मुंबईत आज 4 महत्त्वाच्या आणि पायाभूत सुविधांना गती देण्राया प्रकल्पाचे लोकार्पण आणि भूमीपूजन करण्यात आले. त्यामध्ये, मेट्रो 9 आणि मेट्रो 2 तसेच पॉड टॅक्सी, आणि बोरीवली ते ठाणे बोगद्याचे कामही वेगाने सुरू करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज या कामांना गती देण्यात आली. त्यामध्ये, मेट्रो 9 मध्ये दहिसर पूर्व ते काशिगाव ही मेट्रो सेवा सुरू करण्यात आलीय. तसेच, मेट्रो 2 बी अंतर्गत महाराष्ट्र नगर ा मंडाळे ते देशभक्त एन. जी. आचार्य उद्यान ा डायमंड गार्डन, चेंबूर अशा मार्गावर मेट्रो धावणार आहे.
मुंबईतील मेट्रो लाईन 2 बी याच्या उद्घाटनप्रसंगीत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, येथील मार्गावर आपण पाच स्थानके सुरू करतोय, त्यानंतर सहा स्थानके दुसऱ्या टप्प्यात, तर तिसऱ्या टप्प्यात 8 स्थानकं सुरू होतील, हे तिन्ही टप्पे सुरु झाल्यानंतर एक कनेक्टिव्हिटी सुरु होईल. मुंबई मध्यपूर्व, पश्चिम व उत्तर दक्षिण अशी जोडणी होणार आहे. अंधेरी वांद्रे या भागाला जोडल्यावर एक कनेक्टिव्हिटी मिळेल, हार्बर लाईनला जोडणारी ही पहिली लाईन आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. या स्थानकांची रचना ही सूर्यप्रकाश वापरुन कमीत कमी लाईट वापरण्यासाठी केलेली आहे, 72 लाईन असलेला सर्वात मोठा मेट्रो डेपो, मंडाले येथे तयार करण्यात आला आहे. त्याठिकाणी प्रशिक्षण देखील दिले जाईल, 2016-17 रोजी आम्ही मुंबईत सुगमता आणण्याची घोषणा केली होती. त्यात 1 तासात कुठेही जाता येईल, अशी व्यवस्था होती. आता पूर्ण जाळे तयार झाल्यानंतर पूर्ण महानगर आपण जोडू. त्यामुळे लोकल ट्रेनवरील लोड कमी होईल, 70 लाख लोक मेट्रोने प्रवास करतील. याशिवाय आपण रोड कनेक्टिव्हिटी करतोय, त्यात नॉर्थ कोस्टल रोड आहे. त्यामुळे वेस्टर्न हायवेला एक समांतर रोड तयार करतोय. आता केलेल्या टनेलमध्ये ईस्ट व वेस्ट चांगली कनेक्टिव्हिटी तयार होईल, हे सर्व प्रकल्प झाल्यानंतर देशातील सर्वात सुगम शहर हे मुंबई होईल. त्यामध्ये 40 टक्के काम हे लोकलने केले आहे, त्यामुळे हे मेक इन इंडिया आहे, असेही फडणवीसांनी म्हटले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, दहिसर ते काशीगाव दरम्यान 4.4 किमी लांबीचा पहिला टप्पा सुरू झाल्याने मीरा-भाईंदर आणि काशीगाव परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुढील 4.3 किमीचा टप्पा सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत असून त्याचे सुमारे 96 टक्के काम पूर्ण झाले आहे आणि तोही याच वर्षात सुरू होणार आहे. त्यामुळे मुंबई आणि एमएमआर जोडण्याचा संकल्प प्रत्यक्षात उतरत असल्याचे त्यांनी नमूद केले. या मार्गिकेमुळे दहिसर स्थानकावरून मेट्रो-२ए आणि मेट्रो-१शी जोडणी मिळणार असून भविष्यात मेट्रो-७, ७ए आणि मेट्रो-३द्वारे कुलाबा तसेच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत थेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे. परिणामी काशीगाव ते कुलाबा असा अखंड आणि जलद प्रवास शक्य होणार आहे.
