दादा पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री झाले. त्यांनी सगळी पक्ष यंत्रणा जोमाने कामाला लावली. पक्षाच्या सर्व मंत्र्यांनी आठवड्यातून एक दिवस सर्वसामान्य नागरिक, पक्ष कार्यकर्ते यांना पक्ष कार्यालयात भेटावे असे आदेश दिले. त्यापूर्वी तशी पध्दत नव्हती. सर्वांनी एक एक दिवस वाटून घेतला. सर्व मंत्र्यांनी साधारण दुपारी मंत्री कार्यालयात भेटीसाठी वेळ देण्याचे निश्चित केले. त्यावेळी बुधवारी मंत्रीमंडळ बैठक होत असे. दादांनी स्वत:साठी गुरुवार निवडला होता. गुरुवारी दुपारी कितीची वेळ द्यावी हे विचारायला आम्ही गेलो तर दादा म्हणाले सकाळी ८ वा. आम्ही सगळे अवाक झालो. मुंबईत इतक्या सकाळी कोण येणार ? पण दादा ठाम होते. मग तसे पक्ष कार्यालयास कळवले. पुढच्याच गुरुवारी आम्ही सकाळी लवकर म्हणजे ७ वा चर्चगेटच्या पक्ष कार्यालयात पोचलो तर तिथे इतकी गर्दी होती की पाय ठेवायला जागा नव्हती. राज्याच्या दूरदूरच्या ग्रामीण भागातून लोक दादांना भेटायला रांगा लावून उभे होते. आम्ही पुन्हा अवाक ! त्यानंतरचे पुढचे सर्व गुरुवार ही गर्दी उत्तरोत्तर वाढतच गेली. लोकं सकाळी सहा पासून रांगा लावत असत आणि दादा ७ वाजल्यापासून असंख्य लोकांना भेटून त्यांची कामे मार्गी लावत असत. रात्रभर प्रवास करुन सकाळी लवकर दादांना भेटणं किती सोयीचं आहे असे अनेकजण आम्हाला सांगत होते. सकाळी लवकर भेटीची वेळ देण्याचा दादांचा निर्णय किती योग्य होता याची प्रचिती आली.
दादांना प्रशासनाची इतकी उत्तम जाण आणि पकड होती की सामान्य नागरिकाचा कुठलाही कागद समोर आला किंवा कोणतेही काम होणार की नाही हे क्षणार्धात आकलन करण्याची त्यांची क्षमता केवळ विलक्षण होती. ते काम होणार नसेल तर लगेच तसे खडसावून सांगत असत. आणि जर होणार असेल तर ते करण्यासाठी कोणाला फोन करायचा , का बैठक ठेवायची , का कागदावर रिमार्क देऊन काम होईल याचा निर्णय तिथल्या तिथे ते घेत असत. राज्य प्रशासनातील कोण अधिकारी कोणत्या पदावर आहे आणि त्यांच्याकडे नेमक्या काय जबाबदार्या आहेत याचे नेमके भान त्यांना असे त्यामुळे सचिव कोण आहे, किंवा कलेक्टर एस पी कोण आहे हे त्यांना कधीच सांगावे लागत नसे. कोणताही प्रसंग अथवा परिस्थिती असो संभ्रम किंवा द्विधा अवस्थेत त्यांना पाहिलेले आठवत नाही. सतत कार्यमग्न राहणे हा दादांचा अलौकीक असा गुण होता. दिवस रात्र काम करुन त्यांना कधीही थकलेले पाहिले नाही. सतत बैठका, दौरे, गाठी भेटी, कार्यक्रम यात ते व्यस्त असत. कोणतीही बैठक ३० मिनिटांपेक्षा जास्त काळ चालत नसे. त्यात निर्णयच होत असे. अधिकार्यांची बैठक असो वा राजकारण्यांची वा कार्यकर्त्यांची, कामाव्यतिरिक्त अन्य गप्पांत रमलेले त्यांना कधी पाहिले नाही. ते खरे कर्मयोगी होते.