राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अकाली निधनाने राज्याला प्रचंड धक्का बसला आहे. बारामती येथे विमानाचे लँडींग होत असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला अन् अजित पवारांसह 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर कार्यकर्त्याच्याही भावना अनावर झाल्या असून अनेकजण या अपघाताची उच्चस्तरीय चौकशीची मागणी करत आहेत. अजित पवारांच्या विमान अपघातानंतर सोशल मीडियावर 80-90 टक्के लोकांचं मत आहे की हा घातपात आहे, हा अपघात नाही. त्यामुळे सरकारने आपली बाजू स्वच्छ आहे हे सिद्ध करण्यासाठी याची संपूर्ण चौकशी केली पाहिजे. सीआयडी चौकशीतून फार काही निष्पन्न होईल असं मला वाटत नाही. सीआयडीपेक्षा सीबीआयची चौकशी व्हावी आणि ती सुद्धा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली व्हावी, अशी मागणी ज्येष्ठ काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. त्यातच, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही या अपघाताची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधींशांच्या अधिपत्याखाली चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनीही संबंधित घटनेचं सत्य जनेतसमोर यायलं हवं, त्यासाठी चौकशी व्हायलाच हवी अशी मागणी केली आहे. आता, सुषमा अंधारेंनीही संजय राऊतांची री ओढली असून राष्ट्रवादीच्या नेत्यांवरच निशाणा साधला आहे.
बारामती विमानतळावर कमी दृश्यमानता होती म्हणून अपघात झाला असे अनेकजण अपघाताचे कारण सांगत आहेत. पण, खूप दूरच्या सीसीटीव्हीमध्ये विमान घिरट्या घालताना स्पष्ट दिसत होतं. जर तिथे धुक्याचं वातावरण असेल तर सीसीटीव्हीतील घरट्या घालतानाचे फुटेज इतके स्पष्ट कसे? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. तसेच, काल लगेच यावर बोलणं संकेताला धरून नसलं तरी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केलेले प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. ही चौकशी झालीच पाहिजे किंवा ही चौकशी आम्ही अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा करु असं सत्ताधाऱ्यांमधला एकही नेता ठामपणे का बोलत नाही? अजित दादांच्यानंतर पक्षातील जेष्ठता क्रम असणारे प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ किंवा दिलीप वळसे पाटील यांनी मौन का बाळगलं आहे? असा सवालही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. साहेबांचे राष्ट्रवादीतलेही ज्येष्ठ नेते यावर का बोलत नाहीत? हे फक्त पवार कुटुंबाचे नुकसान नाही हे महाराष्ट्राचे नुकसान आहे, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले.तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमान अपघाताच्या चौकशीची मागणी करण्यासंदर्भात नागरी उड्डाणमंत्र्यांना पत्रही दिलं आहे. AAI कडून अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास सुरू असल्याची माहिती केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राममोहन नायडू किंजरापू यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राला उत्तर देताना त्यांनी ही माहिती देण्यात आली. हा अपघात नेमका कशामुळे घडला, याच्या कारणांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी या पत्रातून केली होती. इतकंच नव्हे, तर भविष्यात असे अपघात घडणार नाहीत, यादृष्टीने तातडीने पावलं उचलण्यात यावीत, अशीही मागणी पत्रातून करण्यात आली. या चौकशीत महाराष्ट्र सरकारचेही सहकार्य आम्हाला मौल्यवान असेल, स्थानिक प्रशासनाची यात मदत लागेल आणि हा संपूर्ण चौकशी अहवाल राज्य सरकारलाही आम्ही देऊ, असं केंद्रीय नागरी उड्डाणमंत्र्यांनी या पत्रात म्हटलं. तेव्हा आता ब्लॅक बॉक्समधून नेमकी कोणती माहिती समोर येते आणि ही माहिती कधी समोर येते यावरच संपूर्ण राज्याचं लक्ष असेल.
अजित पवारांच्या विमान अपघातानंतर बारामतीतील विमानतळाविषयी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहे. रनवेच्या दोन्ही बाजूला धावपट्टीचा अंदाज येण्यासाठीचे लाईटस् नाहीत. विमानतळावर व्यावसायिक एटीसी प्रणाली नाही, स्थानिक फ्लाईंग क्लबच्या माध्यमातून रेडिओवर संपर्क साधला जातं असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या रनवेवर उतरणाऱ्या आणि टेकऑफ घेणाऱ्या विमानांना,मुंबई ATC वर अवलंबून राहावे लागते. भारतीय विमानतळ प्राधिकरणाचं अधिकृत एअर ट्रॅफिक कंट्रोल युनिट,या बारामतीत नाही. या विमानतळावरील हवाई वाहतूक व्यवस्थापन विमान प्रशिक्षण संस्थेकडून केलं जातं. प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांकडून हवाई वाहतुकीची माहिती दिली जाते. धावपट्टीवरील दृष्यमानतेवरच विमानाचं टेकऑफ आणि लँडिंग केलं जातं. या अपघातानंतर भारतीय हवाई दलानं तिथे तात्पुरते ATC टॉवर आणि हवामान सेवा केंद्र उभारलंय.
बारामती हे राजकीय दृष्ट्या अत्यंत वजनदार राजकीय नेत्यांचं शहर आहे. बारामती शहरातील विमानतळ अक्षरशः वाऱ्यावर आहे. या विमानतळावर उतरणारी आणि टेकऑफ घेणारी विमानं ही 'व्हिज्युअल फ्लाईट रूल्स' नुसार उडवली जातात. म्हणजे वैमानिकांना स्वतःच्या नजरेने धावपट्टी बघून आणि एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखून लँडिंग करावे लागते. या अपघातानंतर राज्य सरकारला जाग आली आहे. भारतीय हवाई दल अर्थात IAF ची मदत घेतली आहे. महाराष्ट्र सरकारच्या विनंतीवरून भारतीय हवाई दल अर्थात IAF नं तिथे तात्पुरते ATC टॉवर आणि हवामान सेवा केंद्र उभारले. या विमानतळाचा वापर हा प्रामुख्यानं पायलट प्रशिक्षण आणि खाजगी विमानांसाठी वापरला जाते. बारामतीहून दररोज कोणतीही नियमित व्यावसायिक किंवा प्रवासी विमान सेवा नाही. मात्र, प्रशिक्षण देणाऱ्या विमानांची या विमानतळावर दररोज मोठी ट्रॅफिक आहे

0 टिप्पण्या