बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन सध्या भारतातील एक प्रमुख विषय असून राज्यघटनात्मक धर्म स्वातंत्र्य, समाजकारण, राजकारण, अल्पसंख्यांक समुदायाचे अधिकार व भारतीय राज्यघटनेचा प्रमुख आधारस्तंभ म्हणजेच धर्मनिरपेक्षता या सर्वांशी संबंधित आहे. त्यामुळे न्यायालयीन लढाई बरोबरच या विषयाबाबत गेले वर्षभर देशभरात विविध आंदोलने, संमेलने, परिषदा संपन्न होऊन देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री व बिहार सरकारला निवेदने पाठविली जात आहेत. परंतु अजून तरी याबाबत देशातील केंद्र सरकार व बिहारमधील राज्य सरकार यांनी गांभीर्यपूर्वक विचार केल्याचे आढळत नाही. या पार्श्वभूमीवर बोधगया महाबोधी महाविहार मुक्ति आंदोलनास यशस्वी व गतिमान करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व बौद्ध समाजबांधवांनी व त्यांच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक संघटनांनी एकत्रितरित्या आंदोलन करण्याचे सुनिश्चित केलेले आहे. याबाबत सर्व पक्ष-संघटना नेते यांच्या एकूण चार बैठका मुंबईत संपन्न झाल्या असून विस्तृत चर्चा, विचार विनिमय व व्यापक सुसंवाद प्रस्थापित करून दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ या ऐतिहासिक दिनी बोधगया महाबोधी महाविहार मुक्ति आंदोलनाचा भाग म्हणून मुंबईत महाराष्ट्रातील तमाम बौद्ध समाजबांधव व हितचिंतक यांचा सर्वपक्षीय विराट मोर्चा याचे आयोजन केले असल्याचे गौतम सोनावणे यांनी आज मुंबई मराठी पत्रकार भवन येथे पत्रकारांशी संवाद साधतांना स्पष्ट केले.
बोधगया महाबोधि महाविहार मुक्ती आंदोलनाला अधिक गती मिळावी याकरिता महाराष्ट्रातील अनेक राजकीय पक्ष आणि संस्था-संघटनांनी एकत्र येऊन 14 ऑक्टोबर रोजी महामोर्चाचे आयोजन केले आहे. याबाबत माहिती देण्याकरिता रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या पुढाकाराने आज मुंबई मराठी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेकरिता भदन्त राहूलबोधि, गंगाराम इंदिसे, अविनाश महातेकर, प्रा.सुरेश माने, तानसेन ननावरे, नितीनभाऊ मोरे, राजु वाघमारे, आनंद खरात, सुनिल निरभवणे, मिलिंद सुर्वे, रवि गरूड, शिरीष चिखलकर आणि गौतम सोनावणे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी सर्वच मान्यवरांनी या आंदोलनाला सक्रीय पाठिंबा दर्शवला आणि येणाऱ्या 14 ऑक्टोबरला प्रचंड मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन केले.हा विराट मोर्चा १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता भायखळा जिजामाता उद्यान येथून प्रारंभ होऊन आझाद मैदान मुंबईत जाहीर सभा, कार्यक्रम व तद्वंतर या विषयाशी संबंधित सर्व आस्थापनांना निवेदने पाठविली जाणार आहेत. या विराट मोर्चाचे आयोजन व नेतृत्व हे कोणीही एक व्यक्ति, पक्ष किंवा संघटना करीत नसून महाराष्ट्रातील तमाम बौद्ध समाजबांधव आहेत ज्यांची बांधिलकी या विषयाशी व आंदोलनाशी आहे. या विराट मोर्चात राज्यातील भिक्खू संघ सुद्धा मोठ्या संख्येने सामील होणार आहे. अशी माहिती अविनाश महातेकर यांनी दिली.
मागील 100 हून अधिक वर्षे बिहार येथील महाबोधि महाविहार मुक्ती लढा अव्याहत सुरू आहे. धम्मपाल अनागारिक यांनी सिरीलंकेहून येऊन या महाविहाराची ओळख समस्त बौद्धांना करून दिली. मात्र त्यांच्या हयातीत ते महाबोधि महाविहार मुक्ती लढा यशस्वी करू शकले नाही. त्यानंतर अनेक दशकानंतर भन्ते सुरई ससाई यांनी या आंदोलनाला गती दिली. त्यांच्या आंदोलनामुळे महाविहार समितीमध्ये किमान काही बौद्ध भिक्खूंचा समावेश करण्यात आला. मात्र बोद्धेत्तरांची संख्या अधिक असल्यामुळेे महाविहारात होणाऱ्या अनैतिक, अधार्मिक कृत्यांना अद्यापही आळा बसलेला नाही. या विरोधात पुन्हा एकदा फेब्रुवारी 2025 पासून नव्याने आंदोलनाला सुरुवात झाली आहे. हे आंदोलन अद्यापही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून भन्ते विनयाचार्य यांच्या माध्यमातून सुरू आहे.
महाबोधि महाविहार मुक्ती आंदोलन... गटबाज नेतृत्वामुळे अस्थिरतेकडे

0 टिप्पण्या