याशिवाय वडाळा–गायमुख–भाईंदर या नव्या मेट्रो मार्गाच्या कामालाही सुरुवात झाली असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई आणि एमएमआरमध्ये एक सुसंगत ‘लूप’ तयार होणार आहे. त्यामुळे कल्याण, नवी मुंबई, तळोजा यांसारख्या भागांनाही प्रभावी कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.मुंबईतील मेट्रो नेटवर्क सध्या सुमारे 100 किमीपर्यंत पोहोचले असून ते भविष्यात 337 किमीपर्यंत विस्तारण्याचे उद्दिष्ट आहे. हे जाळे पूर्ण झाल्यानंतर मुंबईचा मेट्रो प्रकल्प जागतिक स्तरावर महत्त्वाचे स्थान मिळवेल, असेही त्यांनी सांगितले. मेट्रोमुळे रस्त्यांवरील वाहतूक 20 ते 30 टक्क्यांनी कमी होणार असून पेट्रोलची बचत, प्रदूषणात घट आणि वेळेची बचत होणार आहे. नागरिकांना जलद, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे लोकल रेल्वेवरील ताण कमी होऊन लाखो मुंबईकरांना दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. विशेषतः महिलांसाठी प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होणार असून दैनंदिन धकाधकीच्या जीवनात मोठा बदल घडणार आहे. नागरिकांना वेळेत कामावर पोहोचणे आणि कुटुंबासोबत अधिक वेळ घालवणे शक्य होणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
या प्रकल्पासाठी कार्यरत अधिकारी, अभियंते आणि संपूर्ण टीमचे त्यांनी अभिनंदन केले. तसेच लोकहिताच्या अशा प्रकल्पांमध्ये नागरिकांनीही सहभाग घ्यावा, असे आवाहन करत अशा प्रकल्पांमुळे सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत असल्याचे त्यांनी नमूद केले. दहिसर ते काशीगाव हा टप्पा सुरू झाल्यामुळे मीरा-भाईंदर परिसर मुंबईशी अधिक घट्ट जोडला गेला असून पुढील टप्पा पूर्ण झाल्यानंतर ही जोडणी आणखी बळकट होणार आहे. एकूणच, मुंबई आणि एमएमआरला एकसंध करणारा हा प्रकल्प भविष्यातील शाश्वत आणि वेगवान वाहतूक व्यवस्थेकडे टाकलेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार नरेंद्र मेहता, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार संजय उपाध्याय, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, मीरा भाईंदर मनपाचे आयुक्त राधाविनोद शर्मा,मीरा भाईंदर मनपाच्या महापौर डिंपल मेहता, नगरसेवक प्रकाश दरेकर, शिवसेना प्रवक्त्या सौ. शीतल म्हात्रे आणि सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज दुसरा पॉड टॅक्सी प्रकल्प आपण हाती घेतला आहे, एलिव्हेटेड पॉड्स आहे, त्यात 6 लोक बसू शकतात. स्टेशनवर लोक असतील तर थांबेल, नाहीतर पॉड येणार नाही अशी अत्याधुनिक यंत्रणा वापरली आहे. बीकेसी ते कुर्ला असे जोडले आहे की पॉड टॅक्सीच्या माध्यमातून लास्ट माईल कनेक्टिव्हिटी असेल. स्टेशन जवळच असल्याने लोक पायी किंवा सार्वजनिक वाहतूक वापरुन दुसरे वाहन वापरण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे बीकेसीचेडी कन्जेशन होईल. वरळी वांद्रे सी लिंक येथून एक टनेल बीकेसी येथे आणणार आहोत, पुढे दुसरा टनेल करून तो कोस्टल रोडला जोडला जाईल. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना लोकांना करावा लागणार नाही. पॉड टॅक्सी फक्त 20 महिन्यात पूर्ण करणार आहेत, त्यांनी मोठे चॅलेंज त्यांनी स्वीकारले आहे. एमएमआरडीएला विनंती आहे की कुठे काहीही अडचणी आल्या तरी काम थांबता कामा नये. आम्हाला कॉल करा, एकही दिवस काम थांबता कामा नये. अतिशय वेगाने काम करू शकू ही यंत्रणा यशस्वी झाली तर अनेक ठिकाणी याचा उपयोग होईल. ते जेवढ्या लवकर काम पूर्ण करतील, तेवढ्या लवकर त्यांना उत्पन्न सुरु होईल, हाच त्यांच्यासाठी मोठा बोनस आहे.

0 टिप्पण्या