Top Post Ad

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला करणा-या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे पत्रकार किरण ताजणे, योगेश खरे व अभिजीत सोनवणे यांच्यावर गुंडांकडून झालेला अमानुष हल्ला हा अत्यंत गंभीर आणि संतापजनक प्रकार आहे. जनतेचे प्रश्न निर्भीडपणे मांडणाऱ्या पत्रकारांना लक्ष्य करून करण्यात आलेली ही मारहाण म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरचा थेट हल्ला आहे, सरकारने या हल्लेखोर गावगुंडांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. पत्रकारांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती गंभीर झाली असून राज्यात कायद्याचे राज्य आहे की गुंडांचे असा प्रश्न पडला आहे. राज्यात कोणीही सुरक्षित नाही हे आजच्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. 


त्र्यंबकेश्वर येथे गुंडांनी पत्रकारांवर जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात पत्रकार गंभीर जखमी झाले असून किरण ताजणे यांना मोठी दुखापत झाली आहे. ही घटना अभिव्यक्ती स्वातंत्र्य व माध्यमांच्या सुरक्षिततेवर घाला घालणारी आहे. राज्यात पत्रकार संरक्षण कायदा तातडीने लागू करणे ही काळाची गरज असून पत्रकारांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करणे ही राज्य सरकार आणि गृहखात्याची  जबाबदारी आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करत असून सरकारने तातडीने हल्लेखोरांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. राज्यातील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था व पत्रकारांवर वाढते हल्ले हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निष्क्रियतेचे उदाहरण आहे. फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा हट्ट सोडून राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

 नाशिकमधील त्र्यंबकेश्वर परिसरातील स्थानिक गुंडांनी पत्रकारांवर केलेला भ्याड हल्ला अत्यंत निंदनीय आहे. या घटनेचा मुंबई मराठी पत्रकार संघाने तीव्र शब्दांत निषेध केला आहे.पत्रकारितेच्या कार्यात अडथळा आणणाऱ्या आणि त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या गुंडांविरोधात कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. तसेच या हल्ल्यामागे कोणाचे संरक्षण वा पाठबळ आहे याचीही कसून चौकशी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने करावी, अशी  मागणी संघाने केली आहे 

पोलिस प्रशासनाने हल्लेखोरांना तातडीने अटक करून योग्य ती कारवाई करावी. पत्रकारांवर वाढत्या हल्ल्यांना आळा बसावा, यासाठी कठोर उपाययोजना होणे गरजेचे आहे.गेल्या काही काळात नाशिकसह राज्यात पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्याचे प्रमाण वाढत आहे. यामागे राजकीय आश्रय असल्याचे दिसते. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाने अशा गुंडांना संरक्षण न देता त्यांच्या विरोधात कठोर कारवाई व्हावी, यासाठी प्रशासन व राजकीय पक्षांनी पुढाकार घेणे अत्यावश्यक आहे.पत्रकार सुरक्षित असतील, तरच समाजातील अन्याय व भ्रष्टाचार बाहेर येऊ शकेल आणि लोकशाहीची चौथी स्तंभ म्हणून पत्रकारिता सक्षम राहील. असे मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे 

- नाशिक (त्र्यंबकेश्वर) परिसरात  पत्रकारांवर स्थानिक गुंडांकडून करण्यात आलेला भ्याड हल्ला अत्यंत निंदनीय असून, अखिल महाराष्ट्र राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन – पत्रकार विभाग मुंबई च्या वतीने याचा निषेध करण्यात आला आहे. पत्रकारितेच्या कार्यात अडथळा आणणाऱ्या आणि जीवघेणा हल्ला करणाऱ्या गुंडांविरोधात तातडीने कठोर कारवाई व्हावी,  या हल्ल्यामागे कोणाचे संरक्षण वा पाठबळ आहे, याचीही कसून चौकशी तातडीने करावी, अशी आग्रही मागणी संघटनेने केली आहे.

 त्र्यंबकेश्वर येथील टोल नाक्यावर पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र ने तीव्र जाहिर निषेध केला असून हल्लेखाेरांना त्वरित अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी,    येथील जिल्हाधिकारी यांनी जरी कारवाई करण्याचे आश्वासन दिले असले तरी यापूर्वीचा अनुभव चांगला नसून कारवाई होण्याची शक्यता वाटत नाही.तेव्हा याबाबत मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घालून या हल्लेखोरांना तातडीने अटक करून त्यांना कडक शासन करावे जेणेकरून यापुढे अशाप्रकारे कोणाची हिंमत होणार नाही  अशी मागणी केली , अन्यथा पत्रकारांना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा जेयुएम चे अध्यक्ष नारायण पांचाळ यांनी दिला आहे तसेच पत्रकारांवरील हल्ले दिवसेंदिवस वाढत असून याची त्वरित दखल घेऊन पत्रकार संरक्षण कायद्याची त्वरित अंमलबजावणी करावी अशी मागणी जेयुएमचे महाराष्ट्र संघटन सचिव राजेंद्र साळसकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका संयुक्त पत्रकाद्वारे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com