून जर्मनीत आणा." हिटलर जर डेव्हिड लो यांच्यावर इतकी आगपाखड करत होता, तर त्यांची व्यंगचित्रे किती परिणामकारक असतील याची कल्पना आपण करू शकतो. पुढील काळात बाळासाहेब ठाकरे आणि आर. के. लक्ष्मण यांनी व्यंगचित्रकलेविषयी अनेक मुलाखती दिल्या. त्या वेळी त्यांनी “सर डेव्हिड लो यांचा आमच्यावर प्रचंड प्रभाव होता”, ही गोष्ट आवर्जून सांगितली. हे दोघेही डेव्हिड लो यांच्या प्रभावाखाली असल्याने, दोघांच्याही व्यंगचित्रशैलीत आपल्याला  लो यांच्या शैलीचा भास होतो. बाळासाहेब ठाकरे आणि लक्ष्मण १९४७ ते १९५१ ही चार वर्षे ‘फ्री प्रेस जर्नल’ मध्ये एकत्र काम करत होते. तेव्हा दुसरे महायुद्ध संपले होते. हिटलरचा अंत झाला होता. पण त्या नंतरही डेव्हिड लो यांची व्यंगचित्रे जगभर गाजत होती. स्वाभाविकच, त्यासंबंधी हे दोघेही व्यंगचित्रकार एकमेकांशी चर्चा करत असणार.

१९५१ मध्ये लक्ष्मण ‘टाईम्स ऑफ इंडिया‘ मध्ये रुजू झाले आणि अल्पावधीतच त्यांच्या व्यंगचित्रांनी ‘टाईम्स’ च्या पहिल्या पानावर स्थान मिळवले. त्या व्यंगचित्रांची कीर्ती जगभर पसरली तशी सर डेव्हिड लो यांच्यापर्यंतही पोहोचली. डेव्हिड लो यांनाही आर. के. लक्ष्मण या भारतीय व्यंगचित्रकाराचे कौतुक वाटले आणि पुढे इतिहास घडला. नशीब कसं असतं, पहा! लक्ष्मण मुंबईत आले आणि नोकरीच्या शोधात रस्त्यावरून चालत असताना नियतीने त्यांना ‘फ्री प्रेस जर्नल’ च्या कार्यालयात नेले. तिथे उभ्या उभ्या सहज नोकरी मिळाली. १९५१ मध्ये तिथून अलगद बाहेर काढून नियतीने त्यांना ‘टाईम्स ऑफ इंडिया’ मध्ये नेले. तिथेही विनासायास नोकरी मिळाली. अजून वर्षही पूर्ण झाले नव्हते आणि एक दिवस सकाळी साडेआठच्या सुमारास साक्षात सर डेव्हिड लो स्वतः मुंबईत ‘टाईम्स ऑफ इंडिया’ च्या कार्यालयात आर. के. लक्ष्मण यांना भेटण्यासाठी आले.

जागतिक कीर्तीचा एक व्यंगचित्रकार एका उदयोन्मुख भारतीय व्यंगचित्रकाराची भेट घेण्यासाठी सातासमुद्रापार भारतात आला होता. त्या वेळी लक्ष्मण यांचे वय होते ३० वर्षे, तर डेव्हिड लो यांचे वय होते ६१ वर्षे. या भेटीत सर डेव्हिड लो यांनी लक्ष्मण यांना लंडनला आपल्या घरी येण्याचे आमंत्रण दिले. नियती एका तरुणाचे भाग्य कसे घडवू शकते, याचे लक्ष्मण हे मूर्तिमंत उदाहरण होते. पण नियतीची करामत इथेच संपत नाही. डेव्हिड लो मुंबईत आले आणि इंग्लंडला परत गेले. पण ‘टाईम्स ऑफ इंडिया’ मध्ये घडामोडी सुरू झाल्या. डेव्हिड लो यांचे आमंत्रण व्यवस्थापनासमोरच आले होते. लक्ष्मण यांना इंग्लंडला जाऊन त्यांची भेट घ्यायची इच्छा असणे स्वाभाविकच होते. ‘टाईम्स’ नेही साथ दिली. वर्षभरापूर्वी नोकरीला लागलेल्या या तरुण व्यंगचित्रकाराला त्यांनी इंग्लंडला पाठवले. सर्व व्यवस्था केली आणि सांगितले – "वर्क फ्रॉम इंग्लंड."

लक्ष्मण इंग्लंडला गेले. तेथून त्यांनी व्यंगचित्रे भारतात पाठवली. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ ने ती त्या काळात दररोज प्रसिद्ध केली. त्या मालिकेला नाव दिले – "Our Cartoonist Abroad." एका नवोदित भारतीय व्यंगचित्रकाराला एका क्षणात आंतरराष्ट्रीय कीर्ती लाभली. या दौऱ्यात डेव्हिड लो यांच्या घरी पाहुणचार घेण्याचे देवदुर्लभ भाग्य लक्ष्मण यांना लाभले. त्या दौऱ्यात लक्ष्मण ज्या दिग्गजांना भेटले त्यांच्या नावांची ही खालील यादी नुसती पहा, आणि अवाक व्हाः

१. सर विन्स्टन चर्चिल,  २. क्लेमेंट अ‍ॅटली (इंग्लंडचे पंतप्रधान), ३. बर्ट्रांड रसेल, ४. जे. बी. प्रिस्टली, ५. टी. एस. इलियट आर. के. लक्ष्मण यांच्या आयुष्यातील या सर्व घडामोडींना आपण एका माणसाच्या कर्तृत्वाचा भाग म्हणाल, की नियतीने त्याचे नशीब घडवले असे म्हणाल? हा निर्णय तुमच्यावर सोडतो आणि या विषयाला इथे विराम देतो.