दादा उपमुख्यमंत्री झाले आणि त्याच वेळेस सोशल मिडीयाचा उदय होत होता. छोटी छोटी कामे करुन त्याला वारेमाप प्रसिध्दी देण्याचा हा काळ. परंतु दादांनी हा मार्ग कधीच स्विकारला नाही. माझे काम हीच माझी ओळख असे ते नेहमी सांगत. सुरुवातीच्या काळात तर ते पत्रकारांपासून फटकूनच वागत असत. एकदा एक अत्यंत वरिष्ठ पत्रकार पहिल्यांदाच त्यांना भेटले आणि ते दादांच्या प्रेमातच पडले. त्यांच्या सहवासात आलेला अगदी लहान थोर माणुसही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होत असे. ईमेज बिल्डींग करण्यासाठी त्यांना कोणत्याही एजन्सीची गरज कधी लागली नाही. त्यांची कार्यमग्नता आणि कामाचा धडाका यामुळेच त्यांची प्रतिमा तयार झाली होती. काम करुन ते मोकळे होत असत. त्याचे श्रेय घेण्याची धडपड त्यांनी कधीच केली नाही.
एका मोठ्या विमान कंपनीचे मालक आणि अत्यंत प्रसिध्द असे उद्योगपती वेळ न घेता अचानक त्यांना भेटायला आले होते. मी दादांना तसा निरोप पाठवला तर दादा म्हणाले काय काम आहे त्यांचे ? वेळ का घेतली नाही. मग आपली नियोजित कामे उरकूनच त्यांनी त्या उद्योगपतीला भेट दिली. दादांचा सर्वात मोठा गुण हा की त्यांनी पोटात एक आणि ओठात एक असे कधी केले नाही. त्यांना खोटे पण बोलता येत नसे. जे काही आहे ते स्पष्ट सांगून ते मोकळे होत असत. कोणाला बरे वाटावे म्हणून उगाच कोणतीही गोष्ट त्यांनी केली नाही. कितीही परखड असले तरी सत्य बोलायला ते डगमगत नसत. वक्तशीरपणा हा त्यांचा आणखी एक गुण. त्यामुळे सगळे अधिकारी आणि मंत्री बैठकीच्या आधी वेळेवर हजर होत असत. दौर्याच्या वेळी अनेक राजकारणी मंडळी उशीरा येतात म्हणून विमान किंवा हेलिकॉप्टरचे पायलट तक्रारी करत असताना दादांच्या दौर्यात मात्र अनेकदा पायलट तक्रारी करत असत की सकाळी ७ च्या टेक ऑफला दादा ६.३० वाजताच तिथे पोचत असल्याने आमची पंचाईत होते. वेळेच्या आधी पोचणे ही दादांची खासियत होती.
दादांनी सगळीकडे स्वच्छता आणि टापटीप लागत असे. ते काम करायला बरेचदा पेन्सील वापरायचे. त्या पेन्सीलते टोक सुध्दा एकदम धारदार कोरलेले असायचे. त्यात हयगय चालत नसे. कार्यालय किंवा कुठेही कचरा पडला तर ते स्वतः उचलायचे आणि समोरच्याची कानउघाडणी करायचे. जे काम करायचे ते सर्वोत्तमच असा त्यांचा खाक्या होता. दर्जात तडजोड त्यांना खपत नसे. त्यासाठी अधिकाऱ्यांची जाहिर कानउघाडणी करायला ते मागेपुढे पहात नसत. त्यामुळे एखाद्या इमारतीचे काम करत असताना अधिकारी अगदी फरश्या कुठल्या रंगाच्या बसवायच्या याचा पण सल्ला दादांना विचारूनच घेत असत. झाडांची त्यांना आवड होती. त्यांच्या घरात आणि कार्यालयात हिरवाई असायची. मी चार वर्षे दादांकडे विशेष कार्य अधिकारी म्हणून कार्यरत होतो. त्यांची कडक शिस्त आणि परखड बोलण्यामुळे सुरुवातीला दडपण आले होते परंतु एकदा त्यांचा अधिकार्यांवर विश्वास बसला की मग काम करणे अगदी सोपे होत असे कारण त्यांच्या सूचना अगदी स्पष्ट असत.
