राज्यात सातत्याने पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्याविरोधात निर्णायक पाऊल उचलण्यासाठी आज २३ सप्टेंबर रोजी मुंबई मराठी पत्रकार भवन येथे विविध पत्रकार संघटनांची बैठक पार पडली. यामध्ये अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, मुंबई मराठी पत्रकार संघ, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ, डिजिटल मिडिया परिषद महाराष्ट्र, मुंबई क्राईम रिपोर्टर्स असोशिएशन, मुंबई महानगरपालिका पत्रकार संघ या पत्रकार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सरकारला जाग आणण्यासाठी येत्या चार आक्टोबर पासून राज्यव्यापि आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना राज्यभरातून पत्रकार लाखोंच्या संख्येने एसेमेस पाठवून पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करावी म्हणून विनंती करणार आहेत. त्यानंतरही सरकारचे डोळे उघडले नाहीत तर संविधान दिनाचे औचित्य साधून आझाद मैदान येथे एक दिवसाचे उपोषण करणार आहेत., असा निर्णय यावेळी घेण्यात आला.
या प्रसंगी परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, मुंबई मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष संदीप चव्हाण, राही भिडे, शरद पाबळे, शैलेंद्र दिनकर शिर्के, महेश म्हात्रे, किरण नाईक, मिलिंद आष्टीवकर, राजा आदाटे, मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाचे सुजित महामुलकर, डिजिटल मिडिया परिषद महाराष्ट्र चे गणेश के जगताप, युवराज सं. जगताप, राजेंद्र साळसकर, सुनील ह. विश्वकर्मा, अजय मगरे, विशाल सिंह आदी मान्यवर उपस्थित होते. ....

0 टिप्पण्या