००

लक्ष्मण यांचा कॉमन मॅन माहीत नाही असा भारतीय शोधूनही सापडणार नाही. १९५१ च्या सुमारास कॉमन मॅनचा जन्म झाला नव्हता. त्या काळात लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांमध्ये सामान्य माणूस दिसायचा; पण तो प्रत्येक राज्यानुसार बदलत असे. पंजाबचा विषय असेल तर फेटाधारी सरदारजी, दक्षिणेचा विषय असेल तर लुंगी नेसलेला, कपाळावर आडवे गंध लावलेला टिपिकल दक्षिण भारतीय, महाराष्ट्राचा विषय असेल तर पांढरी टोपी घातलेला, लेंगा-शर्टातील गावकरी. अशी विविध रूपे ते रंगवत असत.पण पुढे त्या सर्वांची जागा एका व्यक्तीने घेतली—कॉमन मॅनने. धोतर, जाड भिंगांचा चष्मा, टक्कल, दोन्ही बाजूंनी उडणारे पांढरे केस, चेक्सचा कोट, पायात चप्पल आणि समोर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे आश्चर्याने पाहणारा ‘चकित-चंदू’ छापाचा चेहरा—ही त्याची प्रतिमा ‘टाईम्स’ च्या वाचकांना कमालीची आवडली. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ बरोबरच ‘महाराष्ट्र टाइम्स ‘ आणि ‘नवभारत टाइम्स’ मधूनही हा कॉमन मॅन भारतभरच्या वाचकांच्या भेटीला तब्बल साठ वर्षे येत राहिला.

"हा कॉमन मॅन तुम्हाला कसा सुचला? तो कुठे भेटला?" हा प्रश्न जवळजवळ प्रत्येक मुलाखतकार लक्ष्मण यांना विचारत असे. लक्ष्मण त्यावर अतिशय मार्मिक उत्तर देत. ते म्हणत, "तो कॉमन मॅन मी शोधला नाही. तोच मला भेटायला आला. आला आणि मी त्याला माझ्या व्यंगचित्रांत कायमची जागा दिली." हा कॉमन मॅन आपल्या चष्म्यातून सगळं पाहत असे; पण कधीही तोंडातून ब्र देखील काढत नसे. सतत साठ वर्षे मूक राहून त्याने जे भाष्य केले, त्याला खरोखरच तोड नाही. पुढे त्याची फटकळ बायकोही व्यंगचित्रांमध्ये दिसू लागली. ती मात्र भरपूर बोलायची. हिंदीमध्ये म्हण आहे—"राम मिलाई जोडी." पण या जोडीला तर “लक्ष्मण मिलाई जोडी” म्हणायला हवं.  देशभरच्या कोट्यवधी वाचकांना ती जोडी मनापासून भावली.

००

लक्ष्मण खऱ्या अर्थाने कधीच निवृत्त झाले नाहीत. व्यंगचित्र काढण्यासाठी त्यांचा उजवा हात आणि मेंदू सतत शिवशिवत राहिला. त्यांना ९४ वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य लाभले. आयुष्याच्या अखेरच्या वर्षांत वास्तव्यासाठी त्यांनी पुणे शहर पसंत केले. ते नेहमी म्हणत, "मी मरेपर्यंत पुण्यातच राहणार." अखेरच्या काळात त्यांची प्रकृती वयोमानामुळे खालावली होती. त्यांना स्ट्रोकही आला होता. पत्नी कमला, मुलगा श्रीनिवास, सून उषा आणि नात रूमानिका त्यांच्या सोबत असत. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांचे निधन झाले. अखेरच्या काळात दिलेल्या मुलाखतींमध्ये ते पुण्याबद्दल भरभरून बोलत. त्यांच्या निधनानंतर पुण्यातील बालेवाडी येथे त्यांच्या कलाकृतींचे भव्य संग्रहालय उभारण्यात आले. त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या संग्रहालयात त्यांच्या बालपणापासून अखेरच्या दिवसांपर्यंतचा प्रवास उलगडून दाखवणारे स्वतंत्र दालन आहे. 

पुण्यात आल्यानंतर सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. एस. बी. मुजुमदार हे त्यांचे अत्यंत जवळचे मित्र झाले होते. एकदा गप्पांच्या ओघात डॉ. मुजुमदार म्हणाले,
"तुमचा कॉमन मॅन इतका महान आहे, की त्याचा कायमस्वरूपी पुतळा उभारला पाहिजे."
त्यावर लक्ष्मण हसून म्हणाले,
"कल्पना चांगली आहे. पण तो उभारणार कोण?"
क्षणाचाही विलंब न लावता डॉ. मुजुमदार म्हणाले,
"सिंबायोसिस उभारेल."
आणि त्यांनी आपला शब्द खरा करून दाखवला.
आजही कॉमन मॅनचा साडेआठ फूट उंच पुतळा सिंबायोसिसच्या परिसरात पाहायला मिळतो. दुसरा पुतळा पुण्यातील आर. के. लक्ष्मण संग्रहालयाच्या छतावर येणाऱ्या-जाणाऱ्यांचे स्वागत करत उभा आहे.

लक्ष्मण हे त्या कॉमन मॅनचे जन्मदाता होते; पण स्वतः आर. के. लक्ष्मण हे खऱ्या अर्थाने एक अनकॉमन मॅन होते.

माधव शिरवळकर*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com