दौर्याची आखणी मी करत असे. एक दोन प्रसंग आवर्जून आठवतात. एकदा दिल्लीवरुन वित्तमंत्र्यांची महत्वाची बैठक उरकून ते वरीष्ठ अधिकार्यांसह मुंबईला शासकीय विमानाने परतत होते. रात्रीची वेळ होती आणि त्यावेळी मुंबईत धो धो पाऊस पडत होता. काही विमानांमध्ये सॅटॆलाईट फोनची व्यवस्था असते. मला रात्री आठ वाजता विमानातून फोन आला की पावसामुळे आम्ही मुंबईला पोचू शकत नाही आमचे विमान अहमदाबाद कडे वळवले आहे तुम्ही तात्काळ तिकडे सगळी सोय करा. मी तातडीने अहमदाबादमधल्या प्रोटोकॉल अधिकार्यांशी संपर्क करुन सूचना दिल्या. अचानक अहमदाबादला उतरावे लागत असल्यामुळे सगळे चिंतेत होते पण जेव्हा विमान तिथे सुखरुप पोचले तेव्हा आम्ही सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.
त्या चार वर्षात एकदाच दादांना हताश झालेले पाहिले. मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीत दादांसह आम्ही सगळेच थोडक्यात वाचलो होतो. दादांना तर ऐन वेळी सुरक्षा रक्षकांनी अक्षरश: हाताला धरुन बाहेर काढले म्हणून ते वाचले. परंतु दुर्दैवाने बारामतीचे दोघे जण जे आमच्या कार्यालयात एका अधिकार्याच्या अँटी चेंबरमध्ये बसले होते ते मात्र आत अडकुन राहिले. दादांना हे कळाल्यावर जळत्या इमारतीच्या खाली उभे राहून वर काचा तडातडा फुटत असताना अग्नीशामक दलाला सूचना देऊन आत अडकलेल्यांना वाचवण्याची पराकाष्ठा केली. परंतु त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत. इतक्या कणखर दादांना खचलेले असे तेव्हा पाहिले. दुसऱ्या दिवशी हातातले घड्याळ आणि चेन यावरुन त्या दोघांची ओळख पटवता आली. मंत्रालयातल्या आगीला दादांनी हुलकावणी दिली तरी काल मात्र आगीने डाव साधला.
दादा उपमुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच कराडला जायचे होते. दरवर्षी २५ नोव्हेंबरला कराड येथे प्रीतीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यातिथीनिमित्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहतात. त्या वर्षी दादा आणि तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित राहणार होते. दादा मुंबईहून विमानाने कराडला जाणार होते तर मुख्यमंत्री पुण्याहून हेलीकॉप्टरने कराडला येणार होते. कराडचे विमानतळ लहान आहे आणि थंडीमुळे धुक्याचे आवरण तिथे असते. त्यामुळे मी सातत्याने कराड एअरपोर्टशी संपर्कात होतो की हवामान कसे आहे. मुंबईवरुन नियोजित वेळी विमानाने उड्डाण केले. मुंबई कराड साधारण पस्तीस ते चाळीस मिनिटांचा प्रवास आहे. कराडला पोचल्यावर धुक्यामुळे विमानाला लॅंडींग करता आले नाही आणि कराड एटीसी ने ते विमान मुंबईला परत निघाल्याचे कळवले. थोड्यावेळान ते विमान मुंबईला सुखरुप परत आले.
- प्रशांत साजणीकर
- सह व्यवस्थापकीय संचालक
- दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव पूर्व
- लेखक हे अजित पवार यांचे सन २०१० ते २०१४ या काळात विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते

0 टिप्पण्या